शिक्षेचा ‘योग्य’ परिणाम नसतोच!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 July 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
‘मुलांना शिक्षा देण्याची गरज नसते,’ असं समरहिल शाळेचा संस्थापक ए. एस. नील म्हणतो. स्वतः नीलनं भरपूर शिक्षा भोगल्या होत्या आणि (पूर्वी) दिल्याही होत्या. त्याचा जन्म खेड्यातल्या एका शाळा मास्तरच्या पोटी झाला, ज्यांना ‘छडी मास्तर’ म्हणूनच ओळखलं जाई. ते नीललाही चांगला चोप देऊनच काम करवून घेत. पुढे नील स्वतःही शिक्षक झाला. त्याला अशाच एका निर्दयी मुख्याध्यापकाच्या हाताखाली सहायक शिक्षक म्हणून काम करावं लागलं. तिथे त्याला स्वतःच्या इच्छेविरुद्ध विद्यार्थ्यांना मार द्यावा लागत असे. अशी पार्श्‍वभूमी असलेला नील शिक्षेच्या संदर्भात जे मुद्दे, जी निरीक्षणं मांडतो, ती निश्‍चितच विचारार्ह ठरतात. तो म्हणतो - शिक्षा कधीही न्यायानं दिली जाऊ शकत नाही, कारण मुळात कोणतीही व्यक्ती न्यायी असू शकत नाही. न्याय याचा अर्थ परिपूर्ण समज. ती कोणाला असू शकते? आपण जर स्वतःलाही पूर्ण जाणून घेतलेलं नसतं. हे स्पष्ट करताना नील म्हणतो - आपल्या दबलेल्या इच्छा-आकांक्षा असतात त्या आपल्याला ओळखता येत नाहीत. एखाद्या मुलाचा राग येऊन आपण त्याला शिक्षा करतो, त्याच्यावर राग काढतो, तो खरं तर इतर कशाचा तरी किंवा कुणाचा तरी असतो. अशा वेळी केलेली शिक्षा न्याय्य कशी ठरेल? म्हणूनच नील म्हणतो, आता मला अनुभवामुळे हे कळलं आहे, शिक्षेची गरज नसते. शिक्षा ही नेहमीच तिरस्कारातून उद्‌भवलेली असते.

शिक्षा करण्याच्या क्रियेमध्ये शिक्षक वा पालक त्या मुलाचा द्वेष करत असतात आणि मुलाला ते बरोब्बर समजतं. शिक्षेमुळे एक दुष्टचक्र निर्माण होतं. अधिकाधिक द्वेष मुलांच्या मनात निर्माण होतो. ज्यानं शिक्षा भोगली आहे ते मूल मोठेपणी शिक्षा करणारा बाबा किंवा शिक्षा करणारी आई बनतं. अत्यंत कडक शिक्षा झालेली मुलं एकतर आपलं चैतन्य गमावून बसतात किंवा बंड करून समाजविरोधी बनतात. शिक्षेमुळे केलेल्या चुकीबद्दल जी सद्सदविवेकबुद्धीची टोचणी असते तीमधून मुक्ती मिळते. मी मोजली की चुकीची किंमत- आता काय! अशी भावना होते. थोडक्‍यात, कुठल्याही दृष्टीनं शिक्षेचा सुयोग्य परिणाम झालेला दिसत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today