थॉट ऑफ द वीक : भावनिक गुलामगिरी

Lockdown
Lockdown

एका छोट्या गावात एक कुंभार राहत होता. त्याच्याकडे गाढव होते. रोज तो आपल्या गाढवाबरोबर शेतावर माती आणायला जात असे. रोज दुपारी थोडी विश्रांती मिळावी म्हणून शेतातल्या झाडाखाली कुंभार वामकुक्षी घेई व त्यावेळी गाढवाला दोरीने बांधून ठेवत असे. एक दिवस कुंभार दोर घेण्यास विसरला. जेव्हा तो त्या झाडाजवळ पोचला तेव्हा त्याने विचार केला, ‘आज मी हे गाढव कसे बांधू? मी झोपलो आणि गाढव पळून गेले तर?’ तेथून जात असलेल्या एका संताने कुंभाराला समस्या विचारली, कुंभाराने समस्या काय आहे हे सांगितले तेव्हा ते ज्ञानी संत म्हणाले, ‘‘गाढवाला रोज तू जेथे बांधतोस त्या ठिकाणी घेऊन जा. काल्पनिक दोरी वापरून त्याला बांधण्याचे ढोंग कर. मी तुला खात्री देतो की ते गाढव पळून जाणार नाही.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कुंभाराने संतांनी सांगितले तसे केले व गाढव सोडून डुलकी घेण्यासाठी गेला. जेव्हा कुंभाराला जाग आली तेव्हा तो आश्चर्यचकित झाला, कारण गाढव तिथेच होते. ‘‘या गाढवाला काय झाले? दोर नसूनही ते तिथेच कसे थांबले!’’ थोड्या वेळाने संत परत भेटले. कुंभाराने त्यांना विचारले, ‘‘दोर नसूनही गाढव तिथेच कसे काय राहिले?’’  संतांनी उत्तर दिले, ‘‘या गाढवाला गुलामगिरीची सवय झाली आहे. त्याने त्याच्या भोवतील दोर गृहीत धरले आहे.’’

याचे तात्पर्य असे की, आपण सर्वजण अशाच प्रकारच्या मानसिक गुलामगिरीत राहत असतो. आपल्याला गुलामगिरीची सवयच झालेली असते. आपण असे गृहीत धरतो की, ज्याची सवय झाली आहे तेच योग्य आहे. मग त्याचा कितीही त्रास होऊ दे. आपण आपल्याच विचारांचे गुलाम बनतो व एकप्रकारच्या भावनिक लॉकडाउनमध्ये जगत असतो, असे म्हणायला हरकत नाही. आपण अनेकदा ही गुलामगिरी विनाकारण स्वीकारत असतो. हे सर्व आपल्या मनात आहे व यातून मोकळे होणे आवश्यक आहे, हा विचारच येत नाही.

भावनिक गुलामगिरीची काही लक्षणे तपासून पाहा.
१. तुम्ही तुमचे विचार कायम दुसऱ्यांकडून तपासून घेता.
२. स्वतःचे मत कधीच विचारात घेत नाही.
३. तुम्ही विशिष्ट लोकांना खूष करण्यासाठी कायम झगडत असता.
४. काही विशिष्ट लोकांच्या विचारांचे अंधानुकरण करता.
वरील लक्षणे मानसिक गुलामगिरी दर्शवितात. यामधून मोकळे होणे आवश्यक आहे. 

मनाच्या गुलामगिरी पलीकडे जाण्यासाठी...
स्वतः च्या विचारांना आव्हान द्या.

इतरांचे  विचार व सिद्धांत ‘आहे तसे’ स्विकारण्यापूर्वी स्वतःच्या तर्कशक्तीचा वापर करून विचारांना आव्हान द्या. तुमचे मत विशिष्ट व्यक्तीकडून स्वीकारले जाईल की नाही यापेक्षा स्वतःचे मत स्वतः स्विकारणे अधिक महत्त्वाचे आहे.  

स्वतःचे पहारेकरी बना
तुम्ही दुसऱ्यांचे मत ‘आहे तसे’ स्वीकारून स्वतःचेही तेच मत बनविता. त्यावेळी तिथेच थांबा आणि स्वतःचा पहारेकरी बना. स्वतःचे निरीक्षण करा आणि विचारा, मी हा विचार का स्वीकारत आहे? माझे वेगळे मत असू शकते का?

आपल्या मनाला संधी द्या.
आपणास स्वतःचा विचार विकसित करायचा असेल आणि मुक्त व्हायचे असल्यास आपण किंवा आपले मत चुकीचे आहे, असे गृहित धरण्यापूर्वी आपल्या मनाला संधी द्या. ‘मी माझ्या स्वतःच्या विचारांसाठी आणि त्याच्या परिणामांना जबाबदार आहे,’ असा विश्वास ठेवा . जुन्या विचारांपेक्षा भिन्न असले, तरी स्वत:वर आणि स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा.

भूतकाळ आणि भविष्यकाळातून स्वत:ला मुक्त करा.
आपले  मन कल्पनांचे गुरु आहे. बहुतेक वेळा, भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील शक्यतांमुळे अपयशाची भीती निर्माण होते. स्वत:ला त्यापासून मुक्त करण्यासाठी, प्रत्येक परिस्थिती वेगळी असू शकते, असा विचार करा. भूतकाळातील नियम व विचार सद्यस्थितीमध्ये योग्य असतीलच असे नाही. परिस्थितीप्रमाणे विचारात बदल हा अनिवार्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com