रक्षाबंधन : प्रेमाचे बंधन

Rakshabandhan
Rakshabandhan

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी भाऊ आणि बहिणींद्वारे आपआपसांतील नात्याचे बंध दृढ केले जातात. बहिणी आपल्या भावांच्या हातावर पवित्र धागा बांधतात. आपल्या बहिणीच्या प्रेमाला आणि उदात्त भावनांना दर्शविणाऱ्या या धाग्याला ‘राखी’ असे म्हटले जाते. भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू आणि संरक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधन वेगवेगळ्या रूपात साजरा केला जातो आणि ‘राखी’, ‘बालेवांड सालुनो’ अशा नावांनीसुद्धा भारतातल्या विविध भागांत ओळखला जातो.

राखी बांधण्याच्या परंपरेचे मूळ विविध भारतीय पौराणिक कथांमध्ये सापडते. एका कथेप्रमाणे दानवांचा राजा बळी हा थोर विष्णुभक्त होता.

भगवान विष्णूने आपले वैकुंठातील निवासस्थान सोडून बळी राजाच्या राज्याचे संरक्षण करण्याची कामगिरी स्वीकारली होती आणि देवी लक्ष्मीची इच्छा होती की, भगवंतांनी तिच्यासोबत परत आपल्या निवासस्थानी परतावे. ती आपला पती परत येईपर्यंत बळी राजाकडे आसरा घेण्यासाठी एका ब्राह्मण स्त्रीच्या वेशात गेली. श्रावण पौर्णिमेच्या उत्सवाच्या दिवशी देवी लक्ष्मीने बळी राजाच्या हाताला एक पवित्र धागा बांधला. राजाने याचे कारण विचारले असता तिने आपण कोण आहोत आणि इथे कशाला राहतो आहे, हे गुपित उघड केले. तिची सद्‌भावना आणि उद्देश जाणून राजाचे मन द्रवले. त्याने भगवान विष्णूंना तिची साथ द्यायला सांगितले. त्याने भगवान विष्णू आणि त्यांच्या निष्ठावान पत्नीसाठी आपल्या सर्स्वस्वाचा त्याग केला. त्यामुळे या सणाला ‘बलेवा’ असेही संबोधले  जाते, ज्याचा अर्थ आहे राजा बळीची भगवान विष्णूप्रती असलेली भक्ती. तेव्हापासूनच श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन किंवा पवित्र धागा बांधण्यासाठी आपल्या बहिणीला आमंत्रित करण्याची परंपरा चालत आली आहे. 

बंधनाचे तीन प्रकार आहेत : सात्त्विक, राजसिक आणि तामसिक. सात्त्विक बंधन हे तुम्हाला ज्ञान, आनंद आणि सुखाने बांधून ठेवते. राजसिक बंधन तुम्हाला साऱ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षा आणि लालसेने बांधून ठेवते, तर तामसिक बंधनात कसलाही आनंद नसतो, तरीही तुम्हाला काही प्रकारच्या गोष्टीने जोडून ठेवले जाते. रक्षाबंधन हे सात्त्विक बंधन आहे, कारण इथे तुम्ही स्वतःला सर्वांसोबत ज्ञान आणि प्रेमाने बांधून ठेवत असता. रक्षाबंधनाचा दिवस उगवताच उत्सवाची सुरवात होते. देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर बहीण आपल्या भावाला आरती ओवाळते, त्याच्या भाळी गंध आणि त्यावर अक्षता लावते आणि मंत्रोच्चार करीत त्याच्या मनगटावर राखी बांधते. मग ती त्याला गोडधोड भरवून भेटवस्तू देते. भाऊ तिच्याकडून मिळालेल्या भेटीचा स्वीकार करीत तिची काळजी घेण्याचे आणि तिला गरज पडेल तेव्हा आधार देण्याचे वचन देतो आणि तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. इथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपतो आणि उत्सवाची सुरवात होते.

या निमित्ताने पूर्ण परिवार एकत्र जमतो, हाच एक मोठा उत्सव आहे. खऱ्या अर्थाने पाहिले असता, रक्षाबंधनामध्ये प्रेम, शांती आणि रक्षण या सगळ्यांचा समावेश आहे. आता हा बहीण आणि भावाचा सण समजला जात असला, तरी नेहमीच असे नव्हते. इतिहासात अशी उदाहरणे आहेत ज्यात राखी म्हणजे रक्षण समजले जायचे. ती पत्नी, मुलगी किंवा आईकडूनही बांधली जायची. त्या काळी ऋषिमुनी त्यांच्याकडे आशीर्वादासाठी येणाऱ्या लोकांना राखी बांधत असत, तसेच दुष्ट प्रवृत्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ऋषी स्वतःला पवित्र धागा बांधत असत. शास्त्रपुराणांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे हा दिवस ‘पाप तोडक, पुण्यप्रदायक पर्व’ म्हणजेच वरदान देणारा आणि पापाचा नाश करणारा दिवस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com