जबाबदाऱ्यांचं ओझं वाटलं नाही (स्नेहलता तावडे-वसईकर)

स्नेहलता तावडे-वसईकर
मंगळवार, 14 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण"या पुरवणीत...

कम बॅक मॉम
आई होणं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा. आई या नात्याबरोबरच अनेक नव्या जबाबदाऱ्या येतात आणि एका नव्या प्रवासाला सुरवात होते. इतर स्त्रियांप्रमाणेच आई होण्याचं सुख मलाही अनुभवायला मिळालं. खरंतर मी आईपण एन्जॉय केलं. प्रेग्नंसीच्या काळात मी फार काळ काम केलं नाही; पण मिळालेल्या वेळेचा पुरेपूर वापर केला. मी या काळात शिवणकाम, खाण्याचे नवनवीन पदार्थ करायला शिकले. त्याचबरोबरीनं मला पेंटिंग करायला खूप आवडतं. त्यामुळं पेंटिंगमधल्या काही नव्या गोष्टी आत्मसात केल्या. कलाक्षेत्रात वावरत असताना स्वस्थ न बसता सतत काही ना काही तरी नव्या गोष्टी शिकण्याची मला पहिल्यापासूनच आवड. त्यामुळं प्रेग्नंसीदरम्यानचा रिकामा वेळदेखील कामी आला. माझी मुलगी शौर्या आता पाच वर्षांची आहे. शौर्याच्या जन्मानंतर पुन्हा कामावर रुजू व्हायचं म्हणजे माझ्यासाठी मोठं आव्हानच होतं. चित्रीकरणाच्या वेळा सांभाळत घर, कुटुंब आणि मुलीकडं लक्ष देणं म्हणजे मोठी जबाबदारी; पण आपण स्वस्थ बसून चालणार नाही, आपल्याला पुन्हा नव्या जोमानं काम करायला सुरवात केली पाहिजे, हे मी मनाशी निश्‍चित केलं. माझा निर्णय मी घरी सांगितला. माझ्या संपूर्ण कुटुंबीयांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. मोठ्या धैर्यानं मी घराबाहेर पाऊल टाकलं आणि शौर्या आठ महिन्यांची असताना मी पहिली जाहिरात केली. तिथूनच माझ्या कामाला सुरवात झाली. त्यानंतर मी ‘चंद्रकांत चिपळूणकर सीडी बंबावाला’ नावाचा शो केला. या शोच्या संपूर्ण टीमनंही मला खूप सांभाळून घेतलं. यादरम्यान माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली ती माझी आई. माझी मुलगी दोन ते अडीच वर्षे माझ्या आईकडंच होती. आईच्या पाठिंब्यामुळं मी खरंतर बिनधास्त काम करू शकले. 

कलाक्षेत्रात अभिनयाबरोबरच तुमचा लुक, ग्लॅमरस चेहरा यालाही फार महत्त्व दिलं जातं. मी प्रेग्नंसीनंतर अभिनय क्षेत्रात कमबॅक करायचं ठरवल्यावर आपल्याला कोणत्या प्रकारच्या भूमिका मिळणार, याबाबत थोडी भीती होतीच. कारण प्रेग्नंसीनंतर माझं वजन खूप वाढलं होत. मी वर्कआउट, व्यायाम यांवर मी अधिक भर देण्यास सुरवात केली. वजन कमी केलं. वर्षभरामध्ये मी २३ किलो वजन कमी केलं. प्रेग्नंसीनंतर पुन्हा मूळपदावर येण्यास खूप मेहनत घ्यावी लागते. मला प्रेग्नंसीनंतरही चांगल्या भूमिका करायच्या होत्या आणि पुढं तसंच घडत गेलं. खरंतर माझ्या यशात माझ्या मुलीचाही खारीचा वाटा आहे. तिच्या जन्मापासून मी नव्हे, तर तिनंच मला समजून घेतलं! प्रत्येकवेळी आई पाहिजेच, असा हट्ट शौर्यानं कधीच केला नाही. आजही एखादी गोष्ट समजून सांगितली की, ती समजून घेते. आजवर मी तिच्याशी खरं वागत आले आहे. खोटं बोलून मी कधीच घराबाहेर पडले नाही. मी कुठे बाहेर गेली की माझी पाच वर्षांची मुलगी मला फोन करून विचारते, ‘आई तुझा प्रवास कसा झाला? तुला काही त्रास झाला नाही ना...’ तिची ही विचारपूस ऐकूनच माझा सारा थकवा निघून जातो. तुमची मुलंच तुमची काळजी घेतात तेव्हा अगदी भरून येतं. 

माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा मी हसत-खेळत पार केला आहे. एखाद्याबद्दल प्रेम वाटलं तर ते व्यक्त करावं, राग असल्यास तोही राग त्याचक्षणी व्यक्त करावा किंवा शंभर लोकांमध्ये तुम्हाला रडू येत असल्यास मनमोकळेपणाने रडावं, कोणत्याच गोष्टीची लाज वाटता कामा नये, या विचारसरणीची मी आहे. आई झाल्यानंतर आलेल्या जबाबदाऱ्यांचं ओझं मला कधीच वाटलं नाही. घर, काम सांभाळून मला माझ्या मुलीकडं लक्ष द्यावं लागतं, तेव्हा मी ही सगळी कामं, चेहऱ्यावर एक स्मितहास्य ठेवून पूर्ण करते. कोणतीही स्त्री आई झाली की, तिच्यामध्ये एक नवी ऊर्जा संचारते, असं मला वाटतं. कारण मी हे प्रत्यक्षात अनुभवलं आहे. माझं शेड्यूल कितीही बिझी असलं तरी चित्रीकरणादरम्यान थोडा तरी वेळ मी मुलीसाठी राखीव ठेवते. आताही मी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका करत आहे. या मालिकेच्या सेटवर तिला घेऊन जाते. सेटवर ती अधिक रमते. आमच्या मालिकेची टीमही शौर्याबरोबर एन्जॉय करते. बऱ्याचदा तर ‘रोलिंग, कॅमेरा, ॲक्‍शन’ ही ऑर्डर शौर्या आम्हाला माईकवरून देते. तिच्या ऑर्डरवरून मग आम्ही सीन करायला सुरवात करतो. माझा एखादा सीन तिला आवडला की, ‘तू छान केलं’, असंही ती मला सांगते. हे छोटे-छोटे बदल मनाला आनंद देऊन जातात. मी आई झाल्यानंतर एक गोष्ट फॉलो केली आहे, ती म्हणजे शौर्या कुठं चुकत असल्यास तिला चार लोकांमध्ये न ओरडता ती एकटी असताना तिची चूक तिला दाखवून देते. काही गोष्टी समजावते. याचा चांगला परिणाम मुलांवर होतो. शौर्याला तर मी सुपरवुमन वाटते. जगात कोणालाच जमत नाही, ते माझ्या आईला जमतं असं तिला कायम वाटत आलं आहे. तिचा माझ्यावर पराकोटीचा विश्‍वास आहे. आताही आम्ही कुठं बाहेर गेलो की, लोक माझ्याभोवती गर्दी करतात. ते पाहून तिला आनंद होतो. आई-मुलीच्या नात्यामधील खरा आनंद माझ्या वाट्याला आला, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. 

(शब्दांकन ः काजल डांगे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Snehlata Tawde-Vasaikar come back mom maitrin sakal pune today