शाळा मुलांसाठी, मुलं शाळेसाठी नव्हे!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 August 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
औपचारिक किंवा ‘कराव्या लागणाऱ्या’ शिक्षणासाठी शाळा आवश्‍यक असतातच. प्रश्‍न आहे तो शाळा कशा असाव्यात याचा. या संदर्भात नीलच्या ‘समरहिल’ शाळेचं उदाहरण टोकांच वाटेल. सर्वच शाळा अशा होण्याची शक्‍यता नाही. नीलचे काही क्रांतिकारक विचार सर्वांनाच स्वीकारार्ह वाटतील, असंही नाही. नीलवर टीकाही होत होतीच. एक मात्र निश्‍चित, एका विलक्षण वेगळ्या शाळेचा प्रयोग नीलनं खूप यशस्वी करून दाखवला. त्याचे विचार, त्याचं निरीक्षण, त्याचा अनुभव यांतून मूलभूत स्वरूपाचं असं व खूप काही शिकता येईल. पालकत्व मुलं, शिक्षण, विकास या संदर्भातला आपला दृष्टिकोन अधिक खुला होऊ शकेल. 

नीलला वेगळी शाळा का काढावीशी वाटली? त्याला जाणवलं की, आजवर शाळांमध्ये मुलानं भविष्यात काय व्हावं अन्‌ त्यानं कसं शिकावं याबाबतच्या प्रौढाच्या चुकीच्या संकल्पनेवर आधारित शिक्षण दिलं जातं. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञान या विषयीचं अज्ञान त्याला कारणीभूत आहे. म्हणूनच त्यानं ठरवलं - 

  मुलांना मुलांसारखं वागण्याची मुभा देईल अशी शाळा असावी. 
  मुलांप्रमाणं शाळेनं बदलायचं, शाळेत फिट होण्यासाठी मुलांनी बदलायचं नाही. 
  शाळेनं मुलात मिसळायचं, मुलानं शाळेत नाही. 

हे साधण्यासाठी ‘समरहिल’ ही शाळा नीलनं सुरू केली. त्या संदर्भात तो म्हणतो, ‘सर्व प्रकारची शिस्त, मार्गदर्शन, सूचना, नैतिकतेची शिकवण आणि धार्मिक शिक्षणाला आम्ही फाटा दिला. आम्हाला लोक धाडसी म्हणतात, पण गरज धाडसाची नव्हती, गरज होती ती फक्त ‘मूल दुष्ट नसतंच, ते चांगलंच असतं,’ अशा पूर्ण विश्‍वासाची. हा विश्‍वास आमच्या मनात सुरवातीपासूनच होता. आमच्या प्रयोगात चाळीस वर्षांहून अधिक काळ तरी मुलांच्या चांगुलपणावरच्या आमच्या विश्‍वासाला कधीही तडा गेला नाही. आज ती आमची अविचल श्रद्धा झाली आहे. 

सर्वच शाळा अशा असू शकणार नाहीत, पण आजच्या पारंपरिक शिस्तशीर आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शाळांमध्ये खरंच ‘शिकतात’ का? मुलांकडं व्यक्तिगत लक्ष दिलं जातं का? शिक्षण ताणरहित आनंदादायी असतं का? जी मुलं वर्गाबरोबर शिकू शकत नाहीत, त्यांच्या बाबतीत शाळेचं काय धोरणं असतं? शाळा म्हणजे शिक्षित मुलांचा कारखाना नव्हे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शाळा मुलांसाठी असते, मुलं शाळेसाठी नव्हे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today