मी आणि माझा 'ओसीडी'... (सखी गोखले)

sakhee
sakhee

लंडन कॉलिंग 

मी चौथीत आईबरोबर तिच्या नाटकाच्या दौऱ्यावर गेले होते, प्रयोगाच्या आधी तिकडच्या एका प्रसिद्ध खाणावळीत आम्ही जेवायला गेलो. जेवण यायच्या आधी वेटर दादांनी एका हातात पाण्याचे चार ग्लास आणून टेबलवर ठेवले. एखादा भीतिदायक प्रसंग सिनेमामध्ये स्लो मोशनमध्ये दाखवतात तसे ते मला दुरून येताना दिसले, त्यांच्या हातातले ते चार ग्लास आणि त्या ग्लासमधल्या पाण्यात त्यांची बुडालेली चार बोटं. मी त्या दुपारी जेवलेच नाही. तेव्हा कळत नव्हतं, पण तो प्रसंग माझ्या "ओसीडी'चं पहिलं लक्षण होतं. "ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर' याचा अर्थ, परिणाम मला अनेक वर्षांनी कळाला. खरंतर कॉलेजमध्ये असताना. या विकारामुळे अनेक गोष्टींचा मला त्रास होतो, अगदी अस्वच्छ परिसरापासून ते ताटातल्या पोळी भाजी आणि चटणीत मला अपेक्षित असलेल्या अंतरापर्यंत. 

घरी आईने माझ्या स्वभावाला समजून घेतले, पण बोर्डिंग स्कूलला गेल्यावर मात्र पहिले काही महिने मी खूप अस्वस्थ होते. एका घरात इतर 20 मुलींबरोबर राहणं, सगळ्यांच्या सवयी, आवड, राहण्याची रीत वेगळी होती. त्या वयात नक्की कशाचा त्रास होतो, यावर बोट ठेवता येत नव्हते. सतत आमची खोली झाडून काढणे, कपाट आवरणे, बेड वरच्या चादरीवर धूळ बसू नये म्हणून दुसरी चादर अंथरणे, सतत हात- पाय धुणे अशा विविध गोष्टींमध्ये मी माझ्या "ओसीडी'चा सामना करत होते. 

कॉलेजमध्ये असताना माझ्या आजाराला नाव मिळालं "ओसीडी.' बराच काळ ते नाकारलं गेलं, माझ्या पॅटर्नला तोडण्यासाठी मी मुद्दामच माझ्या सवयी तोडू लागले. परिणामी, माझी चिडचिड आणि छातीत असणारी धडधड सारखी वाढू लागली. 

या संबंधी कोणीच फार बोलत नव्हतं, वाचायला मिळत नव्हतं. आजूबाजूची लोक, मित्रमंडळी सांभाळून घ्यायचे, पण त्यांना का असा त्रास होत नाही, असे प्रश्‍न मला वारंवार पडू लागले. काही वर्षांनी या विकाराचा खूप त्रास होऊ लागला तेव्हा मात्र मी एका थेरपिस्टकडे गेले. त्यांनी मला समजून घेतलं. त्यांच्याशी बोलून मन हलकं झालं. माझा विकार हा फक्त माझ्यापुरता सीमित नाहीये, माझ्यासारखे कित्येक लोक आहेत, जे रोज लढताहेत. ओसीडीसारखे अजून बरेच मानसिक विकार आहेत, ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

सहानुभूती असणं हे महत्त्वाचं आहे, मात्र आपल्या मानसिक आरोग्याबद्दल संवाद साधणं हे गरजेचं आहे, हे मला कळायला बरीच वर्षे लागली. शारीरिक स्वास्थाबरोबर मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मदत आणि समुपदेशन घेण्यात काहीच कमीपणा नाहीये. तुम्हाला जर मदतीची गरज असेल किंवा मदत करायची इच्छा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर संपर्क करू शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com