रहस्य शांतीचे...

श्री श्री रविशंकर
शनिवार, 20 एप्रिल 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

गौतम बुद्धांना मे महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर, ते आठवडाभर शांतच होते, असे म्हटले जाते. पौराणिक कथांनुसार बुद्धांच्या या शांततेमुळे स्वर्गातील देवदूतही घाबरले. हजारो वर्षांतून एखाद्यालाच बुद्धांसारखी ज्ञानप्राप्ती होते, हे त्यांना माहीत होते आणि आता बुद्ध पूर्णपणे शांत होते. अखेर देवदूतांनी त्यांना काहीतरी बोलण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘‘माहीत असणाऱ्यांना मी काही सांगितल्याशिवायही माहीत होईल, तसेच काहीही माहीत नसणाऱ्यांना मी काही सांगितले तरी काही माहीत होणार नाही. एखाद्या अंध व्यक्तीला प्रकाशाचे वर्णन करून काय उपयोग?

जीवनरूपी अमृताची चवच माहीत नसणाऱ्या त्याची गोडी सांगण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळेच, मी शांत आहे. एखादा अतिशय वैयक्तिक अनुभव दुसऱ्यापर्यंत पोचवायचा तरी कसा, मी तो पोचवू शकत नाही. शब्द संपतात, तिथे सत्य सुरू होते.’’ हे अनेक धर्मग्रंथांतही सांगितलेय. त्यावर देवदूत पुन्हा म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण, पूर्ण ज्ञानी आणि संपूर्ण अज्ञानीही नसणाऱ्यांचा विचार करा. अशांसाठी तुमचे काही शब्द प्रेरक ठरतील. त्यामुळे, कृपया त्यांच्यासाठी तरी बोला, तुमचा प्रत्येक शब्द मग शांतताच निर्माण करेल.’’ शब्दांचा हेतू शांततेचाच असतो. अधिक आवाज निर्माण करणारे शब्द त्यांचे ध्येय साध्य करत नाहीत. गौतम बुद्धांचे शब्द निश्‍चितपणे शांतता निर्माण करतात, कारण बुद्ध शांततेचे प्रगटीकरण आहे.

जीवनाचा स्रोत शांतताच असते आणि तीच आजारही बरे करते. लोक रागावल्यावर एक प्रकारे शांतताच राखतात. सुरवातीला ते चिडतात, ओरडतात आणि त्यानंतर शांत राहतात. एखादी व्यक्ती दु:खी असल्यावर स्वत:ला एकटे सोडण्यास सांगून शांततेत परतते. त्याचप्रमाणे, एखादी ज्ञानी व्यक्तीही शांतताच धारण करते. तुम्ही तुमच्या मनातील आवाज तरी पाहा.

तो नेमका कशाचा आहे? पैसा? प्रसिद्धी? नातेसंबंध? आवाज नेहमीच अशा कशाचा तरी असतो. शांतता यापैकी कशाशीच संबंधित नसते. शांतता पाया तर आवाज पृष्ठभाग होय. बुद्धांच्या पायावर सर्व सुखे लोळण घेत होती. एके दिवशी ते म्हणाले, ‘‘मला सर्वांचा त्याग करून जग जाणून घ्यायला आवडेल.’’ बुद्धांनी सत्याच्या शोधासाठी राजवाडा, पत्नी, मुलांचाही त्याग केला. त्यानंतर, त्यांनी लोकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या. अतिशय समृद्धी असतानाच्या काळात बुद्धांनी आपल्या प्रमुख शिष्यांना भीक मागण्यास सांगितली. त्यांनी, राजांनाही शाही वस्त्रे उतरवून भिक्षा मागायला लावली. या सर्वांना अन्नासाठी नव्हे तर आपण ‘कोणीतरी’ असल्यापासून ‘कोणीही नसल्याचा’ प्रवास घडविण्याचा बुद्धांचा हेतू होता. या विश्‍वाच्या विशाल पसाऱ्यात आपण क्षुद्र असतो. शांतता जेवढी अधिक असेल, तेवढे प्रश्‍न निर्माण होतात. तत्कालीन राजेही भिक्षा मागितल्यावर करुणेचेच अवतार ठरले. चार सत्ये शोधण्यापूर्वी बुद्ध अनेक मार्गांवरून चालले. बुद्धांचे पहिले सत्य म्हणजे जगात दु:ख आहे. आपल्या सभोवतालच्या जगाचे निरीक्षण करणे आणि इतरांची दु:खे जाणून घेणे किंवा स्वत:च त्या दु:खाचा अनुभव घेणे. दु:ख जाणून घेण्याचे हे दोन पर्याय. प्रत्येक दु:खाला कारण असते, हे दुसरे सत्य. दु:खमुक्ती शक्‍य आहे, हे तिसरे आणि दु:खमुक्तीचा मार्ग आहे, हे चौथे सत्य होय. तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावाचे निरीक्षण करा. तो शांत, प्रेमळ, मैत्रीपूर्ण, आनंदी असल्याचे जाणवेल. शांतताच या सर्वांची जननी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sri sri ravishankar all is well sakal pune today