लस तयार होते कशी ? (डॉ. नानासाहेब थोरात)

Dr-Nanasaheb-Thorat
Dr-Nanasaheb-Thorat

लस म्हणजे निष्क्रिय किंवा मृत व्हायरसचा वापर करून आपल्या प्रतिकारशक्तीला जिवंत व्हायरसशी कसे लढायचे याचे ट्रेनिंग देणारी यंत्रणा. लस आणि औषध हे वेगळे प्रकार आहेत. लस आणि औषधे यांच्यातील मूळ फरक, कोणत्या रोगासाठी औषध योग्य की लस योग्य हे ठरते कसे आणि व्हॅक्सिनच्या या ट्रायल्स कशा चालतात याचा वेध...

लस ही एखादा ठरावीक आजार भविष्यात होऊ नये म्हणून दिली जाते, औषध (मेडिसिन) मात्र एखादा आजार झाल्यानंतर तो आजार बरा करण्यासाठी देतात, कोणतेही औषध तो आजार तात्पुरता बरा करते. औषधांचे आयुर्मान हे ८ ते ७२ तासापर्यंत असते, काही औषधांचे त्याहीपेक्षा अधिक असते. लसींचे आयुर्मान मात्र १० ते २० वर्षांपासून अगदी जिवंत असेपर्यंत असते. आयुर्मान म्हणजे कितीवेळ हे औषध किंवा लस शरीरामध्ये कार्यक्षम असेल. उदाहरणार्थ घटसर्पाच्या लसीचे आयुर्मान १० वर्षे आहे तर हिपॅटायटीस बी लसीचे आयुर्मान २० वर्षे आहे. आपण जेव्हा लस घेतो तेव्हा आपण भविष्यात होणाऱ्या एका ठरविक आजाराला रोखतो. लस आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीला अशा आजारासाठी तयार करते. औषध मात्र ठरावीक आजार काही दिवसांसाठी आपल्या शरीरातून काढून टाकते, पण तो आजार भविष्यात होणारच नाही अशी खात्री औषध देत नाही. उदाहरणार्थ पोलिओची लस घेतल्यानंतर पोलिओ होत नाही हे सिद्ध झालेय पण सर्दी किंवा तापावरील औषध घेतल्यानंतर काही दिवसानी ते आजार पुन्हा होतातच. काही लसी या फक्त एकदा घेऊन त्याचा परिणाम दाखवत नाहीत, त्यासाठी त्या ठरावीक अंतराने पुन्हा घ्याव्या लागतात, जसे की पोलिओची लस एकदाच घेऊन योग्य तो परिणाम दाखवत नसल्याने पोलिओ लसीकरण १ ते ५ वर्षाच्या बालकांमध्ये पुन्हा पुन्हा राबवले जाते. लस आणि औषध आपली प्रतिकारशक्ती वाढवतही नाहीत आणि कमीही करत नाहीत, लस प्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत करते तर औषध ठरावीक आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रतिकारशक्तीला मदत करते. जगामध्ये सध्या विविध आजारांसाठी ४० च्या आसपास लसी उपलब्ध आहेत तर २० हजारपेक्षा जास्त प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.

लस की औषध हे कसे ठरवायचे?
सध्या सर्वसामान्य लोकांना हाच प्रश्न पडलाय की कोरोना व्हायरससाठी लसच का औषध का नाही? कोणत्या आजारासाठी लसीला प्राधान्य द्यायचे की औषधाला हे तो कोणत्या प्रकारचा आजार आहे आहे आणि त्याचे मूळ उगम कशात आहे यावर ठरते, तसेच त्या आजारासाठी लस परवडेल का औषध परवडेल यावर सुद्धा ठरते. सहसा जे आजार व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून येतात आणि कमी वेळात मोठ्या लोकसंख्येला संसर्ग करतात तेव्हा असे संसर्गजन्य आजार भविष्यात पुन्हा येऊ पसरू नये म्हणून लस तयार करण्याला प्राधान्य देतात. लसी संपूर्ण लोकसंख्येचे रक्षण करण्यासाठी असतात तसेच त्या हर्ड इम्युनिटी (कळप रोग प्रतिकारशक्ती) तयार करून संसर्गजन्य आजाराचे समूळ नष्ट करतात. औषध मात्र एखाद्या रोगाचा उपचार, निदान किंवा प्रतिबंध करण्यासाठी दिली जातात. औषधे सामान्यत: एका व्यक्तीच्या आरोग्याच्या फायद्यासाठी असतात, म्हणजेच औषधे संपूर्ण लोकसंख्येचे रक्षण करू शकत नाहीत. मग असे काही आजार असतात ते संसर्गाने पसरत नाहीत त्या आजारांना  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

औषधाचा पर्याय निवडतात. काही वेळा लसीपेक्षा औषध शोधणे आणि ते सर्वांपर्यंत कमी वेळेत पोहोच करणे सोपे जाते. काही आजार संसर्गजन्य असूनसुद्धा त्याना औषधाचा पर्याय दिला जातो कारण तोच सर्वोत्तम पर्याय असतो. उदाहरणार्थ, आपल्याला पावसाळ्यात किंवा ऋतू बदलताना ताप येतो, हा ताप काही वेळा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा वातावरणातील बदलामुळे येतो, आणि तो एकाच वेळेला खूप लोकांना येतो तरीसुद्धा यासाठी लस शोधण्यापेक्षा औषधच दिले जाते, कारण या तापाचे नक्की एक कारण नसते आणि अशा वेळेला लसीपेक्षा औषधच सर्वोत्तम पर्याय ठरतो. काही संसर्गजन्य आजाराला लस तयार करण्यापेक्षा औषध शोधणे सोपे असते, उदाहरणार्थ एड्स हा आजार व्हायरसने होणारा संसर्गजन्य असूनसुद्धा त्यावरती औषध शोधले गेले लस नाही. कारण जवळपास ३० वर्षे संशोधन करून एड्सवरील औषधांचे प्रयोग यशस्वी झाले तर लसीचे अयशस्वी झाले. कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा आपल्या शरीरातच मंद गतीने उगम होतो, तसेच हे संसर्गजन्यसुद्धा नाहीत, त्यामुळे अशा आजारांना लसीपेक्षा औषधच उपयोगी पडतेय. सध्या कॅन्सरवरती लस शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत पण अशी लस तयार होण्यासाठी कमीत कमी पुढील १०-ते २० वर्षे लागतील आणि ती सुद्धा शक्यता सध्या धूसर आहे.

लस शोधण्याचे टप्पे काय? 
लस संशोधन सर्वात प्रथम विद्यापीठ किंवा सरकारी प्रयोगशाळेत होते, काही खाजगी प्रयोगशाळा पण संशोधन करतात पण ते मर्यादित आणि त्यांचा फायदा असेल तरच करतात. दुसरे म्हणजे व्हायरसवर संशोधन करणारी संस्था ही आंतरराष्ट्रीय नियमानुसार असावी लागते आणि त्यासाठी बऱ्याच आंतरराष्ट्रीय परवानग्या घ्याव्या लागतात,भारतामध्ये अशी एकच सरकारी संस्था आहे. त्यामुळे व्हायरस वर संशोधन करून लस तयार करणे पण अवघड जातेय. एका प्रयोगशाळेत तय्यार झालेली लस-औषध जगातील दुसऱ्या देशातील प्रयोगशाळेत त्याच प्रकारचे गुणधर्म आणि परिणाम (Results ) दाखवत असेल तरच त्यावरील संशोधन पुढे जाते. अशा प्रकारचे संशोधन आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये (जर्नल) प्रकशित केले जाते किंवा त्याचे पेटंट घेतले जाते. प्रयोगशाळेतील लसीचा शेवटचा टप्पा म्हणजे त्या लसींचे प्राण्यावर प्रयोग करून त्याच्या तीव्रतेचे प्रमाण पाहणे, किंवा त्या लसीमुळे प्राण्यांच्या (उंदीर, ससा किंवा माकड) आरोग्यावर कोणता परिणाम तर होत नाहीना हे पाहणे. यानंतर या प्रयोगांची सगळी माहिती सरकारी यंत्रणेला सादर करून, मानवी चाचणीसाठी मान्यता घेतली जाते.  

लसीच्या मानवी चाचण्या: 
लसीच्या मानवी चाचण्या मुखत्वेकरून मोठ्या प्रमाणात लस उत्पादित करणाऱ्या कंपन्या करतात. याचे मुख्य ३- ते ४ विभाग केले जातात. पहिल्या टप्प्यामध्ये (फेज १)  १-१० पर्यंतच निरोगी स्वयंसेवक घेऊन, त्यांच्या आरोग्यावर कोणता परिणाम तर होत नाहीना हे पाहिले जाते. दुसऱ्या टप्प्यामध्ये (फेज-२) निरोगी स्वयंसेवकांची संख्या १०० ते ५०० पर्यंत वाढवली जाते आणि पहिल्या टप्प्यासारखेच आरोग्य परिणाम पहिले जातात. तिसरा टप्पा (फेज-३) मात्र पूर्णतः वेगळा आणि लसीच्या कार्यक्षमता पाहण्यासाठी महत्त्वाचा असतो. निरोगी लोकांना लस देऊन त्याना रोगी लोकांच्यात पाठवले जाते आणि पहिले जाते की लस दिल्यावर या लोकांच्यात हा आजार येतोय का. या टप्प्यावरील चाचणी ही वैज्ञानिक नियमानुसार ''डबल ब्लाइंड'' पद्धतीची असते, म्हणजेच रुग्णाला आणि प्रयोग करणाऱ्याला माहीत होऊन दिले जात नाही की नक्की कोणत्या व्यक्तीला लस-औषध दिलें आहे. यामध्ये प्लासिबोचा पण वापर केला जातो म्हणजे रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून परंतु औषध नसलेले असे काहीतरी दिलें जाते. याच टप्प्यात नंतर काही आजार असणारे (कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब) स्वयंसेवकसुद्धा घेतले जातात. या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या वांशिकतेचे नागरिक उदाहरणार्थ अमेरिकेत चाचणी सुरु असेल तर आफ्रिकन, भारतीय, चायनीज, युरोपियन अशा लोकांचा समावेश असतो. तसेच महिला, लहान मुले, वृद्ध यांचा सुद्धा समावेश केला जातो. जर लस लहान मुलांसाठी तयार करायची असेल तरुण, किंवा वृद्ध लोकांचा समावेश केला जात नाही. 

साधारणपणे हे सर्व मापदंड वापरून जी माहिती तयार होते ती छाननी करून विश्लेषित केली जाते. ज्या देशांमध्ये ती लस विकायची असेल त्या देशातील सरकारी आरोग्य खात्याची किंवा औषध प्रशासनाची मान्यतेसाठी दिली जाते. पूर्वी लस तयार करणाऱ्या कंपन्या स्वतः तयार केलेली माहिती देत होत्या, आत्ता मात्र सर्व सरकारी यंत्रणा एकाच म्हणजे  क्लिनिकल डेटा  इंटरचेन्ज स्टँडर्ड्स कॉन्सोर्टियम (CDISC ) ने ठरवून दिलेल्या स्वरूपामध्ये घेतात. 

लसीच्या चाचणीची प्रक्रिया 
एखादी लस तयार करणारी कंपनी जेव्हा जाहीर करते कि त्यांची लस ९० टक्के कार्यक्षम आहे, ९० टक्के या अंकामागे मात्र खूप माहिती लपलेली असते किंवा खूप प्रक्रिया करून जाहीर केलेली असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्रा झेनेका यांनी त्यांच्या ब्रिटन मधील तिसऱ्या टप्प्यातील तीन हजार  स्वयंसेवकावर केलेले निष्कर्ष जाहीर केले, यासाठी त्यांच्याकडे जवळपास पाच लाख पानांची कच्ची माहिती गोळा झाली होती. या माहितीचे वेगवेगळ्या विभागामध्ये वर्गीकृत केली जाते. उदा: स्वयंसेवकाचे वय आणि लिंग, वजन आणि उंची, वांशिकता, मेडिकल इतिहास (जुने आजार, सर्जेरी झाली आहे का, आधी कोणत्या लसी दिल्या आहेत का, सध्या कोणती औषधे चालू आहेत का) किंवा स्वयंसेवकावर काही प्रतिकूल घटना झाली का, अशा अनेक विभागामध्ये हि माहिती प्रक्रिया केली जाते. या सर्व माहितीच्या विश्लेषणासाठी डेटा सायन्सचे टूल्स वापरले जातात आणि सगळी माहिती योग्य त्या संस्थेकडे जमा केली जाते. 

आजपर्यंतच्या लसीच्या इतिहासामध्ये अशी माहिती गुप्त ठेवली जात होती आणि ती फक्त लस तयार करणारी कंपनी आणि सरकारी यंत्रणा यांनाच माहिती असे. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेकाने यावेळी मात्र जगभरात विविध देशामध्ये केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे तपशीलवार परिपूर्ण विश्लेषण जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल ''लॅन्सेट'' मध्ये ८ डिसेंबरला प्रसिद्ध केले आहे. अशा प्रकारची तपशीलवार विश्लेषण जगासमोर आणणारी ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका ही पहिलीच कंपनी ठरली आहे. सर्वांत शेवटी या माहितीचे पुन्हा विश्लेषण सरकारी यंत्रणेकडून केले जाते, काही अजून माहिती हवी असेल तर त्याच्या सूचना दिल्या जातात, किंवा काही बदल करून नवीन चाचण्या घेतल्या जातात. जसे की ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका कंपनीच्या कोविड लसीच्या कार्यक्षमतेच्या माहितीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये पुन्हा काही चाचण्या सुरू केल्या आहेत. शेवटी सरकारी यंत्रणेची परवानगी मिळाल्यावर कंपन्या मोठ्या प्रमाणात लस उत्पादित करून लसीकरणाला सुरुवात केली जाते. काही वेळेला सरकारी लसीकरण कार्यक्रम राबवला जातो (उदा: पोलिओ लसीकरण) तर काही वेळेला खाजगी विक्रीसाठी सुद्धा लस ठेवली जाते (उदा: प्रवास करताना घेतली जाणारी लस). 

या सर्व प्रक्रियेला काही वर्षांचा वेळ लागतो. कोविडची लस मात्र कमी वेळात आली याचे मुख्य कारण म्हणजे सर्वच कंपन्यांनी आणि लस विकसित करणाऱ्या संशोधन संस्थांनी पहिल्या दिवसापासूनच त्या त्या देशांतील सरकारी यंत्रणेबरोबर काम केले, प्रत्येक टप्प्यातील सर्व माहिती लगेच यंत्रणेला दिली. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जगातील बहुतेक देशांचा लस किंवा औषासांठी असणारा आणीबाणी वापर प्राधिकृतता ( Emregncy Use Authorization EUA) हा कायदा. या कायद्यामुळे आरोग्य आणीबाणी प्रसंगी लस किंवा औषध जलदगतीने (Fast Track ) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये लसीकरणासाठी नियमित केले जाते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com