मुलांचं शिक्षण अन्‌ पालकांच्या श्रद्धा!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 August 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांच्या शिक्षणात सर्वांत परिणामकारक (क्वचित बाधकही) कुठला घटक असेल, तर तो पालकांच्या शिक्षणविषयक समजुती. आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी पालकांना काय वाटलं, मुलांकडून पालकांच्या अपेक्षा काय असतात, आज जे आणि जसं शिक्षण शाळांतून दिलं जातं; त्यातलं पालकांच्या दृष्टीनं चांगलं काय वाईट काय हे सर्व प्रश्‍न कळीचे असतात.

आपली मुलं उत्तम शिकावीत, असं सर्वच पालकांना वाटतं; अगदी अशिक्षित पालकांनाही. फक्त ‘उत्तम शिक्षण’ म्हणजे काय, हे त्यांना नेमकेपणानं माहीत नसतं. या संदर्भात गरीब वर्गातले पालक मध्यमवर्गाच्या तर मध्यमवर्गातील पालक उच्चमध्यम वर्गाच्या ‘श्रद्धा’चं अनुकरण करत असतात. ‘शिक्षणवेध’च्या ‘संपादकीय’मध्ये या ‘श्रद्धां’ची ‘मनोरंजक’ अशी जंत्रीच दिली आहे. ती अशी -
    इंग्रजी येणे (म्हणजे काय? किती?) हे पुढील स्पर्धात्मक जीवनात ‘मस्ट’ असतं. 
    इंग्रजी चांगले येण्यासाठी मुलांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत गेलं पाहिजे. 
    शाळा इंग्रजी माध्यमाची असली म्हणजे शिक्षणाचा दर्जा उच्चप्रतीचा असतो. 
    तेथील शिक्षक इंग्रजी बोलणे, कळले, लिहिणे, वाचणे, शिकणे यात तरबेज असतात.
     झकपक टाय व बुटांसहित गणवेश असला, की आपोआप शिकणे दर्जेदार होते. 
     खूप पुस्तके, गाइड यांच्या खर्चाचा बोजा पालकांवर टाकणारी, जास्त फी आकारणारी व दप्तराचे ओझे मुलांवर लादणारी शाळा उत्तम असते. 
    पालकांना शाळेत येऊ न देणारी बंदिस्त शाळाच शिस्तबद्ध असते. 
    शिक्षकांचा दरारा, विद्यार्थ्यांवर दबाव व पालकांवर जबरदस्ती म्हणजे चांगली शाळा! 
    परदेशी बोर्ड-व्यवस्था व शाळेच्या नावात ‘इंटरनॅशनल’ शब्द म्हणजे उत्तम शाळा. 
    शाळांकडे दूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिवळ्या बसेस असतील, तर तिथे उत्तम शिकवतात. 
    मुलांना बडवण्यात पारंगत असलेले शिक्षक हेच शिकवण्यात पारंगत असतात. 
    सेमी-इंग्रजी सुरू केले असेल, तर मराठी शाळा निदान ‘सेमी-चांगल्या’ असतात! 
    असे वर्ग सुरू केले, की तेथे मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांना त्वरित इंग्रजीतूनही शिकवता येऊ लागते. (बाळंत होताक्षणीच आईला जसा दुधाचा पान्हा फुटतो, तसा!) 
    खासगी क्‍लासशिवाय मुलं उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. ज्या क्‍लासेसची फी जास्त असते, त्या क्‍लासच्या मुलांना जास्त मार्क मिळतात. 
    ज्या मुलांना जास्त मार्क मिळतात, तीच फक्त हुशार असतात. 
    शालेय अभ्यासात हुशार असतात, तीच मुले जीवनात यशस्वी होतात. पैसा/मानमरातब मिळवतात. बाकीची अयशस्वी होतात. 
पालक या ‘श्रद्धा’ बदलत नाहीत तोपर्यंत शिक्षणाचं स्वरूप बदलणं कसं शक्‍य आहे! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today