आयुष्य - एक शाश्‍वत प्रवाह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 July 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
‘आपल्या या विश्वात कोणीही बाहेरचे नाही. सर्व जण माझेच आहेत,’ ही भावना, हा दृष्टिकोन म्हणजेच सत्संग आहे. सत्संग म्हणजे दिवसातून ठरावीक वेळ भजन करणे आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून निघून जाणे नव्हे. खरं तर, सत्संग म्हणजे सत्याचा सहवास होय. सत्य म्हणजे काय? कोणीही बाहेरचा नाही, याची पूर्ण जाणीव म्हणजे सत्य होय. आपल्यापैकी कोणी शीख, ख्रिश्चन, हिंदू किंवा मुस्लिम असू शकतो. मात्र, आपण सर्व मानव एकाच दैवी शक्तीचे आहोत. आपल्या वेदांमध्येही हा उल्लेख आलेला आहे. ‘सकळ वेद प्रतिपाद्य आत्मरूपम’ - माझ्यामध्येच तो परमेश्वर लपलेला आहे, असा या संस्कृत श्लोकाचा अर्थ होतो. ही ऊर्जा ओळखायला हवी. त्यानंतर, चेहऱ्यावर न पुसले जाणारे हास्य उमलेल. हृदयात कमी न होणाऱ्या प्रेमाची भावना असेल.

आयुष्यही मग कधीच भंग पावणार नाही. प्रत्यक्षात ते भंग पावले तरीही ते तसे वाटणार नाही. आयुष्य हा चिरंतन, शाश्वत प्रवाह आहे. आपण या पृथ्वीवर युगानयुगे येत आहोत. तुम्ही या पृथ्वीतलावर यापूर्वीही अनेक वेळा आलेला आहात. तुम्हाला केवळ त्याचा विसर पडलाय. तुम्ही नेहमी त्रस्त राहण्यामागील कारण हेच आहे. मात्र, तुम्ही साधना, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया सुरू करता, तेव्हा नवीन प्रकाश दृष्टिपथात येतो. त्यानंतर मग एखादा असे उद्‌गार काढतो, ‘वाह, मी विनाकारणच निराश होतो. कोणत्याही कारणाशिवाय मला निराश वाटत होते.’ तुम्ही आनंददायक परिस्थितीचा निश्चितच वापर करू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही दुःखी किंवा अप्रिय परिस्थितीचाही आपल्या विकासाचे पुढचे पाऊल म्हणून वापर करू शकता. तुमच्यामध्ये हे शहाणपण जागृत व्हायला हवे. आपण स्वतःला बदलतो तेव्हाच इतरांना प्रेरणा देण्यासाठी खऱ्या अर्थाने पात्र ठरतो. ही स्वबदलाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today