जपा तुमच्यातले ‘लहान मूल’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
तुम्ही ‘पालक’ असलात, तरी कुठेतरी ‘बालकं’ही आहात याची तुम्हाला कल्पना आहे का? जाणीव आहे का? नसेल तर तुम्ही ती स्वतःला करून द्यायला हवी. एवढंच नव्हे, तुम्ही तुमच्यातल्या ‘बालका’लाही जपायला हवं. त्याच्याकडंही पुरेसं लक्ष द्यायला हवं. होय, अगदी खरंय. प्रत्येक मोठ्या व्यक्तीत एक लहान मूल दडलेलं असतं. ते कधीतरी अचानक उसळी मारतं तेव्हा आपण काय करतो? लहान मुलासारखं वागतो, रुसून बसतो, हट्ट करतो, मग इतरांची बोलणीही खातो. 

हे खरंय की जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसा आपला बालिशपणा कमी होत जातो. आपण प्रगल्भ होत जातो. विचारपूर्वक, विवेकानं निर्णय घेऊ लागतो. कमावू लागतो. जबाबदार होतो. पालकत्व हीसुद्धा तुम्ही स्वीकारलेली जबाबदारीही असते; पण आपण पुनःपुन्हा पाहतो आहोत, की ती आनंदानं निभावण्याची जबाबदारी आहे. मुलांइतकाच आपलाही आनंद महत्त्वाचा असतो. 

म्हणूनच आनंद कसा घ्यावा, हेही आपण मुलांकडून शिकायला हवं. खरंतर ते आपल्यात दडलेल्या ‘लहान मुला’ला माहिती असतंच. ते दडलेलं मूल आपण दडपून टाकतो. मोठं होण्याच्या नादात आपल्यातलं मूल हरवून बसतो. त्याबरोबरच हरवतो आपल्यातला निरागसपणा, आपल्यातलं जन्मजात कुतूहल, आपल्यातला खेळकरपणा, खोडकरपणा अन्‌ आनंदही.

‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे!’ हे ऐकलंय आपण. पण खरं तर हा बाणा प्रत्येक प्रौढाचा हवा, प्रत्येक पालकांचा हवा. तरच तुम्ही मनापासून हसू शकाल, आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचाही भरभरून आनंद घेऊ शकाल. ओशो म्हणतात, ‘‘तुमच्यातलं लहान मूल कधीच हरवू देऊ नका. त्याला जपत राहा. ते नियंत्रणाबाहेर जाईल, अशी भीती बाळगू नका. ते कुठेही जाईल आणि गेलं थोडं नियंत्रणाबाहेर तरी काय बिघडतं? अशा वेळी तुम्ही काय करू शकता? तुम्ही वेड्यासारखं नाचू शकता, वेड्यासारखं हसू शकता. वेड्यासारख्या उड्या मारू शकता. लोकांना वाटेल तुम्हाला वेड लागलंय. पण तो त्यांचा प्रश्‍न आहे. यातून तुम्हाला आनंद मिळत असेल तर घेत राहा!’

तुमच्यातलं ‘मूल’ तुम्ही जपलंत, तर त्याच्याशी तुमच्या प्रत्यक्षातल्या मुलाचीही छान गट्टी जमू शकते. मुलांबरोबर तुम्ही नेहमीच पालक भूमिकेत राहिलं पाहिजे असं थोडंच आहे.’ कधी तरी मुलासोबत मूल होऊन खेळा... पळा...
थोडा बहुत दंगाही करा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today