पित्याने दिला हा अनोखा वारसा

Education
Education

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
प्रत्येक मूल वेगळं तसंच प्रत्येक पालकही वेगळा असतो. त्यातून तो प्रसिद्ध असेल तर ‘वेगळा’ असण्याची शक्‍यता खूपच. त्यांची जीवनशैली, जीवनदृष्टी वेगळी असते. ती ते आपल्या मुलामुलींपर्यंत कशी पोचवतात, अशा पालकांची मुलं त्यांच्या काहीशा वेगळ्या घरात, वेगळ्या वातावरणात कशी घडतात? 

साहित्यिकांच्या मुलांनी साहित्यिकच व्हायला हवं, अशी अपेक्षा असू नये. पण साहित्यिकाच्या घरात वाढताना साहित्याविषयी प्रेम, वाचनाचं वेड, कलांची ओढ निर्माण झाली नाही तरच नवल. साहित्यिक व्यंकटेश माडगूळकरांनी आपली कन्या ज्ञानदा हिच्यावर कसे नि कुठले संस्कार केले, आपलं अनुभव संचित विचारधन तिच्यापर्यंत शाळकरी वयातही कसं पोचवलं त्या संदर्भातलं ज्ञानदाचं अनुभवकथन. ती म्हणते, ‘मी तिसरीत असताना त्यांनी मला ‘अरेबियन नाईट्‌स’चे भाग आणून दिले. दोन दिवसांनी मला विचारले की ‘आशुक माशुक’ आणि ‘नाटकशाळा’ या शब्दांचे अर्थ काय? मी सांगितलं, ‘ते मला काही कळले नाही. म्हणून मी ते सोडून पुढचे वाचले.’

त्यांचे म्हणणे की लहान मुलांवर वाचनाने वाईट परिणाम वगैरे काही होत नाही. ज्या विषयात त्यांना गम्य नसते, तो भाग मुले सोडून देतात. त्यातले जेवढे आवडते तेवढे वाचतात व लक्षात ठेवतात. आम्ही पोरांनी खूप काही वाचावे असे त्यांना फार वाटे. मी (चुलत भावंडासह) सिनेमाला निघाले, की ते म्हणत, ‘तुम्हा पोरांपुढं केवढं थोरलं आयुष्य आहे. खूप वाचावं. सर्व विषयांचं ज्ञान करून घ्यावं. त्यावर विचार करावा. तुम्हा पोरांना सारखे चित्रपट, नाटके पाहणे का आवडते, मला कळत नाही. चित्रपटगृहात आरामशीर बसून डोक्‍याला काही त्रास न देता, पडद्यावरची रंगीबेरंगी चित्रे पाहणं बरे वाटत असंल तुम्हाला! पण त्याचा काही उपयोग असतो का?’ 

‘परकराच्या ओच्यात सुंदर फुले, रंगीबेरंगी पाने, रसाळ मधुर फळे गोळा करावीत तसे बालपणापासून मी तात्यांच्या सहवासामुळं वाचणं, फिरणं, पाहणं, ऐकणं गोळा करत आले आहे. चित्रं काढायला शिकते आहे. पाना-फुलांचे, पाखरा-कीटकांचे विलक्षण विश्‍व पाहिले आहे. जीवनात जे सुंदर आणि मंगल आहे, ते वेचून पदरात बांधून ठेवण्याची वृत्ती मी आज जपत आहे. माझ्या लेकींनाही ते वेचून पदरात बांधून ठेवण्याची वृत्ती मी आजही जपत आहे. माझ्या लेकींनाही हा वारसा देण्याचा प्रयत्न करीत आले आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com