भावप्रज्ञेचं ‘वादातीत’ महत्त्व (शिवराज गोर्ले )

शिवराज गोर्ले 
सोमवार, 13 मे 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "Edu" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
यशामध्ये बुद्‌ध्यंकाचा वाटा २० टक्के असतो, तर भावनांकाचा - अर्थात भावनिक बुद्धिमत्तेचा ८० टक्के असं डॅनिअल गोलमन म्हणतात. त्यांच्या या संशोधनामुळे फार मोठी कोंडी फुटली आहे. एक महत्त्वाचा ‘ब्रेक थ्रू’ मिळाला आहे. बुद्‌ध्यंक काहीसा कमी असणाऱ्या लक्षावधींना तुम्हीही आयुष्यात यशस्वी होऊ शकता हा मोठा दिलासाच मिळाला आहे. शिक्षणात चमकू न शकलेल्या, एवढंच काय नापास झालेल्या, अगदी ‘ढ’ ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून देण्याची नवी उमेद मिळाली आहे. अर्थात त्याचबरोबर कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक जीवनात अधिक प्रभावी व यशस्वी होण्यासाठीची दिशा गवसली आहे.

तरीही - सर्वच नव्या संकल्पनांप्रमाणे ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या संकल्पनेचीही हेटाई करणारी मंडळी आहेतच. हे एक नवं खूळ आहे, फॅड आहे. सामान्य बुद्धीच्या मंडळींना फुकाचा दिलासा देणारी ही मखलाशी आहे, असंही काहींना वाटतं. ‘शेवटी टॅलेंट ते टॅलेंटच हो... प्रतिभा ती प्रतिभा. टॅलेंट, प्रतिभा नसेल तर नुसत्या काय भावना ओळखण्यावर आणि हाताळण्यावर यश मिळू शकतं का-’ असा त्यांचा रोखठोक सवाल असतो.

यावर पहिलं उत्तर असं आहे, की प्रश्‍न फक्त परीक्षेतील यशाचा नाहीये- परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणारे कितीजण विविध क्षेत्रांतही सर्वोच्च पदांवर पोचतात? जे पोचत नाहीत ते नेमके कशामुळे मागे राहतात? हे प्रश्‍न महत्त्वाचे आहेतच - पण एक वादातीत ‘सत्य’ आहे - जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ‘भावप्रज्ञे’चं महत्त्व असतंच. केवळ महत्त्वाच्या टप्प्यांवरच नव्हे तर प्रतिदिनी, प्रतिक्षणी ही भावप्रभा कामी येत असते. आपण दैनंदिन जीवनात इतरांशी वागतो कसं, बोलतो कसं हे ‘भावप्रज्ञा’च ठरवीत असते. छोटे-छोटे निर्णय असोत, की मोठे आणि महत्त्वाचे ते ‘भावप्रज्ञे’च्या आधारेच घेतले जात असतात. आपलं वर्तन, आपली प्रत्येक कृती, प्रत्येक प्रतिक्रिया ‘भावप्रज्ञेतू’नच ठरत असते. दैनंदिन जीवनात अक्षरशः पदोपदी आपलं ‘भावनिक शहाणपण’ पणाला लागत असतं. तेव्हा त्याचं भान ठेवणं, ते जोपासणं हेच शहाणपणाचं ठरतं. हे भान प्रथम पालकांना आलं तरंच ते मुलांनाही भावनिकदृष्ट्या शहाणं करू शकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today