esakal | ऑन एअर : मतांच्या अवकाशातले 'पूर्व'ग्रह
sakal

बोलून बातमी शोधा

ऑन एअर : मतांच्या अवकाशातले 'पूर्व'ग्रह

गुंतागुंतीच्या, महत्त्वाच्या विषयांवर आपला बुद्धिप्रामाण्यवाद गळून पडू शकतो आणि आपलं बहुतांश वैचारिक जीवन ‘ऑटोपायलट’वर चालू असतं हे आपण मागच्या दोन लेखांत बघितलं. मी असं काही मांडल्यावर समोरच्याला नेहमी वाटतं, की मी त्यांना सोडून इतर लोकांबद्दल बोलतोय. हे स्वाभाविक आहे. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत, दिसलेच किंवा दाखवले गेलेच तरी त्यामागच्या कारणांची यादी आपल्याकडे तयार असते.

ऑन एअर : मतांच्या अवकाशातले 'पूर्व'ग्रह

sakal_logo
By
आर. जे. संग्राम, ९५ बिग एफ.एम.

गुंतागुंतीच्या, महत्त्वाच्या विषयांवर आपला बुद्धिप्रामाण्यवाद गळून पडू शकतो आणि आपलं बहुतांश वैचारिक जीवन ‘ऑटोपायलट’वर चालू असतं हे आपण मागच्या दोन लेखांत बघितलं. मी असं काही मांडल्यावर समोरच्याला नेहमी वाटतं, की मी त्यांना सोडून इतर लोकांबद्दल बोलतोय. हे स्वाभाविक आहे. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत, दिसलेच किंवा दाखवले गेलेच तरी त्यामागच्या कारणांची यादी आपल्याकडे तयार असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबद्दलचा समाजशास्त्रातला एक साधा सोपा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे. तुम्हीही करू शकता. जगाच्या पाठीवर कुठंही, कुठल्याही शंभर लोकांना एकत्र करा आणि विचारा ‘तुमच्यापैकी सरासरीपेक्षा चांगले गाडीचालक कोण आहेत?’ कमीत कमी ९५ टक्के लोक हात वर करतील. (पुण्यात असाल तर १०१ टक्के, कारण एका काकांनी दोन हात वर केलेले असतील.) पण असं कसं होईल? जवळजवळ सगळेच सरासरीपेक्षा जास्त कसे असतील!? पण याच शंभर लोकांना जर आधी विचारलं, की ‘तुमच्या मते, किती लोक सरासरीपेक्षा चांगली गाडी चालवतात,’ तर उत्तर वेगळं येतं! याला मीदेखील अपवाद नाही. मला वाटतं, की ९५ टक्के चालक ‘बेक्कार’ गाडी चालवतात आणि मी ९८ टक्के लोकांपेक्षा चांगली गाडी चालवतो. जे चालक कौशल्याचं तेच इमानदारीचं. तेच राष्ट्रवादाचं. मी खरा देशभक्त; पण इतर लोक खरे देशप्रेमी नाहीत...

स्वतःचं आकलन, स्वतःबद्दलचे समज आणि तुलनेत इतरांचं मूल्यमापन म्हटलं, की आपला बुद्धिप्रामाण्यवाद इथे गळून पडतो; पण महत्त्वाचे विषय- नैतिकता, धर्म, देश राजकारण वगैरेवर बोलताना मात्र  तो शाबूत असतो. सामान्य माणूस फार विचार करत नाही; पण या सदराचा वाचक मात्र वेगळा आहे. लॉजिकल आहे, रॅशनल आहे. आपण नियमित सगळ्या माध्यमांवर बातम्या बघतो, वाचतो, चर्चा करतो. याआधी राजकारणात, समाजकारणात कोण कसं वागलंय हे आपल्याला माहीत आहे. या सगळ्याचा विचार करून आपण आपलं मत बनवतो ना?

खरं सांगू का? विज्ञानाचं म्हणणं वेगळं आहे. आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेत अनेक मेंटल शॉर्टकट असतात- ज्याला Cognitive Bias (आकलन पूर्वग्रह) म्हणतात. याचे अनेक प्रकार आहेत. त्यातला एक म्हणजे ‘हेलो (तेज वर्तुळ) इफेक्ट.’ आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जे मत बनवतो, त्यानुसार त्याचं वागणं चांगलं की वाईट हे ठरतं.

राजकारणात हे सर्रास बघायला मिळतं, करणं इथं विषय इतके किचकट आणि मोठे असतात, की त्याचे सगळे पैलू आणि त्याबद्दलचे पुरावे एकाचवेळी एकाच ठिकाणी गोळा करणं कठीण असतं, आणि ते सगळं एकदम तोलणं तर अशक्यच! म्हणजे मनमोहनसिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्रधोरणांपैकी कोणती सरस हे शोधायचं म्हटलं, तर आधी सगळा इतिहास वाचवा लागेल. नुसता भारत-पाकिस्तान नाही, तर अमेरिका-पाकिस्तान, पाकिस्तान-चीन, चीन-अमेरिकापासून सगळ्या देशांमधली गुंतागुंत लक्षात घ्यावी लागेल. दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, या घटना समजून घ्याव्या लागतील; आशियाई विकास बँकेपासून जागतिक बँकेपर्यंत, तसेच मधले ‘ब्रिक’, ‘ओपेक’, ‘सार्क’, ‘यूएन’ अशी बाराखडी गिरवावी लागेल. एडवर्ड सेड, नोम चोमस्की, ख्रिस्तोफर हिचिंस आदींच्या पोथ्यांची पारायणं करावी लागतील. हा सगळा अभ्यास झाला, की या दोघांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय काय केलंय वगैरे समजून घेऊन मग कोणाचा जयजयकार करायचा हे ठरवावं लागेल!!

हे म्हणजे अवघडच काम की हो! भक्तांना तर हे जमणारंच नाही (दोन्हीकडच्या); पण सुशिक्षित- सुसंस्कृत- सुविचारी आणि कसलेकसले ‘सु’-विशेषण असलेल्यांनासुद्धा नाही. आणि म्हणूनच लोक ‘हेलो इफेक्ट’ नावाच्या cognitive Biasचा वापर करून मेंटल शॉर्टकट मारून आधीच ठरवतात, की आपल्याला कुठली व्यक्ती आवडते आणि त्यानुसार आपण आपलं सगळ्या विषयांवरचं मत बनवतो.

अर्थात हे असलं सगळं दुसरे लोक करतात. या सदराचा लेखक आणि वाचक सामान्य नाही, साधारण नाही, सुमार नाही, तो बुद्धिप्रामाण्यवादी आहे!! माझं म्हणणं पटलं असेल, तर तुम्ही कदाचित confirmation Biasला बळी पडला असाल. बघूया पुढच्यावेळी.

Edited By - Prashant Patil