नातेसंबंध जोपासताना... (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

"आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!" 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत..."

चेतना तरंग
तुम्ही आंतरवैयक्तिक नातेसंबंधांबद्दल जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. अशा नातेसंबंधांमध्ये नेमका कशामुळे अडथळा निर्माण होतो? मतभेद सुरू झाल्यावर नातेसंबंध विस्कळित होतात. तुम्ही जरा स्वतःकडे पाहा. तुम्ही नेहमी स्वतःशी तरी सहमत असता का? काल तुमच्या काही कल्पना होत्या, आज त्या वेगळ्या असू शकतात. पाच वर्षांपूर्वी आणखी वेगळ्या होत्या. म्हणजेच, तुमचे स्वतःबद्दलच मतभेद असतील, तर ते इतरांबरोबर का घडणार नाहीत? त्यामुळे तुम्ही स्वतःचे विचार किंवा भावनिक आकृतिबंधाकडे पाहणे आवश्‍यक ठरते. त्यामध्ये एक प्रकारचा ताल असतो. जाणिवेतही अशा प्रकारचा ताल असतो.

तुम्ही या सर्व तालांमध्ये सुसंवाद शोधायला हवा. यालाच आध्यात्मिकता असे म्हणतात. केवळ कल्पनेत रमणे म्हणजे आध्यात्मिकता नव्हे, तर स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करणे म्हणजे आध्यात्मिकता होय. तुम्हाला तुमचे शरीर तरी पूर्णपणे माहीत आहे का? तुम्ही समोरच्याचे शारीरिक अस्तित्व पाहता, पण स्वतःच्याच शरीराचा, श्‍वासाचा, मन आणि भावनांचा अनुभव कधी घेतलाय का? ध्यान हाच तुमच्या जीवनाचा स्रोत आहे. ही जीवनऊर्जा अनुभवणे आणि तिची सतत जाणीव बाळगणे म्हणजेच ध्यान. हे कुठल्याही प्रयत्नाशिवाय केले जाते. मन आणि शरीर पूर्णपणे विरोधी नियमांवर चालते. मनाच्या बाबतीत सहजता ही गुरुकिल्ली आहे. तुम्ही प्रयत्नाने काही आठवू शकत नाही, तर तुम्ही शिथिल असता तेव्हा स्मरणशक्ती, सर्जनशीलता, बुद्धिमत्ता परतते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हणून कार्यरत असणारी जाणीवसुद्धा हीच होय.

प्राचीन लोक या चार घटकांना ‘अंतःकरण चादुष्ट्य’ असे म्हणत. त्याचप्रमाणे, तुम्हाला स्मरणशक्ती नकारात्मक गोष्टींना चिकटून राहात असल्याचे दिसेल. तुम्ही इतरांचे दहा वेळा केलेले कौतुक विसराल, मात्र एक वेळचा अपमान लक्षात ठेवाल. हे नेमके उलट करायला हवे. नकारात्मकतेला चिकटून राहण्याच्या या वृत्तीकडून सकारात्मकतेचा प्रवास म्हणजेच योग होय. योग तुम्हाला एखाद्या लहान मुलाप्रमाणे बनवतो. तो केवळ तुमचा स्वभावच बदलत नाही, तर तुमचे हृदय आणि मनही तरुण, तेजस्वी ठेवता. योगातून आकलन, निरीक्षण आणि अभिव्यक्तीही वाढते. आंतरवैयक्तिक संबंध निकोप राखण्यासाठी तुमचे पहिल्यांदा स्वतःबरोबर नाते सुदृढ असायला हवे. त्याला एकात्मता असे म्हटले जाते. स्वतःबरोबर असे नाते नसल्यास एकात्मतेचा अभाव म्हणतात. दुसरे म्हणजे, अनौपचारिकतेतून तुमचे आंतरवैयक्तिक नाते सशक्त होते, कारण ते चुकांची मुभा देते. तुम्ही कोणत्याही नातेसंबंधांमध्ये परिपूर्णतेचा आग्रह धरू शकत नाहीत. आजच्या जगाची सर्वांत मोठी समस्या म्हणजे भावनिक अस्थिरता होय. तुम्ही तुमच्याभोवती अनौपचारिक आणि सौहार्दाचे वातावरण तयार करता तेव्हा स्वतःभोवती घडणाऱ्या घडामोंडींमुळे असहाय होत नाही. खरेतर, आयुष्यात असे एकच तयार सूत्र नाही. तुम्ही स्वत:ला अतिशय प्रामाणिक समजता तेव्हा आतमधून नकळत थोडेसे कठोर बनता. इतरांकडे बोट दाखवता तेव्हा असहिष्णू बनता. तुम्ही स्वतःमधील दोष ओळखता तेव्हाच इतरांचे दोष सामावून घेऊ शकता. ‘चांगले कर्म करा आणि विसरून जा,’ असे त्यामुळेच म्हटले जाते. तुम्हाला तुमचे गुणही उद्‌धट, संतापी बवनू शकतात. त्यामुळे तुम्ही गुण-अवगुणांची शरणागती पत्करली पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today