esakal | शंकानिरसनातून साक्षीभावाकडे...
sakal

बोलून बातमी शोधा

All-Is-Well

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

शंकानिरसनातून साक्षीभावाकडे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
जवळीकतेची भावना असेल, तेथे शंका येऊ शकत नाही. शंका येण्यासाठी अंतर आवश्यक असते. तुम्हाला अतिशय प्रिय आणि जवळ असलेल्या गोष्टीबद्दल तुम्ही कधीच शंका घेत नाही. तुम्ही शंका घेता, त्याक्षणी ते तुम्हाला प्रिय राहिलेले नसते. दुरावा निर्माण होतो. तुम्ही स्वतःची शंका घेऊ शकता. पण तुमचे आहे, त्याची तुम्ही शंका घेऊ शकत नाही. स्वतःबद्दल शंका म्हणजे स्वतःबरोबर जवळीक नाही. आत्मीयता, जवळीक, परमसान्निध्य हे सर्व शंकेला मारक आहेत. शंका हा राखाडी रंगाचा भाग आहे, राखाडी हा काळाही नाही आणि पांढराही नाही. शंका म्हणजे तुम्हाला काहीतरी टाकून द्यायचे आहे. ही तात्पुरती स्थिती आहे. धड ना वर, धड ना खाली आणि इथेच तणावाला सुरवात होते.

मग तुम्ही ताण कसा घालवता? एखादा प्रसंग, ज्ञान किंवा नेहमीचा सुज्ञपणा यांचा इथे उपयोग नाही. कशाचा उपयोग होईल? तुम्ही शंका घेता त्याचा काळे, पांढरे म्हणून स्वीकार करा. त्याला काळे म्हणा किंवा पांढरे किंवा त्यांच्यामधील काहीतरी म्हटले तरी चालेल. राखाडी हा फक्त काळे किंवा पांढरे याची एक छटा आहे, असे बघा. कसेही असले तरी तुम्ही त्याचा स्वीकार करा. प्रामाणिक किंवा अप्रामाणिक, त्याचा स्वीकार करा. मग मन शांत होते आणि तुम्ही राखाडी रंगाच्या भागात राहत नाही. कधीही गोंधळ असतो तेव्हाच निर्णय घ्यावा लागतो. गोंधळाची स्थिती नसते, तेव्हा निर्णयाची गरज नसते. तुमच्या टेबलावर लाकडाचा तुकडा आणि बिस्कीट असल्यास तुम्हाला काय खायचे, याचा निर्णय करावा लागत नाही.

निर्णय हा नेहमी निवड करण्याविषयी असतो आणि निवड ही नेहमीच गोंधळ निर्माण करते. तुम्ही अधिक निर्णय घ्याल, तितके जास्त गोंधळून जाल. म्हणजे सर्व निर्णय घेणारे लोक हे गोंधळलेले असतात. तुमच्यात एक कर्ताभाव असतो आणि एक साक्षीभाव. कर्ताभाव हा गोंधळलेला किंवा निर्णायक असतो, पण साक्षीभाव फक्त निरीक्षण करतो आणि हसतो. कृती उत्स्फूर्त असते, तेव्हा तिच्यात कर्ताभाव नसतो. साक्षीभाव वाढत जातो तसतसे तुम्ही अधिक खेळकर आणि मोकळे राहता, मग विश्‍वास, श्रद्धा, प्रेम आणि आनंद तुमच्यामध्ये आणि सभोवती प्रकट होतात. सांसारिक माणूस अत्यंत दुःखी होतो तेव्हा तो आजूबाजूचे लोक, यंत्रणा आणि सर्वसाधारणपणे साऱ्या जगाला दोष देतो. साधक अत्यंत दुःखी होतो तेव्हा तो नुसत्या जगालाच नव्हे, तर साधनेचा मार्ग, ज्ञान आणि स्वतःलाही दोष देतो. साधक नसणे बरे. त्यामुळे तुम्ही कमीजणांना दोष देता. पण मग, साधक साऱ्या गोष्टींपासून खूप सुखही मिळवतो. आयुष्यात प्रेम भरपूर असतेच आणि भरपूर वेदनाही असतात. खूप आनंद असताना विरोधाभास त्यापेक्षा मोठा असतो.

गोष्टी आहेत तशा पाहण्यासाठी आणि साधनेचा मार्ग, आत्मा किंवा जगाला दोष न देण्यासाठी एका विशिष्ट दर्जाची परिपक्वता हवी.

loading image
go to top