esakal | बॉलिवूड - एक गलिच्छ उद्योग
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood

कमतरता ‘आदर’तेची
बॉलिवूड उद्योगात झगमगाट, यश, प्रसिद्धी, पैसा, सत्ता, गट, घराणे या साऱ्यांसह योग्यतेचाही प्रश्‍न आहेच. धर्मेंद्र यांच्या चार मुलांमध्ये सनी देओलला मिळालेले थोडेफार यश वगळता भाजपच्या लोकसभेच्या तीन जागा मिळाल्या. तर सर्वाधिक लोकप्रिय माता-पिता आणि पत्नी असूनही प्रतिभाशाली अभिषेक बच्चन याला येथे झगडावे लागले. बॉलिवूडमध्ये हे सर्व असताना सुशांतसारख्या प्रतिभाशाली आणि यशस्वी कलावंताने मोडून पडावे, अशी कोणती कमतरता आहे? याचे उत्तर आहे - आदर.

बॉलिवूड - एक गलिच्छ उद्योग

sakal_logo
By
शेखर गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार

बाहेरच्यांसाठी बॉलिवूड अन्यायकारक ठरू शकते कारण हा एक जीवघेणा खेळ असून, त्यात पंच, न्यायाधीश वा विरोधात आवाज उठवणारा (व्हिसल ब्लोअर) यापैकी कुणीही नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या महामारीच्या काळात अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. त्यातील एक माझ्या आवडीचे आहे ते असे - एक रुग्ण डॉक्‍टरांना विचारतो, हे अरिष्ट केव्हा टळेल असे तुम्हाला वाटते ? त्यावर डॉक्‍टर म्हणतात, मला ठाऊक नाही कारण मी पत्रकार नाही. आता थोडे गंभीर होत सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याचा मृत्यू तुम्हाला बॉलिवूडबद्दल काय सांगते या प्रश्‍नाचा माग काढण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही वरच्या मीमचा दाखला देत म्हणाल की, केवळ पत्रकार आहात म्हणून तुम्ही यावर अधिकारवाणीने बोलता आहात. तर, निव्वळ पत्रकार म्हणून मी यावर बोलणार नसून पत्रकार म्हणून आलेल्या अनुभवातून यावर भाष्य करणार आहे.

दिल चाहता है आणि लगान या दोन चित्रपटांवरील समाजशास्त्रीय विश्‍लेषण वगळले तर, चित्रपटांवर मी फारसे लिहिलेले नाही. पण २००० ते २०१३ दरम्यान ‘द इंडियन एक्‍स्प्रेस ग्रुप’चा सीईओ आणि मुख्य संपादक म्हणून काम करताना ‘स्क्रीन’ पुरस्कार सोहळा आयोजित करताना मला अविश्‍वसनीय अशा या जगाचा अनुभव घेता आला. अविश्‍वसनीय अशासाठी की लोकांसाठी, खुले आणि तिकिट विकत घेणाऱ्यांच्या हाती असले तरीही हे जग कमालीचे अपारदर्शी आहे. बाहेरच्या कुणालाही हे जग अभेद्य वाटावे असेच वाटावे कारण सुशांतसारख्या यशस्वी कलावंताच्या हाती अखेर निराशाच आली.

बॉलिवूडला ‘उद्योग’ असे संबोधले जात असले तरी या जगाला गुरुत्व केंद्र नाही. येथील कुणालाही व्यक्ती, संस्था, संघटना, सरकार, प्रसिद्धी माध्यमे यांच्याबद्दल आदर नसेल तर असेच होणार. आतला प्रत्येकजण एकतर मित्र आहे वा शत्रू. बाहेरच्या कुणालाही खरेदी केले जाऊ शकते वा त्यावर बळाचा प्रयोग केला जाऊ शकतो, अशी येथे धारणा आहे. येथे प्रचंड एकटेपण आणि कमालीचा स्वार्थ आहे. ही बाब गटबाजी व घराणेशाहीपेक्षाही घातक आहे.

स्क्रीन पुरस्काराच्या वेळी दरवर्षी माझी व सहकाऱ्यांची प्राथमिक जबाबजारी असायची ती परीक्षक निवडायची व त्यांना मोकळेपणे निवड करू देण्याची. यात कुणीही कोणताही "सूचना'' कधी केली नाही. पण एकदा पुरस्कारांची निवड झाली की मग दबावतंत्र सुरू व्हायचे. भारतातील चित्रपट पुरस्कार हे निव्वळ पुरस्कार नसतात तर ते वाहिन्यांसाठी तासनतास चालणारा आणि पैसा मिळवून देणारा कार्यक्रम असतो. प्रायोजकांकडून पैसा मिळवण्यासाठी रेटिंग हवे असते जे दोन प्रकारे शक्‍य होते. एक- लोकप्रिय नटाला त्या वर्षाच्या हिट गाण्यावर सादरीकरण करायला लावणे व दोन - प्रेक्षकदीर्घेत अधिकाधिक लोकप्रिय चेहरे असणे. यातले पहिले खर्चिक असले तरी सोपे होते. पण दुसऱ्याने त्रास दिला.

एखादा अभिनेता समारंभाला येणार अथवा नाही हे त्याला पुरस्कार मिळाला आहे अथवा नाही यावर अवलंबून असायचे. अमुक एकाला पुरस्कार नसेल तर केवळ तोच नाही तर त्याचा गट वा घराण्याचा समारंभावर बहिष्कार असे. अशाच एका कारणामुळे कदाचित २००४ मध्ये संपूर्ण बच्चन कुटुंबाने समारंभावर बहिष्कार टाकला. २०११ च्या सोहळ्यात "माय नेम इज खान'' या "हीट'' चित्रपटाला एकाही गटात नामांकन मिळाले नाही. हे चूक की बरोबर याचे उत्तर परीक्षकांकडे होते. तर सोहळ्यात रंगमंचावर सादरीकरणासाठी शाहरुख करारबद्ध होता. मात्र, सोहळ्याच्या तीन दिवस आधी बहिष्काराची धमकी सुरू झाली. शाहरुखने प्रत्यक्ष धमकी दिली नसली तरीही चित्रपटाशी संबंधित असलेल्यांकडून त्या येत होत्या. करण जोहर याने फोन करून नाराजी व्यक्त केली. परीक्षकांना हा चित्रपट एकाही पुरस्काराच्या लायकीचा कसा वाटला नाही, असा त्याचा सवाल होता. अनुराग कश्‍यपच्या "उडान'' या "सामान्य'' चित्रपटाची पुरस्कासाठी निवड करण्यात आल्याने बॉलिवूडचा समारंभावर बहिष्कार असेल, अशी धमकी दिली. चॅनलने घेतलेल्या इंटरनेटवरील मतदानातून या चित्रपटाचे नाव पुरस्कारासाठी आले तेव्हा ही धुसफूस थांबली.

२०१२ मध्येही असाच प्रकार घडला. "डर्टी पिक्‍चर'' आणि "जिंदगी ना मिलेगी दोबारा'' या दोन चित्रपटांना पहिला पुरस्कार विभागून घोषित झाला. पण उत्कृष्ट दिग्दर्शक गटात परीक्षकांनी "डर्टी पिक्‍चर''च्या दिग्दर्शकांची निवड केली. झाले. पुरस्काराच्या दिवशी प्रियांका चोप्राने फोन करून ‘जिंदगी’चे कलावंत आणि अन्य सहकारी बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले. या चित्रपटाशी संबंधित कुणीही पुरस्कार घेण्यासाठी यायला तयार नव्हता.

अखेरचा उपाय म्हणून सायंकाळी मी जावेद अख्तर यांना फोन करून फरहानला येण्यास सांगण्याची विनंती केली. तो समारंभाला आला तोच काळा टीशर्ट घालून. पुरस्कार मंचावर जाऊन घेणार नाही असे त्याने स्पष्ट केले. या चित्रपटाचे हक्क असलेल्या इरोस कंपनीच्या क्रिशिता लुल्ला यांना मी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आमंत्रित केले. पण कुणाचाही रोष ओढायचा नसल्याने त्या जागच्या हालल्या नाहीत. २००७ मध्ये उत्कृष्ट अभिनेता म्हणून हृतिक रोशनची निवड करण्यात आली. त्या वर्षी तो मंचावर सादरीकरणही करणार होता. एक तास आधी त्याने सांगितले की, मी मंचावर सादरीकरण तर करेन पण, पुरस्कार स्वीकारणार नाही. त्याच्या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले वडील राकेश रोशन यांच्यावर परीक्षकांनी अन्याय केला, असे त्याचे म्हणणे होते. थोडे समजावल्यानंतर त्याने पुरस्कार स्वीकारला खरा पण, नंतरच्या पार्टीवर बहिष्कार टाकला.

हे मी आता अशासाठी सांगत आहे कारण अशा वातावरणात एखादा बाहेरचा किती एकटा आणि तणावाचा सामना करू शकतो याची सगळ्यांना प्रचिती यावी. काही अपवाद वगळता मोठ्या वर्तमानपत्रांमधील चित्रपट परीक्षणासाठी देण्यात येत असलेले "स्टार रेटिंग'' बोली लावून खरेदी करता येते, आपल्या प्रभाव, गट आणि घराण्याचा फायदा घेत पुरस्कार फिक्‍स करता येतात. याविरुद्ध आवाज उठवायला कुणी बुजुर्ग, संस्था, संघटना, अकादमी कुणीही तयार नाही. त्यामुळेच बाहेरच्यांसाठी हे जग फार तणाव देणारे आहे. सगळी व्यवस्था तुमच्यावर उलटवता येते. 
अनुवाद - किशोर जामकर

Edited By - Prashant Patil

loading image