प्रेमातील सहा अडथळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
आपण सर्वकाही देव आहे आणि सर्वकाही प्रेम आहे, असे मानत असल्यास जगात एवढी अपरिपूर्णता का? प्रेमाचा सहा प्रकारे विपर्यास होतो, हे यामागील कारण होय. सर्व निर्मिती ही प्रेमामधून झाली असली, तरी ते सहा प्रकारच्या विकृतीमुळे प्रभावित झालेय. राग, वासना, लोभ, मत्सर, उद्धटपणा आणि संभ्रम या त्या सहा विकृत भावना होत. या सर्व भावना प्राण्यांमध्येही असतात, मात्र निसर्ग त्यांच्यावर अधिराज्य गाजवत असल्याने ते या भावनांच्या पलीकडे जात नाहीत. मात्र, मानवाकडे फरक ओळखण्याची क्षमता असल्याने तो या भावनांपासून निर्मळ प्रेमाच्या भावनेपर्यंत प्रवास करू शकतो.

या निर्मितीमागील विकृत भावनांपासून परिपूर्णतेच्या अवस्थेपर्यंतचा प्रवास करणे हाच सर्व आध्यात्मिक उपक्रमाचा भाग असतो. परिपूर्णतेचे तीन प्रकार आहेत. कृती, बोलणे आणि भावनांमधील परिपूर्णता. एकाच व्यक्तीमध्ये या तिन्हीची परिपूर्णता असणे, हे दुर्मीळ आहे, मात्र अवघड नाही. केवळ कृती कधीही परिपूर्ण असू शकत नाही. कोणत्याही कृतीत दोष असतात, सध्याच्या किंवा नंतरच्या भावना अपरिपूर्ण असतात, तेव्हा दीर्घकाळ मनात राहतात आणि अगदी आतील परिपूर्णता विस्कळित करतात. त्यामुळे तुम्ही कोणतीही अपरिपूर्णता पाहता किंवा एखाद्यावर झालेला अन्याय पाहता तेव्हा त्याचा सामना कसा करता?

तुम्ही अन्यायाच्या भावनेने खवळला असल्यास आणखी अपरिपूर्ण होता. तुम्ही तुमच्या अगदी आतील परिपूर्णतेचे रक्षण केले आणि बोलण्यातील परिपूर्णता ठेवली, तर बाहेरील अपरिपूर्णतेशी लढू शकता. स्वतःतील परिपूर्णतेलाच पहिले प्राधान्य असावे. सामान्यतः आपण एका अपरिपूर्णतेकडून दुसऱ्या अपरिपूर्णतेकडे प्रवास करतो. एखादा लोभी झाल्यास तुम्ही त्याच्यावर रागावता. थोडक्‍यात, तुम्ही स्वतःमध्ये शुद्धत्व आणण्याऐवजी अशुद्धतेचा प्रकार फक्त बदलता. विकृतीतील हा फरक परिपूर्णता आणत नाही, मात्र प्रत्येकजण हेच करतो. वासना राग बनते, रागाचे मत्सर किंवा लोभ, उद्धटपणात रूपांतर होते. एका अपरिपूर्णतेकडून दुसऱ्या अपरिपूर्णतेकडे प्रवास होतो. तुम्ही तुमच्या मनाचा कुठल्याही परिस्थितीत बचाव करायला हवा. प्रत्येक कृती काही नियमांमुळे घडत असल्याचा साक्षीभाव जोपासणे, हा मनाला वळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे तुम्हाला विविध कृतीत अपरिपूर्णता दिसेल, तेव्हा तिला स्वतःच्या हृदयात जाऊ देऊ नका. साधारणपणे आपण एका विकृतीशी लढतो तेव्हा दुसरी विकृती आपला ताबा घेते. मात्र, राग वासनेपेक्षा चांगला नसतो.

एका विकृतीऐवजी दुसरी चांगली असते, असा विचार करू नका. तुम्ही बोलण्यातील परिपूर्णतेपलीकडे पाहा. बोलण्यामागील भावनांकडे पाहा. उदाहरणार्थ, एखादी आई आपल्या मुलाला ‘चालता हो,’ असे म्हणते तेव्हा त्याचा खरा अर्थ तसा नसतो. तुम्ही अशा अपरिपूर्ण बोलण्यामागील हेतू समजून घेऊ शकलात, तर तुम्ही भावनांबाबत अपरिपूर्ण होणार नाहीत. प्रत्येक कृतीत दोष असतात. तुम्ही दानधर्म करता, त्यातही काही नकारात्मक बाबी असतात. तुम्ही त्यांचा स्वआदर दुखावता. त्यामुळे, भावना, बोलणे आणि कृतीतील परिपूर्णता शक्‍य आहे. विनम्रता ही आत्म्याची परिपूर्णता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today