देणाऱ्यानं देत जावं..!

शिवराज गोर्ले
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

आज ३१ डिसेंबर २०१९; या वर्षाचा शेवटचा दिवस. साहजिकच या सदरातलं हे माझंही शेवटचं लेखन. गेले वर्षभर (रविवार वगळता) मी रोज लिहीत होतो. खरंतर मी कुणी शिक्षणतज्ज्ञ नव्हे, की बालमानसतज्ज्ञही नव्हे. मौज अशी की रूढार्थानं मी ‘पालक’ही नाहीये. तरीही पालकत्व हा माझ्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता, आहे. या संदर्भातली माझी दोन पुस्तकंही प्रकाशित झालीयत.

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
आज ३१ डिसेंबर २०१९; या वर्षाचा शेवटचा दिवस. साहजिकच या सदरातलं हे माझंही शेवटचं लेखन. गेले वर्षभर (रविवार वगळता) मी रोज लिहीत होतो. खरंतर मी कुणी शिक्षणतज्ज्ञ नव्हे, की बालमानसतज्ज्ञही नव्हे. मौज अशी की रूढार्थानं मी ‘पालक’ही नाहीये. तरीही पालकत्व हा माझ्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता, आहे. या संदर्भातली माझी दोन पुस्तकंही प्रकाशित झालीयत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्येष्ठ शिक्षततज्ज्ञ प्रा. रमेश पानसे म्हणतात त्याप्रमाणे, ‘आम्हा तज्ज्ञ मंडळीं’चे नवे विचार, नव्या कल्पना तुम्ही सोप्या शब्दांत हजारो पालकांपर्यंत पोचविण्याचं मोठं काम करीत आहात.’ बस...याच प्रोत्साहनातून ‘सकाळ’च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत काही नवे, वेगळे विचार मी पालकांपर्यंत पोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. प्रतिसाद म्हणाल तर माझ्या अपेक्षेपेक्षा कैक पटीनं अधिक लाभला. ‘तुमचं रोजचे लेख, त्याची कात्रणं आम्ही जपून ठेवली आहेत,’ असं सांगणारे अनेक वाचक भेटले. अनेक वाचक/पालकांनी ‘सकाळ’मध्ये अथवा मला फोन करून ‘लेखन आवडतं आहे आणि उपयुक्त वाटतं आहे,’ हेही कळवलं.

‘मुलांना शिकायचं असतंच, फक्त त्यांच्या कलानं आणि वेगानं,’ हे विशिष्ट सूत्र कळल्यामुळं आमचा दृष्टिकोन बदलून गेल्याचा पालकांचा अभिप्राय खास नमूद करायला हवा. ‘ज्ञान रचनावाद’ सोप्या शब्दांत उलगडल्याचंही काहींनी आवर्जून कळवलं. ‘तुमचं सदर वाचल्यामुळं आम्ही मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं ठरवलंय,’ असंही काही पालकांनी कळवलं. विशेष म्हणजे, एका (व्यवसायानं बिल्डर असलेल्या) पालकांचा हा एसएमएस - ‘गोर्ले सर, घरच्यांचं न ऐकता मी मुलाला हट्टानं इंग्रजी शाळेत घातलं होतं. पण पुढच्या वर्षी मी त्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घालणार आहे. वर्ष वाया गेलं तरी चालेल..’ याहून अधिक काय हवं?
(समाप्त)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle