बुद्धी आणि भय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
प्रश्‍न - बुद्धी ही प्रतिबंध, आवड, निवड, पसंत नापसंत यांना आसरा देते. बुद्धी शहाणपणालासुद्धा आसरा देते, त्यामुळे अंतर्ज्ञान प्राप्त होते. अंतर्ज्ञान हे बुद्धीच्या पलीकडचे आहे का?
गुरुदेव -
 हो, पण अंतर्ज्ञान बुद्धीतूनच झळाळून उठते. भावना आणि बुद्धी परस्पर विरोधी असू शकतात. संघर्ष निर्माण होतो, तेव्हा चांगले कोणते, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. खरेतर संघर्षामध्ये चांगला-वाईट यांचा संघर्ष नसतो. शुद्ध बुद्धी मनाच्या भावनिक वादळात अडकत नाही. शुद्ध बुद्धी ही संघर्षाच्या पलीकडे उदयाला येते. बहुतेक वेळा बुद्धी भावनांप्रमाणे रंग बदलते आणि गढूळ पाण्याप्रमाणे अशुद्ध होते. मग त्यामध्ये स्वत्वाचे प्रतिबिंब पडत नाही. निर्मळ बुद्धी स्तब्ध आणि प्रसन्न स्वत्वाला प्रतिबिंबित करते.

शुद्ध बुद्धीला कर्म काहीही त्रास देऊ शकत नाही. मुक्ती बुद्धीला शुद्ध करते. जो मुक्त झाला तो बुद्ध! भय हे भूतकाळाचे एक असे चिन्ह आहे, जे वर्तमानकाळात भविष्य दाखवते. भयाचा स्वीकार न करणारे लोक अहंकारी होतात. पण ते भयाला जाणून घेऊन त्याचा स्वीकार करतात तेव्हा ते भीतीच्या पलीकडे जातात आणि मुक्त होतात. फक्त अव्यवस्थित परिस्थितीत किंवा संपूर्ण-पूर्ण व्यवस्थेत समग्र निर्भयता शक्य आहे. संतांना आणि मूर्खांना कसलेच भय नसते आणि त्यांच्या मधोमध असलेल्या प्रत्येक अवस्थेत भीती असते. भय ही एक मौल्यवान प्रवृत्ती आहे. जग व्यवस्थित चालण्यासाठी भीती आवश्यक आहे. मृत्यूचे भय जीवनाचे रक्षण करते.

चुकांविषयीचे भय हे योग्य मार्गावर ठेवते. आजाराचे भय स्वच्छतेचे पालन करावयास लावते. दुःखाचे भय सचोटीच्या पथावर ठेवते. जगातली सगळी कार्ये सुरक्षित चालण्यासाठी थोडेसे भय आवश्यक आहे. बालकाच्या मनातील थोडेसे भय त्याला चालण्याच्या वेळी चौकस आणि सावध ठेवते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today