समृद्ध व्यक्तिमत्त्वासाठी ‘काल शिक्षण’हवंच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 June 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
‘कले’ला जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडं नेणारी प्रक्रिया आहे. जीवनाकडं पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन कलेमुळं प्राप्त होतो. नवनिर्मितीत व सौंदर्योपासना यामुळं व्यक्तीचं जीवन बहरून येतं. माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. कारण मन आणि मेंदू यांचा समन्वय साधून तो कलेद्वारे अभिव्यक्त होत असतो. हे सारं मुलांपर्यंत पोचवायचं असल्यास त्यांना कलांचं शिक्षण द्यायला हवं. मुलांसाठी कला शिक्षणाची गरज अधोरेखित करताना अपर्णा कुलकर्णी यांनी ‘शिक्षणवेध’मध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. 

कला ही जागतिक भाषा आहे. कुणीही व्यक्ती कलेचा आस्वाद घेऊ शकते. रंग, रेषा, आकार, लय, स्वर, ताल यांच्या अनुभवानं मन उल्हसित होतं. संगीत, चित्रकला, नृत्य इत्यादी कलांचे मनावर होणारे सकारात्मक परिणाम संशोधनातून सिद्ध झाले आहेत. 

मूल निसर्गतःच घरात बोलली जाणारी भाषा आत्मसात करतं. मात्र, आपल्या भावना बोलून व्यक्त करत नाही. शब्दांपेक्षा त्याला रंग, रेषा, आकार यांची मैत्री अधिक सुखावते व सोईस्कर असते. 

मूल आपल्या चित्रातून व्यक्त होतं. चित्र हा बालमनाचा आरसा असतो. म्हणूनच प्रत्येक चित्र हे त्या त्या मुलाचं वैयक्तिक असतं. मुलांची अभिव्यक्त होण्याची ऊर्मी जबरदस्त असते. मात्र, भाषिक क्षमता मर्यादित असते. त्यामुळंच मुलं अन्य माध्यमातून व्यक्त होण्याचा मार्ग शोधतात. याचा बालविकासात खूप महत्त्वाचा वाटा असतो. 

मुलांमध्ये कला शिक्षणातून समस्या निराकरण कौशल्य, चिकित्सक व तार्किक विचार क्षमता, संवेदनशीलता अशा अनेक गोष्टी साध्य करता येतात. संगीत शिक्षणामुळं मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होते. विशेषतः वाद्य शिकल्यामुळं मुलांची ग्रहणशक्ती वाढते. वाचण्याची क्रिया सुधारते.

निर्मितिक्षमता वृद्धिंगत होते. आज विद्यार्थ्यांवरील ताण वाढत आहेत. अशा परिस्थितीत कलांचं शिक्षण दिल्यास मुलांच्या मनावरील ताण हलका करता येईल. कला शिक्षण हे आयुष्यासाठी निरुपयोगी ही विचारधारा चुकीची आहे. कलांशी बालवयापासून संबंध आला तर एक उच्च अभिरुचिपूर्ण, उच्च विचारांचं समृद्ध व्यक्तिमत्त्व घडतं. आजच्या आणि उद्याच्या जगासाठी मन, बुद्धी, मेंदू उत्तम घडलेला विद्यार्थी तयार होणं आवश्‍यक आहे. त्यासाठी कलानुभवांचं, कलाशिक्षणाचं महत्त्व वादातीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today