शिस्त हवीच; पण कशी?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
‘मुलांना काय वाट्टेल ते करायला मोकळीक देणारी शाळा,’ असं ‘समरहिल’बद्दल म्हटलं जायचं. मुळातच ‘उनाड मुलांची शाळा’ असा जिचा लौकिक, ती शाळा स्थापन करणाऱ्या नीलची शिस्तीविषयीची मतं जाणून घेणं नक्कीच ‘इंटरेस्टिंग’ ठरेल! 

मुलांसाठी शिक्षा नकोतच म्हणतो नील, पण शिस्त तरी हवी की नाही? शिस्त नसल्यास मुलांमध्ये आज्ञाधारकपणा कसा येईल? यावर नीलचे परखड प्रश्‍न असे- आज्ञाधारकपणा हा काय गुण मानायचा का? का आज्ञा पाळायच्या मुलांनी? मोठ्या माणसांची सत्तेची, अधिकारशाहीची इच्छा भागवण्यासाठी? मुळात आज्ञा द्याव्याच का लागतात? 

नीलच्या ‘समरहिल’मध्ये ना अधिकारशाही आहे ना आज्ञापालनाची सक्ती. प्रत्येकाला, मग तो विद्यार्थी असो की शिक्षक, स्वतःला आवडेल ते करण्याची पूर्ण मुभा आहे. अट एकच- हवं ते करा, पण त्यामुळं इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्या. ती तुम्ही घेतली नाहीत, तर उद्या तुमच्या स्वातंत्र्यावर कुणी अतिक्रमण केल्यास तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार नसेल! थोडक्‍यात स्वयंशिस्त हवी. तीच तर खरी शिस्त. शिस्त ही अंतःस्फूर्तीत पाळली जावी, कुणी लादलेली नसावी. ‘शिस्त हे ध्येयाकडं नेणारे साधन आहे,’ हे नीलही मान्य करतो. पण त्या संदर्भात ‘शिस्ती’ची दोन उदाहरणं देतो. 

पहिलं सैन्याचं. सैन्यातली शिस्त ही युद्धातली कार्यक्षमता वाढवण्यासाठी असते. ती तिथं आवश्‍यक असते, पण अशा तऱ्हेच्या शिस्तीमुळं व्यक्ती उद्दिष्टापेक्षा गौण ठरते. अशी सैनिकी शिस्त संस्थांमध्ये, शाळांमध्ये, कुटुंबांमध्ये कशी चालेल? 

दुसरं उदाहरण आहे वाद्यवृंदाचं. वाद्यवृंदामध्ये प्रत्येक वादक आनंदानं व स्वेच्छेनं मार्गदर्शकाची सूचना/आज्ञा पाळतो. तिथे भीती/दबाव नसतो. ‘आपला कार्यक्रम उत्कृष्ट व्हावा,’ हीच तळमळ प्रत्येकाच्या मनात असते. शिस्त हवी वाद्यवृंदातल्या या शिस्तीसारखी. शाळेत चांगले शिक्षक असतील, कुटुंबात आनंदी वातावरण असल्यास मुलांकडूनही शिस्त आपोआप पाळली जाते. मुलं शहाणी असतात. ती प्रेमाला प्रेमानं प्रतिसाद देतात आणि द्वेषाला द्वेषानं. ‘शिस्ती’च्या संदर्भात नील पालकांना इशारा देतो, ‘लक्षात ठेवा, साखळी बांधल्या बांधल्या चांगल्या कुत्र्याचा वाईट कुत्रा होत असतो.’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today