ऑन एअर : जेष्ठ मध्यमवर्गीयाच्या डायरीचं पान

On-Air
On-Air

‘आम्ही सगळे आत्मनिर्भर,’ असं ओरडत असताना एका अभिनेत्यानं मात्र ‘आत्महत्या’ असा शेवटचा नारा दिला. तारुण्यात केलेली आत्महत्या सगळ्यात जास्त दुःख देऊन जाते. त्याच्या चाहत्यांना व्हायचं ते दुःख झालंच, पण इतरही सगळेच हादरून गेले. एवढा पैसा, प्रसिद्धी आणि पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती आयुष्याला एवढी कंटाळू शकते? मग आमच्यासारख्या सामान्य माणसांनी जन्मच घ्यायला नको होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आई आजारी, वडिलांची पेन्शन अडकलेली, बहिणीला अजूनही चांगले स्थळ मिळत नाही, गावच्या तुटपुंज्या प्रॉपर्टीवरून वाद, घराचे, गाडीचे, मोबाईलचे वॉशिंग मशिनचे हप्ते फेडता येईना म्हणून काढलेलं पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन म्हणजे हप्त्याचे हप्ते; माझ्यासारख्या हिऱ्याची किंमत न कळणारा बॉस, बाईक मेन स्टँडवर लावता येत नाही म्हणून दोन गाड्यांची जागा बळकवणारा दुसऱ्या मजल्यावरचा शेजारी, इर्षेपोटी माझ्या पोस्टला लाइक न करणारी मित्रमंडळी...

हे सगळं असताना आम्ही कधी स्वतः स्वतःचा जीव घेतला नाही. तेवढे ‘आत्मनिर्भर’ आम्ही आजपर्यंत झालेलो नाही. अगदीच कोणाला मरायचं असेल तर तशी आमची हरकत नाही. एरव्हीही कोणी आमचा सल्ला ऐकला नाही की, ‘मग मर लेका’ असाच आशीर्वाद आम्ही देतोच!

आम्ही असतो, तर आत्महत्येपेक्षा नुसती हत्या केली असती. सरळ बॉर्डरवर जाऊन दुश्मनांचा खात्मा केला असता. भारतात दरवर्षी दीड एक लाख लोक आत्महत्या करतात. त्याऐवजी त्यांनी सीमेवर जावं आणि हौतात्म्य पत्करावं. आम्ही असतो तर तेच केलं असतं. चीन आणि पाकिस्तान दोघांना पळता भुई कमी पडली असती. पण साला या आधुनिक पोरांमध्ये धमकच नाही. सगळे पाश्‍चात्य संस्कृतीच्या दबावाखाली गुळगुळीत झालेत. यांना काय तर म्हणे व्यक्त व्हायचं असतं, ‘तेही रडून!’ अंग्रेज चले गये, पर ये डिप्रेशन नाम का शब्द छोड गये. डिप्रेशनचा खरा अर्थ ‘जमिनीचा खाली गेलेला भाग.’ आमचे पूर्वज डिप्रेशनला बळी पडत नसत. उलट रोजगार हमीमध्ये ७२ च्या दुष्काळात जमिनीत दोन बाय दोनची ‘डिप्रेशन’ खणत आणि पुन्हा स्वतः भरून टाकत! 

आमच्या वेळी पुरुषत्वाचे माप नेहमी इंचांमध्ये मोजलं जायचं. याची छाती किती इंचांची, माझे दंड तुझ्या दंडापेक्षा किती मोठे आणि पिळदार आहेत वगैरे. आता मात्र कोण किती संवेदनशील आहे, याची चढाओढ लागते. बायका पुरुषांची कामं काय करतात, पुरुष बायकांची कामं काय करतात. खऱ्या अर्थानं कलियुग आलंय. आजकाल सायकॅट्रिस्टकडं जायची फॅशन झाली आहे. आमच्या वेळी माणूस ठार वेडा झाल्याशिवाय त्याला डॉक्टरांकडं नेत नसत. त्याला आधी गोठ्यात बांधून ठेवत. अगदीच गुरांना अडचण झाली की, मग त्याचे अंगठे घेऊन त्याला येरवडा इस्पितळात पाठवीत. रोज योगसाधना केली की, कुठलाही मानसिक त्रास होत नाही. आमच्या शेजारचे खूप दंगा करतात, त्याचा खूप त्रास होतो, नाहीतर आम्हीही रोज ध्यान लावून बसलो असतोच की...

डॉक्टरांपेक्षा तुम्ही या सगळ्या तरुणांना आमच्याकडं पाठवा. महिनाभरात सरळ करतो. मिलिटरी ट्रेनिंग देतो. एकदा कडक शिस्त लागली की, या देशाचं भलं होईल. मिलिटरी शासनाशिवाय दुसरा मार्ग नाही असं आम्ही अनेक वर्ष म्हणतोय, पण कमीत कमी मिलिटरी शिस्त तरी आत्मसात करूया. काय बोलता? चीनबरोबर आपली युद्धजन्य स्थिती झाली आहे? नाही म्हणजे आम्हाला तिथे जायला आवडलं असतं, पण अडचण आहे. आई आजारी, वडिलांची रखडलेली.... हा, पुन्हा सांगायची गरज नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. 
पण आम्ही असतो तर....!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com