थॉट ऑफ द वीक : स्वजागरुकतेतील अडथळा पूर्वग्रह

सुप्रिया पुजारी, लाइफ कोच
Friday, 19 June 2020

निशा व आर्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी. दोघी एकाच बालवाडीत गेल्या, एकाच शाळेत शिकल्या. दोघींचे स्वभाव अगदी भिन्न. निशा एकदम बिनधास्त, स्पष्टवक्ती; पण आर्या मात्र अंतर्मुख स्वभावाची. मनात काय चालू आहे, काहीच कळत नसायचे.

निशा व आर्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी. दोघी एकाच बालवाडीत गेल्या, एकाच शाळेत शिकल्या. दोघींचे स्वभाव अगदी भिन्न. निशा एकदम बिनधास्त, स्पष्टवक्ती; पण आर्या मात्र अंतर्मुख स्वभावाची. मनात काय चालू आहे, काहीच कळत नसायचे. इतर मैत्रिणींमध्ये निशा जास्त प्रसिद्ध होती. बोलका स्वभाव व मनमिळाऊ असल्यामुळे खूप माणसे जोडली, काही माणसे तुटलीही. मात्र निशाची आई अंतर्मुख स्वभावाची होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तिला निशाचे वागणे आवडायचे नाही. खूप आक्रमक मुलगी म्हणून ती तिला सतत ओरडायची. निशाची आई तिला सारखी सांगायची, ‘तुझा आक्रमक स्वभाव आहे, तुझ्या बोलण्यामुळे माणसे दुखावतात.’ सतत तेच तेच ऐकून निशाला, ‘आपण चुकीचे वागतोय,’ असे जाणवू लागले. ‘स्पष्टता म्हणजे आक्रमकता’ व त्यामुळे माणसे तुटतात हेच निशाच्या मनात बसले. आर्याची आई अगदी निशासारखी होती. ती सतत तिला, ‘तू बोलत नाहीस, आत्मविश्‍वास कमी असल्याने तू माणसे जोडू नाही शकत,’ असे सांगत होती. त्यामुळे आर्याला ‘आपण चुकीचे वागतोय,’ असे वाटू लागले. ‘माझ्यात आत्मविश्‍वास कमी आहे,’ असे तिचे मत बनले. दोघीही महाविद्यालयात शिक्षण घेऊ लागल्या. मित्रपरिवार वाढत गेला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निशाच्या मनात ‘माझ्या स्वभावामुळे माणसे तुटतात’ हेच होते; त्यामुळे तिला माणसे जोडण्याची भीती वाटू लागली. तिने स्वतःला सर्व गोष्टींपासून दूर केले. आर्या, ‘माझ्यात आत्मविश्‍वास कमी आहे,’ असे मानून एकलकोंडी राहायला लागली. एक दिवस महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. दोघी मैत्रिणींनी रोपे घेतली. आर्याचे रोपटे छान लागले, मात्र अचानक कोणाचा तरी चुकून पाय पडला व एक रोपटे तुटले. आर्या एकदम म्हणाली, ‘माझ्याकडून एकही काम चांगले होत नाही. माझ्यातच काहीतरी कमी आहे. माझ्यात आत्मविश्‍वास नाही म्हणून हे असे झाले.’ नकळत निशा म्हणाली, ‘तू मनापासून रोपटे लावलेस, पण ते टिकले नाही, यात तुझा काय दोष? आणि एक रोपटे तुटले म्हणून बाकी तुटतीलच असेही नाही. रोपे चांगली लागली आहेत त्याकडे लक्ष दे.’अचानक दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि तो क्षण आला. निशा विचार करू लागली, ‘आपली काही नाती तुटली म्हणून आपण स्वतः ला किती दोष द्यायचा? खरेच पूर्ण चूक माझी होती का? जी नाती जोडली त्याकडे आपण कधीच का पाहिले नाही? माणसे तुटली, पण जोडलीदेखील मीच ना!’ आर्या विचार करू लागली, ‘आपण किती स्वतःला दोष दिला, स्वभाव आहे तसा ठेवूनही मी आजवर चांगल्या गुणांनी पास झाले, निशासारखी मैत्रीण लहानपणापासून टिकली, याकडे मी कधीच का पाहिले नाही?’ दोघींच्याही मनातून ‘आपण चुकीचे आहोत’ हे मत कायमचे पुसले गेले.

निशा व आर्यासारखे आपणही स्वतःबद्दल मत बनवतो. ते एक दोन घटनांमुळे बनलेले असते, मात्र त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर पडतो. आपण बनविलेल्या स्व-मतालाच ‘पूर्वग्रह’ असे म्हणतात. हा आपल्या स्व-जागरूकतेमधील पहिला अडथळा असतो. काही पूर्वग्रह आपल्याला जागरूक होण्यास मदत करतात, ते कधी सकारात्मक असतात. मात्र काही पूर्वग्रह प्रतिकूल परिणामही करतात. हे पूर्वग्रह आपल्या स्वजागरूकतेवर कसा परिणाम करतात ते पाहू 

1) आपले पूर्वग्रह आपल्याबद्दलचे मत निर्माण करतात. आपण त्यावर विश्‍वास ठेवू लागतो, त्याची दुसरी बाजूही असू शकते याचा विचार करत नाही.

2) आपल्या पूर्वग्रहामुळे आपण दुसऱ्यांनाही त्याच नजरेने पाहतो. उदा. निशाच्या आईमध्ये पूर्वग्रह होता ‘स्पष्टपणा म्हणजे उद्धटपणा, परिणामी माणसे तुटणे.’ त्यामुळे तिने हा पूर्वग्रह निशाला दिला.

3) आपल्याला पूर्ण संदर्भ माहीत नसल्यामुळे जेवढे दिसते त्यावरच आपण निष्कर्ष काढतो. उदा. आर्याने एक रोपटे तुटल्याने ‘आपल्यात कायम काहीतरी कमीच राहणार’ असा निष्कर्ष काढला.

4) पूर्वग्रहामुळे आपला दृष्टिकोन अस्पष्ट राहतो. आपला योग्य दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे, हे मागील लेखामध्ये पाहिले आहेच. या पूर्वग्रहित दृष्टिकोनामुळे आपण योग्य-अयोग्यतेची जाण विसरतो.

पूर्वग्रह हा स्व-जागरूकतेमधील एक महत्त्वाचा अडथळा आहे. त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कसा होतो त्याची माहिती व निराकरण आपण पुढील लेखात पाहू.
लक्षात ठेवा, पूर्वग्रह तुमचा दृष्टिकोन ठरवितो आणि दृष्टिकोन तुमचे आयुष्य!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article supriya pujari

Tags
टॉपिकस
Topic Tags: