esakal | ऑन एअर : मताबाबतचा ‘पुष्टी’कोन!
sakal

बोलून बातमी शोधा

ऑन एअर : मताबाबतचा ‘पुष्टी’कोन!

‘गुंतागुंतीचे विषय पूर्णपणे समजून घ्यायचा त्रास आपल्याला नको असतो आणि म्हणून आपण आपली आवडती व्यक्ती जी भूमिका घेते तीच बरोबर आहेस असं गृहीत धरतो आणि आपलं मत बनवतो,’ हा हेलो इफेक्ट आपण मागच्या वेळी समजून घेतला. याहीपेक्षा महत्त्वाचा एक बायस आहे. सन १९५०च्या दशकातली गोष्ट. प्रिन्स्टन आणि डार्थमथ या दोन कॉलेजमध्ये अमेरिकन फुटबॉलची मॅच.

ऑन एअर : मताबाबतचा ‘पुष्टी’कोन!

sakal_logo
By
आर. जे. संग्राम, ९५ बिग एफ. एम.

‘गुंतागुंतीचे विषय पूर्णपणे समजून घ्यायचा त्रास आपल्याला नको असतो आणि म्हणून आपण आपली आवडती व्यक्ती जी भूमिका घेते तीच बरोबर आहेस असं गृहीत धरतो आणि आपलं मत बनवतो,’ हा हेलो इफेक्ट आपण मागच्या वेळी समजून घेतला. याहीपेक्षा महत्त्वाचा एक बायस आहे. सन १९५०च्या दशकातली गोष्ट. प्रिन्स्टन आणि डार्थमथ या दोन कॉलेजमध्ये अमेरिकन फुटबॉलची मॅच. टायगर्स आणि ‘इंडियन्स’ (याचा भारताशी संबंध नाही. तिथल्या आदिवासी लोकांना त्या काळात ‘इंडियन्स’ म्हणत. आता ‘नेटिव्ह अमेरिकन्स’ म्हणतात.) या दोन टीमच्या चाहत्यांमधली स्पर्धा प्रचंड, या खेळाच्या निकालाबद्दलची उत्सुकता शिगेला पोचलेली. अमेरिकन फुटबॉल म्हणजे मुळातच मर्दानी खेळ, आणि क्रिकेटच्या तुलनेत तर खूपच. एक मिनिट थांबून, अमेरिकन फुटबॉलचा एखादा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्या दिवशीचा खेळ नेहमीपेक्षा आक्रमक होता. अंपायरना खूप जास्त काम करावं लागलं, अनेक पेनल्टी द्याव्या लागल्या. प्रिन्स्टनच्या क्वार्टरबॅकच नाक तुटलं, तर डार्टमाऊथच्याचा पाय.

दोन्ही बाजूचे फॅन्स प्रचंड चिडले होते. हास्ट्रोफ आणि कँट्रील या शास्त्रज्ञांनी खेळ संपल्यावर दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांची मतं जाणून घेतली. दोन्हीही बाजूंना, समोरच्या टीमने खिलाडूवृत्ती दाखवली नाही, असं वाटलं. खेळ तोच; पण निष्कर्ष वेगळे. काही दिवसांनी त्यांना या खेळाचा व्हिडिओ दाखवला गेला. तो बघतानासुद्धा, प्रिन्स्टनच्या चाहत्यांना दुसऱ्या टीमच्या ‘दुप्पट चुका’ दिसल्या. यात बरोबर कोण आणि चूक कोण होतं यापेक्षा, एकाच वेळी दोन टोकाच्या भूमिका घेणाऱ्यांना आपणच बरोबर आहोत असं ठामपणे का वाटतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

हास्ट्रोफ आणि कँट्रील याच्या selective group perception (निवडक समूह समज) या मांडणीप्रमाणे, आपण आपलं मत आपल्या समूहाच्या दृष्टिकोनातून तयार करतो आणि महत्त्वाच्या घटनंचा अर्थ त्याप्रमाणे लावतो. 

एकदा का आपलं मत बनलं, की मग समोर येणाऱ्या सगळ्या पुराव्यांपैकी फक्त तेच पुरावे बघतो आणि वापरतो, जे आपल्या या भूमिकेची पुष्टी करतात. म्हणजे, ज्याला जे बघायचे आहे तेच तो बघतो!

यालाच confirmation bias किंवा ‘पुष्टीकरण पूर्वग्रह’ म्हणतात. आपलं मत कन्फर्म करणाऱ्या घटना, माहिती यावर आपण भर देतो आणि आपल्या मताविरूद्ध गोष्टी आपण एकतर बघतच नाही किंवा कोणी दाखवल्याच, तर त्याला किंमत देत नाही. साध्या आंतरशालेय स्पर्धेतसुद्धा हे होतं- मग धर्म, जात, देश, राजकारण यावर आपल्या भूमिका इतक्या टोकाच्या असतात, यात काही नवल नाही. याचं आपल्याला आश्चर्य वाटतं कारण बुद्धिप्रामाण्यवाद हा माणसाचा स्थायीभाव आहे, त्यासाठी विशेष अभ्यास किंवा मेहनत घ्यावी लागत नाही अशी आपली समजूत आहे!

एवढा बलाढ्य मानवी मेंदू असं का वागतो? एक थियरी म्हणते, की मनुष्य हा हजारो-लाखो वर्षं टोळीत राहायचा. आपल्या शंभर-दीडशे लोकांच्या गावाबाहेर त्याचा इतर लोकांशी संबंध येत नसे आणि तो आलाच तर संघर्ष होत असे. टोळीच्या म्हणण्याविरुद्ध मत मांडलं, तर तुमचा टोळीशी संघर्ष होऊन तुम्हाला वाळीत टाकण्याची भीती होती. त्या काळी वाळीत टाकणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. त्यामुळे कदाचित उत्क्रांतीच्या नियमानुसार आपला हा स्थायीभाव झाला असावा, कारण यावरच आपलं ‘survival’ अवलंबून होतं. उत्क्रांतीच्या मोजपट्टीवर लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे अलीकडचं फॅड आहे!

जर हे फॅड तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल, तर पुढच्या वेळी आपण या पुष्टीकरण पूर्वग्रहावर कशी मात करायची ते बघूया. हा, पण माझं म्हणणं तुम्हाला पटेलच, असं मी ‘कन्फर्म’ सांगू शकत नाही!!

Edited By - Prashant Patil