Flower
Flower

परिपूर्ण आरोग्यासाठी

चेतना तरंग
केवळ निरोगी कळीचेच खुलून फूल होऊ शकते. त्याचप्रमाणे, निरोगी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. चांगले आरोग्य म्हणजे काय? मन ताठर, अशांत असल्यास तुम्ही मानसिकरीत्या तंदुरुस्त नसता. भावना प्रक्षुब्ध असल्यास भावनिक आरोग्य नसते. चांगल्या आरोग्याची कळी एखाद्याच्या आतून बाहेर, तसेच बाहेरून आतही खुलावी लागते. संस्कृतमध्ये आरोग्याला ‘स्वास्थ्य’ म्हणतात. स्वतःचीच स्वतःमध्ये स्थापना करणे, असा याचा अर्थ आहे. स्वास्थ्य केवळ शरीरमनापुरते मर्यादित नसून, वैश्‍विक मन किंवा इंद्राची देणगी होय. काही वेळा व्यथित मनःस्थिती असलेल्या व्यक्तीच्या खोलीत प्रवेश केल्यावर कोणत्याही कारणाशिवाय तुम्हालाही तसेच वाटू लागते. त्याचप्रमाणे, सौहार्दाची कंपने असलेल्या सत्संगासारख्या ठिकाणी तुम्हाला चांगले वाटते. त्यामुळेच, भावना शरीरापासून वेगळ्या करता येत नाहीत. त्या आजूबाजूला सर्वत्र असतात. श्‍वास आणि मनाच्या बाबतीतही असेच म्हणता येते. पृथ्वी, जल, अग्नी, हवा आणि आकाश या पंचमहाभूतांपेक्षा मन सूक्ष्म आहे. तुम्हाला दु:खी, निराश वाटत असल्यास तसे वाटणारे तुम्ही एकटेच नसता. तुम्ही सर्वत्र ते पसरवत असता. आपण हे नियंत्रित कसे करू शकतो? या महत्त्वाच्या प्रश्‍नाचे उत्तर ध्यान, प्राणायाम आदींत दडले आहे. यामुळे जीवनाची ऊर्जा असलेला प्राण वाढतो. प्राण भावनांपेक्षा सूक्ष्म असतो. तुम्ही सूक्ष्मावर लक्ष केंद्रित केले की, एकूण सर्वच गोष्टी बरोबर होतात. तुम्ही श्‍वास व्यवस्थित हाताळला की शरीरालाही आरोग्य लाभते. पूर्वीच्या काळी लोक म्हणत, ‘आम्हाला सामुदायिक जाणीव द्या. इंद्र नेहमी आरोग्य देतो आणि मला माझ्याजागी पुन्हा नेऊन ठेवतो.

त्याने मला नेहमीच असे आनंदी, केंद्रित ठेवावे. मला भेटणारी प्रत्येक व्यक्ती मला पुन्हा ‘स्व’च्या ठिकाणी नेवो.’ हे महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही लोकांकडून ऐकलेले शब्द तुमच्या मनःस्थितीवर परिणाम घडवतात. एकतर ते तुम्हाला शांतता देतील किंवा अस्वस्थता निर्माण करतील.

सर्वसाधारणपणे आपण स्वतःमधील राग, निराशा आदी भावनांबद्दल इतरांना जबाबदार धरतो. मात्र, अशा नकारात्मक भावनांना आपणच जबाबदार असतो, कारण त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत आपलेच योगदान असते. मन स्वतःच्या जागेवर किंवा केंद्रित नसल्यानेच हे घडते. आपण अखंड आनंद कसा मिळवू शकतो? खरेतर एकट्याने आनंदी होणे पुरेसे नसते. आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आनंदी झाली पाहिजे.

वैफल्यग्रस्त व्यक्ती वैफल्यच पसरवते. तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा फायदा घेऊ शकता. एखादी व्यक्ती दु:खी असल्यामुळेच तुमचा अपमान करते, हे एकदा ओळखले की कुठलाही अपमान तुम्ही फायद्यात बदलू शकता.

तुमच्यावर ओरडणाऱ्या व्यक्ती केवळ त्यांचा ताण, संताप, चिंताच ओतत असतात. या वर्तणुकीचे समर्थन करण्याचा येथे उद्देश नाही. त्याबद्दल खेद व्यक्त केल्यास चुकांची पुनरावृत्ती टळते. एखाद्याने चूक केल्यामुळे तो गुन्हेगार ठरत नाही, ताणामुळे तो चूक करतो. आपण ताणातूनच मुक्ती मिळवल्यास कुणीच गुन्हेगार नसेल. कुणालाही माफ करावे लागणार नाही.

त्यानंतर आयुष्य म्हणजे काय, त्याचा हेतू काय, प्रेम म्हणजे काय आदी प्रश्‍न मनात येतील. त्यांची उत्तरे पुस्तकात सापडणार नाहीत, तर बदलाच्या या जीवनरूपी प्रवासात मिळतील आणि हेच परिपूर्ण आरोग्य होय. तुम्ही आतून बदलाल. आरोग्याच्या कळीचे सुंदर फुलात रूपांतर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com