मुभा आणि मर्यादा (शिवराज गोर्ले)

शिवराज गोर्ले
मंगळवार, 23 एप्रिल 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "EDU" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून..."

बालक-पालक
शिस्त म्हटली, की काही नियम, बंधनं येतातच. मात्र, शिस्तीच्या हेतूनं मुलांवर काही मर्यादा घालत असतानाच त्यांना शक्‍य आणि आवश्‍यक ती मोकळीक देण्याचा विचार करावा लागतो. मुभा आणि मर्यादा यांची योग्य सांगड घालता आली, तर शिस्तीचा प्रश्‍न बराचसा मिटतोच. मोकळीक कुठे आणि किती द्यावी? मर्यादा कुठे आणि कशा घालाव्यात? सुजाण पालक हे नेमकं जाणत असतात. 

पहिली गोष्ट म्हणजे, पोरांचा पोरपणा मान्य करणं. शेवटी मुलं ती मुलंच हे समजून घेणं... ती कपडे खराब करणार, नको तिथे धडपडणार, खोड्या करणार हे स्वीकारणं. (आपणही लहानपणी हे सगळं व्यवस्थित केलेलं असतं.) यापुढची गोष्ट म्हणजे काही वेळा मुलं काहीसं अनपेक्षित, क्वचित विचित्र वागतात, बोलतात. पालक चकित होतात, हलकासा धक्काच बसतो त्यांना. अशा वेळी हे समजून घेतलं पाहिजे की, मुलांच्या मनात जे येतं, त्यावर त्यांचं काही नियंत्रण नसतं. त्यांच्या कल्पना, त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा येत मुदलातच काही योग्य! अयोग्य असं नसतं आणि कसंही असलं तरी त्यांना वाटतं ते व्यक्त करण्याची 

मोकळीक असावी.  मर्यादा हवी ती ते व्यक्त कसं करावं यावर म्हणजेच कितीही राग आला तरी तोडफोड, मारामारी, अपशब्द... याला मुभा नसेल. पण लोडावर गुद्दे मारणं, पाण्यात दगड फेकणं, हातातलं चित्र काळं काळं रंगवणं... याला मुभा असेल. काय केलेलं अजिबात चालणार नाही हे स्पष्ट करतानाच, काय केलं तर चालेलं हे सुचवलं जावं.

शिस्तीच्या नव्या दृष्टिकोनात मुलाच्या भावना आणि वागणं या दोन्हींची वेगळी दखल घेऊन, दोन्हींबाबत मुलांना मदत केली जाते, सपोर्ट दिला जातो. नाही म्हणजे नाही, या धाक दपटशाहीपेक्षा मर्यादा का आवश्‍यक आहे, ते समजून मुलांनी स्वतः ती स्वीकारावी असा प्रयत्न केला जावा. शक्‍यतो मुलाचं मन दुखावू नये असा प्रयत्न असावा; पण काही बंधनं घातल्यानं मुलगा नाराज झाला तर त्याला नाराज होण्याची मुभा असावी. ‘काही नकोय लगेच तोंड वाकडं करायला,’ असं आणखी बंधन घालण्याची गरज नसते. पालकांच्या असा समतोल, समंजस वागण्यातूनच मुलांना खरी शिस्त लागू पडते. आई-बाबा ओरडतात म्हणून नव्हे, तर असं वागणं बरोबर नाही. हे मुलांना जाणवलं तरच ती शहाणी होतात, शिस्त शिकतात. धाकदपटशानं मुलांना फक्त तात्पुरती शिस्त लावता येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Shivraj Gorle Edu Supplement Sakal Pune Today