थॉट ऑफ द वीक : तुलनेचा चक्रव्यूह भेदताना... 

सुप्रिया पुजारी, लाइफ कोच
Friday, 2 October 2020

मागील लेखामध्ये आपण ‘तुलना’ हा विषय व त्याचे परिणाम जाणून घेतले. तुलना केल्यामुळे अपेक्षा वाढतात, त्यातूनच संघर्ष निर्माण होतो व त्यामुळे आपल्यामध्ये एक असमाधान, निराशा व अस्वस्थता येते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण व अवगुण असतात; पण तुलना केल्यामुळे आलेली ईर्षा आपल्यातील गुणांना दुर्लक्ष करायला लावते व दुसऱ्यांचे अंधानुकरण करायला भाग पाडते.

मागील लेखामध्ये आपण ‘तुलना’ हा विषय व त्याचे परिणाम जाणून घेतले. तुलना केल्यामुळे अपेक्षा वाढतात, त्यातूनच संघर्ष निर्माण होतो व त्यामुळे आपल्यामध्ये एक असमाधान, निराशा व अस्वस्थता येते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण व अवगुण असतात; पण तुलना केल्यामुळे आलेली ईर्षा आपल्यातील गुणांना दुर्लक्ष करायला लावते व दुसऱ्यांचे अंधानुकरण करायला भाग पाडते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपर्णा एका खासगी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करीत होती. सर्व सुखसोयींनी युक्त घर व ऑफिस होते. तिला सतत आपण कुठेतरी कमी पडतो ही भावना यायची. त्यामुळे दुसऱ्याचे तेच बरोबर व आपल्यापेक्षा चांगले असे वाटायचे. कधी सहकाऱ्यांची बढती, कधी मैत्रिणीची लग्न ठरल्याची बातमी इत्यादी. हे सर्व पाहून ती असमाधानी झाली होती. तिच्या घरच्यांनी, सहकाऱ्यांनी तिला खूप समजावून सांगितले; पण एक अपेक्षा पूर्ण झाली, की लगेच दुसरी मनात यायची. कायम चिडचिड व मनात क्लेश चालू होता. एक दिवस ऑफिसमध्ये एक नवीन महिला रुजू झाली. ती कायम खूप खूश राहायची. एक वेगळेच समाधान तिच्या चेहऱ्यावर होते. फोनवरसुद्धा अगदी शांत समाधानाने हसतखेळत बोलत होती. अपर्णाच्या मनात आले, ‘ही किती सुखी आहे, कसलीच चिंता नाही.’ त्या महिलेचे समाधान, खळखळून हसणे अपर्णाचे कुतूहल वाढवत होते. कुतूहलातून तिने त्या महिलेला विचारणा केली. त्या महिलेने हसून उत्तर दिले, ‘मी गेली तीन वर्षे हॉस्पिटलमध्ये होते. माझा अपघात झाला होता व मला चालता-बोलता येत नव्हते. मी तीन वर्षांनी काम करत आहे. मला आज चालता-बोलता येते, हातात काम आहे हेच खूप आहे.

गेल्या तीन वर्षांत मला खूप गोष्टींची किंमत समजली. खरं म्हणजे मी पण तुमचे निरीक्षण करीत होते. तुमच्यासारखे पद, काम करण्याची कला, तुमच्यासारखे कपडे मलाही मिळावेत असे वाटते; पण मी नक्की कष्ट करून तुमच्यासारखी बनेन.’ हे ऐकून अपर्णा अस्वस्थ झाली. मात्र, या वेळची अस्वस्थता वेगळी होती. आपले आयुष्य किती सुंदर आहे हे जाणवायला लागले. आपल्याकडे जे आहे ते आपल्यासाठी नगण्य असले, तरी इतरांच्या नजरेत ते एक स्वप्न असते, हे तिला कळले. त्यानंतर अपर्णा पूर्ण बदलली. जे आहे, जसे आहे त्यात खूप आनंदी व समाधानी राहू लागली- तुलना न करता.

तुलनेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे सोपे मार्ग आहेत
कृतज्ञता

आपल्याकडे खूप काही आहे हे जाणीवपूर्वक शोधून त्यासाठी कृतज्ञता बाळगली, की खूप गोष्टींची किंमत समजते व आपल्याकडे किती आहे याची जाणीव होते. परिणामी तुलना करायची वेळच येत नाही व आपली कार्यक्षमता अधिक बळकट होते.

आत्मविश्वास
आपल्याकडे जे आहे त्यात खूश राहून जे हवे आहे त्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल चालू ठेवावी. कोणासारखे तरी व्हावे यासाठी अंधानुकरण करण्यापेक्षा स्वतःला अधिक विकसित कसे करता येईल या विचाराने आत्मविश्वास वाढतो.

स्वत:मधील भावनिक ब्लॉक
इतरांचे यश पाहून आपल्याला त्याबद्दल खूश न होण्यामागचे भावनिक ब्लॉक मुळापासून शोधणे व त्यावर काम करणे महत्त्वाचे. एकदा हे ब्लॉक्स बाहेर पडले, की तुम्हीसुद्धा दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकाल.

स्वत:साठी ध्येय बाळगा
इतरांबरोबर तुलना करण्याऐवजी आपल्या प्रगतीसाठी काय महत्त्वाचे आहे याबद्दल ध्येय बाळगा. तुलनेतून आलेले ध्येय कायम अपेक्षाभंग करते कारण प्रत्येकाचा प्रवास, क्षमता वेगळी असते.

लक्षात ठेवा, स्वतःशी तुलना कराल तर प्रगती नक्कीच होईल. इतरांशी तुलना मात्र कायम अपेक्षाभंग करेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article supriya pujari on thought of the week