एका ‘फटक्‍या’त शिस्त?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
तिकडं अमेरिकेत वगैरे असतील. पण, आपल्याकडंही मुलांना एकही फटका न लगावणारे पालक असतात का? असतात... कदाचित अल्पसंख्य असतील अजूनही. पण, निश्‍चित असतात. हे असे पालक मुलांना हातही न लावता शिस्त कशी लावू शकतात, याचं बहुसंख्य पालकांना नवल वाटतं. कधीतरी एखादा फटका लगावणं, यात काय गैर आहे, असं पालकांचं मत असतं.

प्रत्यक्षात फटका दिल्यानं साधतं काय?
काही वेळा छोट्याशा चुकीसाठीही (दुसरा कुठला तरी राग काढण्यासाठी) त्राग्यातून फटका दिला जातो. हे तर नक्कीच टाळायला हवं. बरं, फटका दिल्यानं शिस्त लागतेच, असं नाही. कारण, ती तशी फारच सोपी शिक्षा ठरते. काय एक फटका बसेल एवढंच, ही भावना मुलांच्या मनात निर्माण झाली की संपलंच. नेहमीच फटके सुरू राहिले, तर मुलं कोडगीही बनू शकतात. दुसऱ्या बाजूनं पालकांची काय परिस्थिती असते? फटका दिल्यानंतर, मुलाला मारल्यानंतर पालकांना अस्वस्थ का वाटत राहतं? असे कुठले पालक असतात ज्यांना मुलांना चार रट्टे लगावले की बरं वाटतं? एकंदरीत फटक्‍यानं फारसं काही साधत नाही, असंच म्हणावं लागेल. मग पालकांनी करावं काय? त्यासाठी काही मोलाच्या सूचना अशा...

रागासाठीचे पर्याय वापरा
मुलांचा राग येणं, हा काही पालकांचा गुन्हा नव्हे. पण, राग व्यक्त कसा करावा, यावर नियंत्रण हवंच. त्यासाठीचे पर्याय क्रमाक्रमानं वापरता येतात. आला राग की दिला फटका, असं नकोच. तरीही फटकाच द्यावा, असं वाटण्याइतका राग येईल तेव्हाही मुलांना प्रथम त्यांच्या वागण्याचा तुम्हाला का राग आलाय, त्याचा नेमका काय त्रास होतोय ते शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तरीही ऐकलं नाही, तर तेच रागावून सांगा. त्यानंतर मात्र फटका मिळेल, ही सूचना द्या. एवढा संयम पालक खरोखरीच पाळू शकले, तर फटका देण्याची गरजही उरत नाही.

मुलांशी संवाद साधा
मुलांचं वागणं चुकीचं असलं, तरी थोड्याशा रास्त धाकानं मुलांना त्यांची चूक समजावून देणं शक्‍य असतं. वाद घालून नव्हे, तर आवश्‍यक व योग्य तेवढाच युक्तिवाद करून मुलाला त्याचा हटवाद समजावून देता येणं, याहून रास्त शिक्षण नाही. ऐकण्याच्या बदल्यात मुलांना काहीतरी तोलामोलाचं मिळावं लागतं. हे तोलामोलाचं म्हणजे आई-बाबाचं प्रेमच असू शकतं. दुसरं काही नव्हे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today