मुलं व मोठे समान असतात?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 July 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
‘प्रत्येक मूल हे असं आंतरिक अस्तित्व असतं, ज्यात विकासासाठीचा स्वभाव आणि क्षमता असतातच. फक्त त्या क्षमतांचं त्याला भान द्यायचं असतं. स्वतःलाच ‘जाणून’ घेण्यात त्याला मदत करायची असते,’ असं योगी श्री अरविंदांनी म्हटलं आहे. शिक्षण म्हणजे काय, हे स्पष्ट करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘शिक्षण म्हणजे प्रत्येकाच्या ठायी जे पूर्णत्व आधीचेच विराजनमान आहे, त्याचे प्रकटीकरण.’ 

प्रत्येक मुलाला स्वतंत्र अस्तित्व असतं. मूल म्हणजे मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नव्हे. मूल कितीही छोटं असो त्याचं वय कितीही असो, ते त्या वयाचं एक पूर्ण व्यक्तिमत्व असतं. त्या वयाला आवश्‍यक त्या क्षमता त्याच्याकडं असतातच. थोडक्‍यात, लहान मुलं व मोठी माणसं (सारखी दिसत नसली) तरी समान असतात. हे सारं तत्त्वतः मान्य झालं तरी प्रत्यक्षात आणणं कठीण. तेही थोडं थोडकं नव्हे, खूपच कठीण असतं. 

घर असो, शाळा असो, ‘मुलांनी मोठ्यांचं ऐकायचं असतं.. मोठ्यांचा आदर ठेवायचा असतो.. नियम मोठ्यांनी करायचे आणि मुलांनी ते पाळायचे असतात.’ 

मुलांसाठी ‘योग्य’ काय हे फक्त मोठ्यांनाच कळत असतं, हेच सुरू असतं. नीलची ‘समरहिल’ मात्र अपवाद आहे. विश्‍वास बसू नये इतकी. म्हणूनच त्या ‘प्रयोगा’मधून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. ‘समरहिल’मध्ये मुलं आणि शिक्षक समान पातळीवर मानले जातात. शाळेचे सर्व नियम, शाळेच्या सर्वसाधारण सभेत, संपूर्ण शाळेच्या मतदानानं ठरतात. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रत्येक एक मत असतं. नील शाळेचा संस्थापक असला तरी सर्वसाधारण सभेत सहा वर्षांच्या मुलाच्या मतालाही नीलच्या मताइतकीच किंमत असते. कुणाच्या चुकीच्या वर्तनाबद्दल तक्रार आली, तर शिक्षा ही (मुलांसह) सर्वांनीच ठरवायची असते. नीलला काही मुलांचा त्रास झाला, तर त्यालाही थेट कारवाई करता येत नाही. सभेतच अडचण मांडावी लागते. 

समरहीलमध्ये सर्वांना समान हक्क असतात. नीलचा पियानो वाजवायची कुणाला परवानगी नसते आणि कोणत्याही मुलाची सायकल त्याच्या परवानगीवाचून चालवण्याची नीलला मुभा नसते. मुलांच्या मनात मोठ्यांबद्दल भय नसतं. ती शिक्षकांना घाबरत नाहीत. मौज म्हणजे, शिक्षकांना रागावण्याची वेळही येत नाही. प्रत्येक शिक्षकाला व सेवकाला पहिल्या नावानं संबोधलं जातं. 

‘समरहिल’ची मुलं स्वतंत्र विचारसरणीची होतात यात नवल ते काय? त्यासाठी मुलांमध्ये निर्भयता अपेक्षित असते, ती खऱ्याखुऱ्या समानतेतूनच येत असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today