उत्सव पंचेंद्रियांचा, जीवनाचा...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 August 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
तुमची पंचेंद्रिये अग्नीसारखी आहेत. तुम्ही या पंचेंद्रियांमध्ये टाकाल ते या अग्नीत भस्म होते. आपण अग्नीमध्ये विषारी पदार्थ टाकल्यास त्यांच्या ज्वलनामुळे प्रदूषण आणि दुर्गंध निर्माण होतो, पण तुम्ही चंदन टाकल्यास सुगंध दरवळतो. जीवनाला आधार देणारा अग्नी नाशही करू शकतो. अग्नी घराला तप्त करू शकतो किंवा जाळूही शकतो. होळीभोवती उत्सव साजरा करतात. चितेच्या अग्नीभोवती शोक असतो. एखादा जळणारा टायर विषारी वायू निर्माण करतो. तुपाचा दिवा परिसर उजळवतो आणि तो शुद्ध करतो.

तुमच्यातील अग्नी हा धूर आणि प्रदूषण निर्माण करतो किंवा तुम्ही कापरासारखे जळून उजेड आणि सुगंध निर्माण करू शकता. यातले तुम्हाला काय आवडेल? एखादा साधूपुरुष हा प्रेमाचा प्रकाश आणि सुगंध निर्माण करतो, तो जीवनसखा आहे. प्रकाश आणि ऊब निर्माण करतो, तो अग्नी उच्चदर्जाचा आहे.

प्रकाशाबरोबर थोडा धूर निर्माण करतो तो मध्यम दर्जाचा अग्नी होय. धूर आणि अंधार निर्माण करतो तो हलक्या दर्जाचा अग्नी आहे. या वेगवेगळ्या अग्नींमधील फरक ओळखण्यास शिका. तुमची इंद्रिये सत्कृत्यात गुंतली असताना तुम्ही प्रकाश व सुगंध निर्माण कराल. ती अशुद्धतेमध्ये गुंतल्यावर तुम्ही धूर आणि अंधार निर्माण कराल. संयम हा तुमच्यातील अग्नीचा दर्जा बदलतो. तुम्ही एकटे असता तेव्हा गर्दीत राहणे म्हणजे अज्ञान आहे.

समुदायातसुद्धा अलिप्त राहणे म्हणजे ज्ञानप्राप्ती होय. गर्दीमध्ये राहून सर्वांमध्ये एकत्वाची अनुभूती घेणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. जीवनविषयक ज्ञानामुळे आत्मविश्‍वास निर्माण होतो आणि मृत्यूचे ज्ञान तुम्हाला निर्भय बनवते, आत्मकेंद्रित करते. काही जण केवळ लोकांच्या गर्दीत उत्सव साजरे करू शकतात आणि काही जण फक्त एकांतात, मौनात आनंद लुटू शकतात. मी तुम्हाला सांगतो, दोन्ही करा. एकांतात उत्सव करा, लोकांच्या बरोबरही उत्सव करा. शांतीचा समारंभ करा, कोलाहलाचाही उत्सव करा. जीवनाचा आनंद साजरा करा, मृत्यूचाही उत्सव करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today