देशभर पसरतोय अपेक्षाभंगाचा वणवा

Disappointment
Disappointment

स्पर्धात्मक खेळांमध्ये ज्येष्ठ, कनिष्ठ, मध्यम असे ‘लीग’ असतात. खेळाडू कोणत्या ‘लीग’मध्ये खेळतो यावरून त्याचा दर्जा निश्‍चित होत असतो. जो खालच्या ‘लीग’ वा मुलांमध्ये खेळतो, त्याचा दर्जा आपोआपच कमी होत असतो. हाच निकष आज देशातील राजकीय परिस्थिती हाताळण्यात सुरू असलेल्या भाजपच्या प्रयत्नांना लावला जाऊ शकतो. आणखी सोपे करून सांगायचे झाल्यास प्रख्यात कुस्तीपटू दारा सिंग यांचे उदाहरण देता येईल. आव्हान देणाऱ्या कुणाही मल्लाला ते प्रथम आपले बंधू रंधवा यांच्याशी झुंजायला लावत. त्यांच्याशी जिंकलेल्या कुस्तीपटूंचेच आव्हान ते स्वीकारत असत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणत, की कुणीही लल्लू-पंजू उठून आपण दारा सिंग यांना आव्हान दिल्याचा दावा करत फिरतो. अशांना खुश करण्यासाठी मी माझा दर्जा कशाला खाली आणू?

आता राजकारणाच्या खेळाकडे वळूयात. गेल्या एक महिन्यापासून भाजपचे ज्येष्ठ आणि बडे नेते मुलांशी भांडण्यात व्यग्र असल्याचे दिसून येत आहे, तर भाजपच्या या राजकारणाचे उत्तर हे विद्यार्थी देशभरातील विद्यापीठांमध्ये मशाली पेटवून देत आहेत. जेथे भाजपची सत्ता आहे अशा राज्यांमध्ये सर्व शक्तीनिशी ही आंदोलने शांत करण्याचा प्रयत्न होत आहे. जनतेने भरभरून पाठिंबा देत निवडून दिलेले सरकार विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकण्याऐवजी त्यांच्याशी दोन हात करण्यात गुंतले असेल, तर त्याची परिणती तीनच शक्‍यतांमध्ये होते. एक - जुलमी विरुद्ध कच्चे लिंबू असे चित्र उभे होते, दुसरे - यात ब्रॅंड भारताची जगात नाहक बदनामी होते आणि तिसरे - युवकांत मुले विरुद्ध ज्येष्ठ असा विचार दृढ होतो. २०१४ ची निवडणूक चांगल्या जीवनमानाची आशा दाखविणारी होती, तर २०१९ ची निवडणूक ही आशा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एवढा काळ लागणारच या विचाराने दिलेली दुसरी संधी होती. मात्र, दुसऱ्यांदा निवडून दिल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांच्या पदरी जे पडले ते या युवकांच्या अपेक्षांच्या अगदी विपरीत होते. नोकऱ्या मिळणे दुरापास्त झाले आहे. कोणतेही काम कमी दर्जाचे नसले तरीही आज विद्यापीठांमध्ये शिकत असलेला युवक आपल्याला स्विगी, झोमॅटो, ओला वा उबेर येथे काम करण्याची संधी मिळेल असे ध्येय ठेवून शिकत नसेल, यासाठी त्यांनी मोदींना निवडून दिले नव्हते. आपल्या आशा- आकांक्षांची पूर्तता होईल, असे काहीही सरकारकडून होत असल्याचे त्यांना दिसून येत नाही. म्हणूनच युवकांचा मोदी सरकारकडून झालेला अपेक्षाभंग मोठा आणि अधिक सखोल स्वरूपाचा आहे.

सरकारविरोधाची ही भावना फक्त काही डावे, उदार वा शहरी नक्षलवाद्यांनी हवा दिली म्हणून काही विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्येच वाढीला लागली आहे, असा कुणाचा समज असेल, तर ते भाबडेपणाचे लक्षण ठरेल. या अपेक्षाभंगाच्या आगीचा वणवा आता देशभरातील प्रतिष्ठित, नामवंत आणि राजकारणाला स्थान न देणाऱ्या ख्यातनाम विद्यापीठांमध्येही जोमाने पसरू लागला आहे. मला देशातील वेगवेगळ्या भागांतील विद्यापीठांमध्ये जेएनयू, जामिया आणि बीएचयूमध्ये दिसणारी अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘आज जे काही चालले आहे, त्यासाठी मी आपले मत दिले नव्हते’ अशी भावना येथील युवकांमध्ये वाढू लागली आहे. यातील अनेकांनी आणि काहींनी तर प्रथमच मोदी यांना मत दिले आहे, याची मला खात्री आहे. एका शैक्षणिक संस्थेतील ‘डेमोक्रसी वॉल’ या उपक्रमात गेल्या सहा महिन्यांत व्यक्त झालेली लेखी मते सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याच्या भावनेचे द्योतक ठरत आहेत. या भिंतीवर कौतुकाचा एकही शब्द गेल्या तीन महिन्यांत उमटलेला नाही.

देशभक्ती, धर्म आणि व्यक्तीस्तोमाचे झिंग आणणारे मिश्रण तुम्हाला एखादी निवडणूक जिंकून देऊ शकते; पण सलग दोन निवडणुका जिंकून देऊ शकत नाही.  आजचा युवक ‘स्मार्ट’ आहे याचा या लोकांना विसर पडलेला दिसतो. सहा महिन्यांपूर्वी बॉलिवूडमधील तारे-तारकांमध्ये मोदी यांच्यासोबत ‘सेल्फी’साठी चढाओढ चालायची. आता तेच विरोध प्रदर्शनात सहभागी होताना दिसत आहेत. हे सारे सुरू असताना स्मृती इराणी यांच्यासारख्या दुय्यम दर्जाच्या मंत्री दीपिका पदुकोणला टोमणे मारण्यात धन्यता मानत आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही खेळता त्या ‘लीग’वरून तुमचा दर्जा ठरत असतो. मला तर भारतातील युवकांची सहानुभूती गमावण्याचा यापेक्षा अधिक परिणामकारक मार्ग शोधून सापडत नाहीय.
(अनुवाद - किशोर जामकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com