esakal | मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Edu

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांचं शिक्षण हाच आपल्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. आपली मुलं उत्तम शिकावीत, चांगली शिकावीत असं कुठल्या पालकांना वाटत नाही? पण त्यासाठी पालक नेमकं काय करतात? काहीही करून एखाद्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला, खर्चिक क्‍लासेस वगैरे लावून एकदाचे त्याला (तिला) दहावीत नव्वद-पंचाण्णव टक्के गुण मिळाले म्हणजे पालक म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडली, असं समजावं का? तुमच्या मुलाचं उत्तम शिक्षण झालं असं मानावं का? 

मुलांचं शिक्षण सगळं शाळेकडं सोपवून पालक मोकळे होऊ शकत नाहीत. त्यांनी सजग राहणं, मुलांच्या विकासात सहभागी होणं, त्यासाठी मुळातच शिक्षण म्हणजे काय, हे समजून घेणं अनिवार्य झालं आहे. निदान सुजाण पालकांसाठी मुलांचं शिक्षण चांगलं कसं करता येईल, याबाबत खूप नवीन विचार जगभरात पुढे आले आहेत. गेल्या काही वर्षांत मानसशास्त्रातील संशोधनामुळे शिक्षणाबद्दलच्या संकल्पना आमूलाग्र बदलल्या आहे.

मज्जाशास्त्रातील आणि मज्जामानसशास्त्रांतील संशोधनाने शिक्षणशास्त्र नव्या सैद्धांतिक पायांवर उभं राहत आहे. या साऱ्या संशोधनाविषयी पालकांनी अनभिज्ञ राहून कसं चालेल? शिक्षणशास्त्र हा पालकांचा विषय खचितच नव्हे, पण पाल्याचं शिक्षण हा तर नक्कीच आहे. 

साऱ्या विकसित देशांमध्ये शिक्षणाकडं रचनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. आपल्या शाळांतून रूढ झालेला वर्तनवादी दृष्टिकोन कालबाह्य मानला जात आहे. इतका मूलभूत बदल होत असताना या दोन दृष्टिकोनात नेमकं काय अंतर आहे, हे पालकांनाही समजून घ्यावं लागणार आहे. अन्यथा, आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन ते करूच शकणार नाहीत. अत्याधुनिक संशोधनावर आधारित असं ‘मेंदू आधारित शिक्षणाचं नवं मॉडेल’ शिक्षणक्षेत्रात वापरलं जाणार असल्यास पालकांना तीही संकल्पना समजून घ्यावी लागेल. 

‘बापरे, एवढं सगळं पालकांनाही माहिती हवं?’ अशी तुमची प्रतिक्रिया होऊ शकते. सक्ती नक्कीच नाहीय. तुम्ही असाही दृष्टिकोन स्वीकारू शकता, ‘मुलगा शाळेत जातो खरा, पण तिकडं तो काय व कसं शिकतो याची काही कल्पना नाही.’

loading image
go to top