कोणते संस्कार करतो टीव्ही?

शिवराज गोर्ले
गुरुवार, 11 जुलै 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील"Edu" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
कुठली मुलं टीव्ही अधिक बघतात? असं म्हटलं जातं कमी बुद्‌ध्यंकाची मुलं टीव्ही बघण्यात जास्त रमतात. अभ्यास नको असणारी, अभ्यासात रस नसणारी मुलं टीव्ही बघण्याची सोपी पळवाट शोधतात. पण मौज म्हणजे ज्यांचा बुद्‌ध्यंक बरा असतो, त्या मुलांची बुद्धीही तेज होण्याऐवजी मंद होत जाते. टीव्ही बंद झाला, तरी मुलांच्या मनावर त्याची मोहिनी राहते. जे बघितलं त्याचेच विचार डोक्‍यात घोळत राहतात. मन भरकटतं... अभ्यासात रमत नाही. प्रगती खुंटत जाते. १९९० नंतर केलेल्या एका पाहणीत हे आढळून आलं की, जास्त टीव्ही बघणाऱ्यांची अभ्यासातील गोडी कमी होते. याउलट अगदी कमी वेळ टीव्हीपुढं बसणाऱ्या मुलांची अभ्यासातील प्रगती व त्यातील रस टिकून राहतो. याखेरीज टीव्हीमुळं मुलांच्या मनावर नको ते संस्कार होत असतात.
म्युझिक अल्बम्स, नवी सिनेमांची गाणी यातून अंग प्रदर्शन, कामुक दृश्‍य मुलं पाहत असतात.

विविध चित्रपटांतून आक्रमकता, हिंसा ग्लॅमरस स्वरूपात मुलांपर्यंत पोचत असते. अनेकदा माध्यमातून हिंसेकरता हिंसा दाखवली जाते. त्यातून क्रौर्य हे शौर्य म्हणून ठसवलं जातं की काय, हा प्रश्‍न उभा राहतो. 

मालिकांमधून कुटिलता, कौटुंबिक संघर्ष, अनैतिक संबंध, भावनिक प्रसंगाची भडक हाताळणी केलेली असते. मुलंही ते पाहून तसं वागू/बोलू पाहतात. 

माध्यमाच्या वेगामुळे (आणि प्रस्तुतीकरणामुळे) यश असो, प्रेम असो, सारं काही ‘इन्स्टंट’ हवं ही प्रवृत्तीही रुजू शकते. 

दृक्‌श्राव्य माध्यमातून मोहक, वरवरचं, फसवं उधळ जग भूलभुलैया घालू शकतं. आपल्या भोवतालचं जग त्यातलं माणूसपणाचं मोल हे सारं विसरलं जातं. मालिका/चित्रपटांतून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी खऱ्या/वास्तवच असतात, असं मुलं गृहीत धरतात. माध्यमातलं सारं त्यांना अनुकरणीय वाटू लागतं. माध्यमांच्या संगतीत मुलांच्या कोवळ्या संस्कारक्षम मनांमध्ये उलथापालथ होत राहते. 

जे मोठ्यांना आवडतं, ते गैर कसं, असंही मुलांना वाटतं. अशा वेळी मुलं ‘अवेळी’ मोठं होण्याचा संभव असतो. वस्तुतः मूल ‘प्रौढ’ होण्याच्या अवस्थेतला प्रत्येक टप्पा वेगळा असतो, प्रत्येक टप्प्याचं आपलं वैशिष्ट्य असतं, ते त्या त्या वयात अनुभवायचं असतं. हा अनुभव मुलं गमावून बसतात. टीव्ही मुलाचं ‘मूलपण’ संपवतोय की काय, मुलांना टीव्हीच्या ‘हाती’ सोपवून आपण त्यांच्या संवेदनक्षमता बधिर करत आहोत की काय, असे प्रश्‍न उभे राहतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article By Shivraj Gorle on tV