आध्यात्मिक आरोग्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

हेल्थ वर्क
आध्यात्मिक आरोग्याविषयी विचित्र समजुती आढळतात. समाजात अनेक लोक आध्यात्मिक प्रवचने देत असतात. प्रवचनाला जाऊन आध्यात्मिक आरोग्य मिळत असते, तर गोष्ट वेगळी होती. शरीर आणि मनाचे अद्वैत समजल्याशिवाय कामात कितीही सत्यवचने ओतली तरी काहीही फरक पडत नाही. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे साक्षात्कारी अनुभव ऐकून फक्त मनोरंजन होते. आपले सत्य आपल्याला कमवावे लागते. प्रवचनांना जाऊन-जाऊन त्याची आणखी एक अफूसारखी नशा येऊ लागते. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असली वाक्‍ये ऐकून पोपटासारखी बोलता येऊ लागतात, पण ‘पिंडी’ जे शरीरमन त्याचा थांग न लावता ‘ब्रह्मांडाला’ गवसणी घालण्याचे प्रयत्न आयुष्ये घालवली तरी फसत राहतात.

शरीरस्वास्थ्य आणि मनःस्वास्थ्य यांचा उत्तम मेळ जमला की, आध्यात्मिक आरोग्य निर्माण होऊ लागते. आपण सतत, एकाच वेळी, अलिप्तपणे आणि हळूहळू संपूर्णपणे आपल्या अंतरंगाची तशीच बाह्यसृष्टीची अनुभूती घेऊ लागतो. अंतरंगाचा बाह्यसृष्टीवर होणारा परिणाम तसेच बाह्यसृष्टीचा अंतरंगावर होणारा परिणाम लक्षपूर्वक पाहू शकतो. साक्षीभाव वाढू लागतो. समाधानाची परिणती समाधीत अचानक होऊ लागते. आपला श्‍वासदेखील आपण घेत नसून, तो आपल्या शरीरात जात येत असतो, हे स्पष्टपणे समजायला लागते. आपले आयुष्य ज्या श्‍वासावर संपूर्णपणे आधारित आहे तो श्‍वास आपल्या हातात तर नाहीच; पण त्याबाबत आपण विशेष काही करूदेखील शकत नाही, हे कळल्यावर अहंकाराला जबरदस्त धक्का बसतो आणि ‘मी केले’, ‘माझे आहे’, ‘माझ्यामुळे झाले’ अशा प्रकारची आपल्याकडून केली जाणारे विधाने अत्यंत हास्यास्पद वाटू लागतात. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य हे जाहीर करावे लागत नाही. या तीनही गोष्टी ज्या व्यक्तीत आहेत त्याच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला हे क्षणोक्षणी जाणवत राहते. 
(उद्याच्या अंकात वाचा - स्वास्थ्यनियोजन)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rajeev sharangpani all is well sakal pune today