आयुष्य "सुगंधी' होण्यासाठी... (रमेश सूद)

रमेश सूद
शनिवार, 4 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, रमेश सूद, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

व्यक्तिमत्त्व विकास 

दररोजप्रमाणे सूर्य शांतपणे उगवला. सूर्यबिंबाच्या आगमनाने उत्साहित झालेल्या फुलपाखराने गुलाबाकडे पाहिले. त्याने अतिशय प्रामाणिकपणे गुलाबाचे निरीक्षण केले. गुलाबानेही हळुवारपणे उमलत फुलपाखराला प्रतिसाद दिला. फुलपाखरानेही आपले पंख फडफडवले. त्याच्या डोळ्यात स्वप्ने तरळत होती. ती पूर्ण करण्यासाठी फुलपाखरू आता तयार झाले होते.

त्याचवेळी, अचानक एका हसऱ्या चेहऱ्याच्या बालिकेच्या चिमुकल्या बोटांनी तो गुलाब तोडला. तरीही, त्या गुलाबावर बसू पाहणाऱ्या फुलपाखराला जराही धक्का बसला नाही, त्याला काहीच आश्‍चर्य वाटले नाही. या घटनेचा मूक साक्षीदार असलेल्या मलाही काहीच नवल झाले नाही. नुकताच उमललेला गुलाब तोडणारी ती बालिका गरीब दिसत होती. तिने रंगबिरंगी फुलांचा फाटका फ्रॉक घातला होता. मात्र, त्याचा तिला त्रास होत नव्हता. गुलाबाचे सुंदर फूल तोडून तिने एक खराखुरा आनंदाचा क्षणच जणू स्वत:साठी शोधला होता. गुलाबाचे फूल जागेवरून नाहीसे झाल्यावर फुलपाखरू माघारी वळले. आपले पंख पुन्हा फडफडवत दुसऱ्या फुलाच्या शोधात सहजपणे निघाले.

मला गुलाबाच्या भावनांबद्दल काहीच कळले नाही. तरीही, आपल्याला तोडणाऱ्या निरागस बालिकेच्या हातालाही त्याने आपला सुगंध पूर्णपणे अर्पण केला असेल, याची मला खात्री आहे... तिला अधिक आनंदी वाटण्यासाठी. हा गुलाब आपला सुगंध पसरविण्यासाठीच अस्तित्वात आला होता. आपल्याला किती आयुष्य लाभले याचा क्षणभरही हिशोब न मांडता लाभलेल्या मोजक्‍या क्षणांतही गुलाबाने सुगंधच पसरवला. या सर्वांतून किती शिकण्यासारखे आहे ना? तुमच्या आयुष्याचा सुगंधही असाच दरवळत राहो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Ramesh Sood on skills development in Edu supplement of Sakal Pune Today