मूल फक्त आईचं नव्हे, समाजाचं असतं

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
बदलत्या काळानुसार काही नव्या संकल्पना साकार होत असतात. ती काळाची गरज असते. आज आई आणि बाबा हे दोघेही करिअर करू लागले आहेत. अशा वेळी मुलांच्या संगोपनासाठी काही नव्या कल्पनांची प्रयोगांची गरज निर्माण झाली आहे. 

ॲड. छाया गोलटगावकर यांचं आनंदघर ही अशीच एक नवी संकल्पना. संदीप काळे यांनी त्या संकल्पनेचं वेगळेपण व महत्त्व उलगडताना मांडलेले हे काही कळीचे मुद्दे... बालक-पालक सदरात नोंद घ्यायलाच हवे असे. आनंदघर हे पाळणाघर नव्हे ते आनंदघर बालसंगोपन केंद्र आहे. लर्निंग अँड रिसर्च सेंटर आहे. 

स्वतःचा विकास साधू इच्छिणाऱ्या आईला एक भक्कम सपोर्टिंग सिस्टिम म्हणून आनंदघर काम करतं. त्यामुळेच मुलाकडे आपण लक्ष देऊ शकत नाही याची तिला बोच राहत नाही. यामागची भूमिका आहे ती सामाजिक पालकत्वाची. मूल काही एकट्या स्त्रीचं नसतं; तर ते सगळ्या कुटुंबाचं व समाजाचं असतं, म्हणूनच आनंदघरमध्ये मुलांचं पर्यायी पालकत्व स्वीकारलं जातं. 

आनंदघरमध्ये मुख्यतः मुलांच्या भावनिक स्थिरतेवर भर दिला जातो. पालकांशी बोलून, मुलांचं निरीक्षण करून नोंदी घेतल्या जातात व पालकांच्या मदतीनं त्यावर काम केलं जातं. मुलांचं गुणवत्तापूर्ण संगोपन व शिक्षण यासाठी आनंदघर कार्यरत असतं. स्वच्छ, सुंदर, सुरक्षित परिसर असणं, अंगण असणं, बाग असणं, मुलांना माती-वाळू-पाणी यांच्याशी मनसोक्त खेळता येणं, आजूबाजूच्या परिसराशी त्याचं नातं जुळणं, या साऱ्या गोष्टींची दक्षता घेतली जाते. मुलांची क्रिएटिव्हिटी अर्थात सर्जनशीलता फुलावी यासाठी आनंदघरात मुक्त खेळाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यानुसार वर्षभराच्या विविध उपक्रमांचं नियोजन केलं जातं. सण - उत्सव साजरे केले जातात, मात्र ते आजच्या काळाच्या अन्‌ पर्यावरणाच्या संदर्भात. मुलांची निसर्गाशी जवळीक साधली जाईल असे निसर्गस्नेही उपक्रमच योजले जातात. बालपण रम्य, गोड, आनंदाचं असतंच, पण तसंच ते राहील याची ग्वाही ‘आनंदघर’च देऊ शकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today