संधी देणाऱ्या शाळा हव्यात!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
प्रत्येक मूल चांगलं शिकू शकतं. प्रत्येक बालकाला उपजत शिकण्याची आवड असते. तरीही ते शाळेत जायला ‘का-कू’ का करते? 

ते मूल शिकायला उत्सुक असतंच, प्रश्‍न आहे शाळा त्याला आनंदानं, त्याच्या कलानं शिकू देणारी असते का? 

शाळा आकर्षक आणि भरपूर उपक्रम देणारी असेल, तर का नाही बालकाला शाळेत जावंसं वाटणार? तिथं तर अगदी रोजच रमवणारं, मन गुंतवून ठेवणारं शिक्षण मिळत असेल तर मुलं आपणहून, वर्षानुवर्षं शाळेला खिळून राहतील. शाळेतून मुलांची ‘गळती’ होणार नाही. त्यांना शाळेत ‘येती’ करण्याचा प्रश्‍नच राहणार नाही. 

प्रत्येकाचा मेंदू हा शिकण्याचा अवयव असतो. मेंदूला हवं असतं अनुभवांचं खाद्य. शाळेमध्ये कृतिशील अनुभवांची रेलचेल असल्यास प्रत्येकच मूल शाळेत जाऊन चांगलं ‘शिकतं’ होईल. कुणी ‘कच्चं’ राहण्याचा प्रश्‍नच शिल्लक राहणार नाही. 

शाळेत ‘स्वयंशिक्षणा’च्या संधी किती आहेत? शाळेतलं वातावरण सौंदर्यपूर्ण, आनंदमय आहे का? व्यक्तिगत शिक्षणाची शक्‍यता/सोय आहे का? अभ्यासाअंतर्गत सातत्यानं छोटी-छोटी बौद्धिक आव्हाने घेण्याच्या संधी मुलांना दिल्या जातात का? मुलांना शिकण्यात आवडीचे व निवडीचे स्वातंत्र्य दिले जाते का? त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आदर, त्यांच्या भावनांची कदर केली जाते का? तिथं भाषांची विविध वळणं आत्मसात करायला मिळतात का? कल्पनांचे पतंग आकाशात उडवायला मिळतात का? मित्रमंडळींशी, त्यांच्या भावभावनांशी एकरूप व्हायला मिळतं का? 

मुलं शाळेत येतात ती स्वतःची शिकण्याची भूक भागवण्यासाठी. ती शिकतात उपजत स्वयंप्रेरणेनं. मुलं नवंनवं ज्ञान अधाशासारखं आत्मसात करतात, ते त्यांच्या ठायी असणाऱ्या जिज्ञासेनं. मुलं निवड करीत जातात ती आपल्या विशिष्ट बुद्धिमत्तांच्या दिशेनं आणि मुलं निर्णय घेतात ते त्यांचं आत्मसामर्थ्य वाढविणारे. या साऱ्यांच्या संधीचा शालेय वयात मुलं सातत्यानं शोध घेत असतात. अशा विविधांगी संधी पुरविते ती शाळा, अशीच खरी शाळेची व्याख्या करावी लागेल. 

अशा संधिपूर्ण शाळांचा शोध पालकांनी घ्यावा, अशा संधियुक्त शाळा निर्माण करण्याचा ध्यास शिक्षकांनी घ्यावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today