esakal | आयुष्याचं व्यवस्थापन गांधींजींच्या दृष्टीनं...
sakal

बोलून बातमी शोधा

Book

पुस्तक परिचय
महात्मा गांधींजींचे नातू अरुण गांधी यांना महात्मा गांधींजींचा जवळून असा सहवास अगदी कमी लाभला. मात्र या काळात त्यांनी डोळसपणे त्यांच्या तत्वज्ञानाचा अवलंब केला.

आयुष्याचं व्यवस्थापन गांधींजींच्या दृष्टीनं...

sakal_logo
By
प्रतिनिधी

महात्मा गांधींजींचे नातू अरुण गांधी यांना महात्मा गांधींजींचा जवळून असा सहवास अगदी कमी लाभला. मात्र या काळात त्यांनी डोळसपणे त्यांच्या तत्वज्ञानाचा अवलंब केला. गांधींजींच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासापेक्षा त्यांना हे तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं आणता येईल हे नेमकेपणानं समजून घेता आलं. 

गांधींजींना एकदा अरुण यांनी विचारलं, ‘बापुजी मला राग आवरता येत नाही.’ त्यावेळी ते दोघेजण चरख्यावर सूत कातत होते. बापुजींनी त्यांना सांगितलं की ‘आता काय करतो आहेत तू, रागाला दिशा देतो आहेस,’ बापुजींनी त्याला रागावू नकोस असं न सांगता त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ते सांगितलं. अरुण गांधी यांनी कुठल्याही व्यवस्थापन सूत्राची साक्ष न देता बापुजी एखादी बाब कशी समजवत असतं ते छान पद्धतीनं सांगितलं आहे. 

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आताच्या फेसबुक आणि ट्विटरच्या जमान्यातही त्यांनी गांधीविचार कसा प्रभावी आहे आणि त्याच्या आधारे गांधींजींचा मार्ग आजच्या काळातही कसा सुसंगत आहे ते विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केलं आहे. खूप छोट्या गोष्टी सांगून त्यांनी या महात्मा असलेल्या, पण माणूसपणा जपलेल्या महामानवाची थोरवी सांगितली आहे. गांधींजीनी त्यांना एकदा ‘तू अंडे खातोस का’ असे विचारले त्यावेळी त्यांनी हो असे खोटेच सांगितले मात्र पुढं काही काळानं त्यांना बापुजींनी बोलावून घेतले आणि त्यांना विचारले की ‘अरे मी चौकशी केली, की तू कधीच अंडे खाल्लेले नाहीस, तुझ्या आईवडिलांना मी विचारले, ते म्हणतात की त्यांनी तुला कधीच अंडे दिलेले नाही’ त्यावर अरुण यांनी सांगितले, ‘बापुजी, आम्ही केक, पेस्ट्री खातो घरी, त्यात अंडे असते म्हणून मी अंड खाल्ले ’ असे तुम्हाला म्हणालो, गांधीजींनी हसून त्याला सागितलं, ‘तु चांगला वकील होशील पोरा, जा तुझा मुद्दा मी स्वीकारतो.’ अरुण गांधी यांनी या घटनेचा  उल्लेख करून आपण खोटे वागलो त्याचा कसा त्रास झाला ते खूपच रंजक पद्धतीनं सांगितलंय आणि त्याचा आपल्याला पश्‍चाताप कसा झाला तेही कथन केलंय. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पुस्तकात अनेक आंतरराष्ट्रीय संबंध व मोठमोठ्या नेत्यांचे संदर्भ येतात. मात्र महात्मा गांधी यांच्या विचारांची कुठेही गल्लत  होणार नाहीत त्यात काही मिसळले जाणार नाही यापद्धतीनं अरुण गांधी यांनी आपल्या आजोबांची शिकवण वाचकांच्या लक्षात आणून दिली आहे. सोनाली नवांगुळ यांनी मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद करताना आशयाला कुठेही धक्का लागणार नाही कसोशीनं काळजी घेत हे विचार नेमकेपणानं वाचकापर्यंत पोहचतील याची काळजी घेतलेली आहे. कुठलाही प्रचारकी आव न आणता महात्मा गांधी यांच्यातला शिक्षक आणि त्याचवेळी जागतिक पातळीवरचा तत्वज्ञ कसा होता याचे दर्शन या पुस्तकातून होतं. अरुण गांधीयांनी गांधीवचार सांगताना जे विश्‍लेषण व चिंतन केलंय त्यामुळं हे पुस्तक एका वेगळ्याच उंचीवर जातं. 

पुस्तकाचं नाव : वरदान रागाचे 
लेखक :  अरुण गांधी, 
अनुवाद :  सोनाली नवागुंळ 
प्रकाशक - साधना प्रकाशन, 
पुणे (०२०-२४४५९६३५)
पृष्ठं - २०८  
मूल्य - २०० रुपये. 

Edited By - Prashant Patil

loading image
go to top