व्यक्तिमत्त्व विकास ‘आतून’ व्हायला हवा!

Edu
Edu

बालक-पालक
मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाविषयी विचार करताना पहिला प्रश्‍न येतो, व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय? तर व्यक्तिमत्त्व हे अनेक पैलूंनी बनत असतं. तुमचं बर्हिरंग, तुमची प्रकृती, तुमची प्रवृत्ती, तुमचा स्वभाव, तुमचे विचार, भावना, सवयी, तुमचं वर्तन, तुमच्या आवडीनिवडी... अशा अनेक घटकांचं एकजीव मिश्रण म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व!

व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बर्हिरंग, बाह्यरूप नव्हे. नीटनेटकं राहणं, उत्तम वेशभूषा करणं, ऐटीत चालणं, वागण्या-बोलण्यात डौल असणं ही सगळी व्यक्तिमत्त्वाची बाह्य लक्षणं आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ती पुरेशी नसतात. तुम्ही छान बोलू शकत असाल तर उत्तमच, पण तुम्ही मनापासून बोलता का? तुम्ही चलाख, चतुर आहात की प्रामाणिक आहात?

व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे बाह्य सजावट नव्हे, दिखावा नव्हे. खरं व्यक्तिमत्त्व हे तुमच्या अंतरंगाचं प्रतिबिंब असतं. तुमचं अंतरंग हाच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा असतो. पाया असतो. तो भक्कम हवा म्हणूनच हे लक्षात ठेवा ः ‘व्यक्तिमत्त्व विकास हा आतून व्हायला हवा.’

बालभवन उपक्रमाद्वारे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शोभा भागवत म्हणतात, ‘‘आपल्याला सध्या वरवरचा विकास सहज कळतो आहे; पण व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया आत आणि बाहेर दोन्हीकडं सुरू असते. तीही आयुष्यभर. बाहेरचं कार्य, कौशल्य, बोलणं, वावरणं, लेखन इतकंच आतलं मन समृद्ध आहे का, संवेदनक्षम आहे का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.’’

आजच्या सगळ्या वरवरच्या शिक्षणानं मुलांचं सामान्यज्ञान वाढतं. मेंदू तयार होतो. पण मन, हृदय, मूल्यं... याचं काय? आपल्याला नुसती बोलकी, स्मार्ट, चटपटीत प्रश्‍न विचारणारी, बौद्धिक चमक दाखवणारी मुलं हवीत की आतून समृद्ध असणारी, शांत सखोल मूल्यं जपणारी मुलं हवीत? आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केवळ अनेक अनुभव देऊन होणार नाही, संस्कार शिबिरांना पाठवून होणार नाही, तर त्यांचा आतला विचार वाढू देणं, आतली समृद्धी वाढू देणं यातून होईल. बाहेरचे अनुभव त्याला मदत करतील, पण उरलेलं काम पालकांनीच करायचं आहे, त्यासाठी पालकांची व्यक्तिमत्त्वही समृद्ध हवीत, विकसित हवीत. झाडांबद्दल असं म्हणतात की झाडं काही काळ पानांचा विस्तार वाढू देतात व मग काही काळ मुळं वाढण्यासाठी देतात. आपण आज मुलांची मुळं वाढण्याकडं लक्ष देत नाही. पानांचा विस्तार मात्र प्रचंड. अशी झाडं उन्मळून नाही का पडणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com