अश्रू एका अंतर्मुख पित्याचे... (शिवराज गोर्ले)

शिवराज गोर्ले
मंगळवार, 14 मे 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "Edu" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून..

बालक-पालक
‘ऐकशील बाळा, मी काय म्हणतोय ते... गाढ झोपलेल्या तुला पाहून आता मला काय वाटतंय ते? दिवसभर सारखा टोकत होतो तुला. साध्या साध्या कारणांसाठी रागवत होतो. तू अंघोळ स्वच्छ केली नाहीस, तुझ्या वस्तू इकडे-तिकडे पडल्या होत्या, तुझ्या फक्त चुका, तुझे दोषच दिसत होते मला. पण तू? मी ऑफिसला जाताना, तू खेळात मग्न होतास तरी मला प्रेमानं ‘टाटा’ केलास. आणि मी? मी त्यावेळीही तुझ्यावर गुरगुरलो, ‘पोक काढू नकोस, खांदे मागे घे, बावळट कुठचा!’

संध्याकाळी घरी परतल्यावरही मी एखाद्या छुप्या हेरासारखा तुझ्या मागावर आलो. तू जमिनीवर गुडघे टेकून गोट्या खेळत होतास. तुझ्या हातापायांना माती लागली होती. तुझे मोजे फाटले होते. मी भडकलो. तुझा खेळ थांबवून तुझ्या मित्रासमोरून, एखाद्या कैद्यासारखं दरादरा ओढीत घरी आणलं आणि सुनावलं, ‘एवढे महागाचे मोजे फाडलेस? ‘तुला कळत नाही का कार्ट्या, पैसा मिळवायला किती कष्ट लागतात ते!’

आणि तरीही...
रात्री मी कामाचे काही पेपर्स वाचत असतानाच तू घाबरत घाबरत आलास. मी कामात असताना तू आलास म्हणून मी तुझ्यावर खेकसलो, ‘काय हवंय तुला आता?’ तू काही बोलला नाहीस. धावत आलास आणि गळ्यात हात टाकून माझा पापा घेतलास आणि पळून गेलास... तुझ्या स्पर्शातलं ते आपलेपण... तो जिव्हाळा... त्या दैवी स्पर्शानं मला अंतर्मुख केलं. मला उमजलं, तू लहान आहेस, तुझं वागणं, तुझं चुकणं, तुझं खेळणं, तुझ्या खोड्या... हे सारे तुझ्या बाल्ल्याचे सहजसुंदर आविष्कार पाहणं, त्याची अनुभूती घेणं हेच माझ्या पितृत्वाचं सार्थक आहे, हे विसरून गेलो आणि माझ्या वयाच्या फूटपट्टीनं तुझं वागणं मोजत, तुझ्यावर खेकसत राहिलो. तरीही, तुझ्या इवल्याशा हृदयात महन्मंगल असं काहीतरी आहे म्हणूनच तू धावत आलास आणि माझा पापा घेतलास. 

म्हणून बाळा, तू झोपल्यावर मी तुझ्यातील बाल्याची, चैतन्याची, निरागसतेची क्षमा मागतोय! आता माझ्या ओठांवर अविचारी, रागीट, टोचणारे शब्द येतील तेव्हा जीभ आपोआप चावली जाईल. मी स्वतःला बजावेन की, अरे लक्षात ठेव, हा एक निरागस लहानगा आहे. मी असं वागलो, की तू जणू प्रौढच आहेस आणि तू अशा शिस्तीनं वागावंसं की, जे अनेक प्रौढांनाही जमत नाही, अशी अपेक्षा केली. खरंच सोनुल्या... मी तुझ्याकडून फार, फार अपेक्षा केली रे...

(‘फादर फरगेट्‌स’ या गाजलेल्या लेखाचा डॉ. रमा मराठे यांनी केलेला संक्षिप्त भावानुवाद)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today