शिक्षणात शिक्षेला स्थान नसावं

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
मुलांना शाळेत एखादी नवी गोष्ट शिकवली जाते तेव्हा काय होतं? ती शिकताना त्यांना कोणत्या अडचणी येतात? उत्तर अगदी सरळ आहे. एखादं नवं शास्त्र, नवी संकल्पना, व्याख्या जेव्हा समजून घ्यायची असते, तेव्हा वर्गातल्या काही मुलांना ती लवकर समजेल तर काही मुलांना उशिरा समजेल... काही मुलांना सरावाची गरज भासेल. हे प्रत्येक मुलाच्या आकलनाची पातळी वेगळी असते, इकडे दुर्लक्ष करून जर एखाद्या मुलाला आलं नाही; या कारणासाठी शिक्षक मुलांना शिक्षा देत असतील तर ते मुलांवर अन्यायकारक नाही का? मुलांचा हा अपमान नाही का?

त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा की, शिक्षा केल्यामुळे मूळ प्रश्‍न सुटला का? शिक्षा केल्यामुळे मुलाला जे समजलं नव्हतं, ते लगेच समजलं का? शिक्षेनं अशा पद्धतीनं झटपट शिक्षण झालं असतं, तर शिकण्याचा तोच एक मार्ग आजवर अवलंबला गेला नसता का? शिक्षणात शिक्षेला स्थान नसावं असं (बहुतेक) सर्वच शिक्षणतज्ज्ञ सांगत असतात, त्यातलं तथ्य ध्यानात घेऊनच शिक्षकांनी, पालकांनी आपलं वागणं, आपला व्यवहार ठेवला पाहिजे.

रुसो या विचारवंताचा शिक्षा या प्रकाराला ठाम विरोध होता. सर पर्सीनन म्हणतात, शिक्षा देऊन किंवा शिक्षेची भीती दाखवून मुलं सुधारतील, ही शुद्ध रानटी समजूत आहे. मादा मॉन्टेसरी यांनी शाळेतलं वातावरण निर्भय असलं पाहिजे, हे सांगून शंभर वर्षे लोटली तरी शाळेतलं वातावरण फारसं बदललेलं नाही. ते बदलायला तर हवंच.

मुलं दुखावतील अशा प्रकारच्या शिक्षा पालकांनी करू नयेत. यासाठी प्रथम शिक्षकांचं स्वतःच्या मनावर नियंत्रण हवं... ते पुरेसं नसेल तर पालकांचं आणि समाजाचं दडपण हवं. अर्थात साधारणतः शिक्षा ही सहजमान्य असते याचं कारण हाच दृष्टिकोन असतो की- जसं चांगल्या कामाचं कौतुक व्हावं, प्रेरणा व प्रोत्साहन मिळावं म्हणून शाळेत विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्याची पद्धत असते, त्याचप्रमाणे वाईट वर्तन, अनियमितता, शाळेच्या नियमांचं उल्लंघन... यासाठी शिक्षा देण्याची पद्धत असते, हा दृष्टिकोन कितपत योग्य समजावा?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today