सुखी आयुष्यासाठी बॉंडिंग महत्वाचं

श्री श्री रविशंकर
Saturday, 15 June 2019

चेतना तरंग 

आपल्या जीवन ऊर्जेला काही दिशा आवश्‍यक असते. तुम्ही अशी दिशा दिली नाही, तर गोंधळ उडतो. आज बहुतेक लोक गोंधळलेले दिसतात कारण त्यांच्या आयुष्याला कोणतीही दिशा नाही. तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्यात मोठ्या प्रमाणावर जीवन ऊर्जा असते. मात्र, या जीवन ऊर्जेला नेमके कोणत्या दिशेने जायचे हेच माहीत नसल्यास ती अडकून पडते.

चेतना तरंग 

आपल्या जीवन ऊर्जेला काही दिशा आवश्‍यक असते. तुम्ही अशी दिशा दिली नाही, तर गोंधळ उडतो. आज बहुतेक लोक गोंधळलेले दिसतात कारण त्यांच्या आयुष्याला कोणतीही दिशा नाही. तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्यात मोठ्या प्रमाणावर जीवन ऊर्जा असते. मात्र, या जीवन ऊर्जेला नेमके कोणत्या दिशेने जायचे हेच माहीत नसल्यास ती अडकून पडते.

एखाद्या डबक्‍याप्रमाणे साचते. एखाद्या सातत्याने वाहणाऱ्या नदीप्रमाणे आयुष्य सतत, पुढे जात राहायला हवे. ही जीवन ऊर्जा सकारात्मक दिशेने जाण्यासाठी आयुष्यात बांधिलकी अत्यावश्‍यक आहे. तुम्ही आयुष्यातील छोट्या-मोठ्या घटना पाहिल्यास त्या विशिष्ट बांधीलकीतून घडत असल्याचे लक्षात येईल. एखादा विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालयात बांधीलकीतून प्रवेश घेतो. रुग्ण आजारी पडल्यावर डॉक्‍टरकडे बांधीलकीतूनच जातो. आजारातून बरे होण्यासाठी डॉक्‍टरांचे ऐकण्यासाठी तसेच औषधे घेण्यासाठी आपण डॉक्‍टरकडे जातोय, असे तो म्हणतो. सरकार किंवा बॅंकाही बांधीलकीतूनच कार्यरत असतात.

एखादे कुटुंब बांधीलकीतून चालते, हे सांगायची गरजही नाही. आई आपल्या मुलाप्रती वचनबद्ध, मूल आपल्या पालकांप्रती, पती पत्नीशी, पत्नी पतीशी बांधील असतो. त्यामुळे, प्रेम असो की व्यापार, मैत्री किंवा आयुष्यातील अगदी कोणतेही क्षेत्र घ्या, तेथे बांधीलकी असतेच. व्यक्तीला खरोखरच कोणती गोष्ट अस्वस्थ करत असेल, तर ती बांधीलकीचा अभाव ही होय. तुम्ही केवळ निरीक्षण केले तरी हे जाणवेल. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून काही प्रकारच्या बांधीलकीची अपेक्षा करता आणि त्यांनी ती दिली नाही, तर निराश होता. आयुष्यात बांधीलकी अतिशय गरजेची असते. तुम्ही बांधीलकी नसणाऱ्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही. मात्र, या वेळी तुम्ही आयुष्यात किती बांधीलकी घेतलीच, याचेही निरीक्षण करा.

आपली बांधीलकी आपल्याकडे असणारी ताकद, क्षमतेच्या प्रमाणात असते. तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्याबद्दल वचनबद्ध असाल, तर तेवढी ताकद तुम्हाला मिळते. समाजाबद्दल बांधील असल्यास तेवढ्या प्रमाणात ऊर्जा, ताकद, आनंद मिळेल. आयुष्यात तुम्हाला नेहमी आनंद, ताकद हवी असते. तुम्हाला काहीही दिले, तरी अधिक काहीतरी हवेच असते. हे सतत अधिक काहीतरी हवे असणे तुमच्या मनाला त्रास देते आणि स्वतःच्या क्षमता पाहणे थांबवते. तुम्ही तुमच्याकडे सध्या असलेले व्यवस्थित वापरले तरच तुम्हाला अधिक काहीतरी मिळेल. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही तुमच्या क्षुद्र मनोवृत्तीलाच चिकटून बसलात तर निसर्गाने तरी अधिक का द्यावे? तुमच्यामध्ये ही सतत अधिक हवे असण्याची वृत्ती आहे, तिला केवळ वळवायला हवे. त्यामुळे, मला आणखी काय हवे आहे, याचा विचार करण्यापेक्षा मी आणखी काय करू शकतो, हा प्रश्‍न स्वतःला विचारा. त्यानंतर तुम्हाला आनंदाचा झरा सापडेल.

तुम्ही अधिकाधिक जबाबदारी घ्याल तशी अधिक ऊर्जा तुमच्यात येईल. तुमची बांधीलकी मोठी असेल तितकी ऊर्जा ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्राप्त होईल आणि गोष्टी सोप्या होतील. याउलट, ती छोटी असेल तितके तुम्ही गुदमराल. तुमच्यात प्रचंड क्षमता असते, त्यामुळे छोट्या बांधीलकीमुळे तुम्हाला गुदमरल्यासारखे होईल. मात्र, तुम्ही छोट्यामध्येच अडकून पडला आहात. तुम्ही दहा गोष्टी करत आहात आणि त्यातील एखादी चुकीची होत असली, तरीही सर्व दहा गोष्टी करणे सुरूच ठेवा. त्यामुळे, चुकीची होणारी एक गोष्टही स्वतःला बरोबर करेल. मात्र, केवळ एक गोष्ट करत असाल आणि ती चुकीची होऊ लागली तर त्या एका गोष्टीतच तुम्ही अडकून पडाल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Sri Sri Ravishankar in All is Well supplement