#MokaleVha ॲरेंज्ड मॅरेज'चा आधुनिक दृष्टीकोन

#MokaleVha ॲरेंज्ड मॅरेज'चा आधुनिक दृष्टीकोन

स्नेहा आणि रमेशचे लग्न थोरामोठ्यांनी सर्व बाबींचा विचार करून ठरवले होते. धूमधडाक्यात लग्न झाले. आपण अनुरूप जोडी जुळवून आणली या भ्रमात दोन्ही कुटुंबे होती. दोन महिन्यांतच स्नेहा आणि रमेशचे खटके उडू लागले. लग्न जमविताना दोघांनीही आपल्या आवडीनिवडी, स्वभाव याबद्दल विचार केला नव्हता. दोघेही तडजोड करायला तयार नव्हते. 

दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन स्नेहा व रमेशची समजूत घातली. नाते कसे टिकवायचे, एकमेकांना साथ कशी द्यायची व आपल्या अहंकाराला ताब्यात ठेवून आयुष्यातून आनंद कसा मिळवायचा याबद्दल त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या कौटुंबिक समुपदेशनामुळे स्नेहा आणि रमेश दोघांचेही डोळे उघडले व एक बिघडणारे नाते पुन्हा जुळून आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नियोजित विवाह ठरविताना घरातील प्रत्येक सदस्याने जागरूक असणे व समंजसपणा दाखवणे गरजेचे आहे. वयपरत्वे मिळणारी अनुभवाची शिदोरी माझ्या मते नियोजित विवाहाची सगळ्यात मोठी ताकद आहे. प्रत्येक आई-वडील आपल्या पाल्यासाठी चांगलाच जोडीदार मिळावा, ही आशा करतात. 

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, त्यांचे सामाजिक स्थान याबद्दल सखोल चौकशी केली जाते. एखादे कुटुंब आर्थिक-सामाजिक निकषांमध्ये आपल्या तोलामोलाचे ठरते तेव्हाच लग्नाची बोलणी केली जाते. परंतु नियोजित विवाह खरंच सगळ्यात चांगला मार्ग आहे का?

डिंपल आणि समीरच्या नियोजित विवाहानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा विचार माझ्या मनात आला. समीरचे कुटुंब उच्चभ्रू, भरपूर पैसा, गाडी- बंगला, समाजामध्ये उत्तम नाव-प्रतिष्ठा असणारे होते. समीर आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. समीरचे स्थळ स्वतःहून आल्यावर ते नाकारायला डिंपलच्या आई-वडिलांकडे कुठलेच कारण नव्हते. डिंपललादेखील समीरचे राजबिंडे रूप आवडले. जुजबी चौकशी केल्यावर दोन्ही कुटुंबांनी लग्न लावून दिले. 
खरी गोष्ट मात्र डिंपलला लग्न झाल्या-झाल्या लगेच कळली. समीरला दारूचे व्यसन जडले होते. तसेच आई-वडिलांच्या अमाप पैशामुळे त्याने जुगार व इतर वाईट सवयी लावून घेतल्या होत्या. त्याचे फारसे शिक्षण झाले नव्हते व महत्त्वाचे म्हणजे तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. अशा नाकर्त्या व्यक्तीशी लग्न लागल्यामुळे डिंपल कोलमडून गेली. स्वतःच्याच आई-वडिलांना दोष देऊ लागली.

नियोजित विवाह जमविण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे -

  • नियोजित स्थळाची आर्थिक परिस्थिती काय आहे, याची शहानिशा केली पाहिजे. वधू किंवा वर यांचे वैयक्तिक उत्पन्नाचे स्रोत तपासले पाहिजेत. त्यांच्यावर असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्या उदाहरणार्थ- घेतलेले कर्ज, आई-वडील इतर नातेवाइकांचा आर्थिक भार, नोकरी-व्यवसायामध्ये येऊ शकणारी आर्थिक संकटे याविषयी सखोल माहिती घेतली पाहिजे.
  • शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी. त्यांच्याकडून याविषयीची प्रमाणपत्रे न लाजता मागावीत. 
  • जोडीदाराला कुठले व्यसन आहे का, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, राहणीमान कसे आहे, जोडीदाराचा स्वभाव, आवडी-निवडी, त्याची स्वप्ने याविषयी सखोल माहिती घ्यायला पाहिजे. जोडीदार रूपाने, शिक्षणाने, स्वभावाने अनुरूप आहे का हे पडताळून पाहिले पाहिजे. जोडीदाराविषयी असलेल्या शंका लग्नाअगोदर योग्यवेळी निरसन करून घेतल्या पाहिजेत. 
  • लग्न जमविताना विवाहपूर्व समुपदेशन जरूर करून घ्यावे. यामुळे आपल्याला नियोजित जोडीदाराच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक अशा अनेक पैलूंचा उलगडा होतो. शारीरिक आजार, मानसिक कमतरता याविषयी अनेक वेळेला लपवले जाते. एक कुशल विवाहपूर्व समुपदेशक या नाजूक विषयाला उलगडून पुढील अनेक समस्यांना आळा घालू शकतो. 
  • दोन्ही जोडीदारांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात.
  • कोणाच्याही सामाजिक, राजकीय वलयाला भुलून दबून जाऊ नये. जोडीदाराचे कर्तृत्व हे सगळ्यात महत्त्वाचे मापदंड ठरवावे. जोडीदाराची आर्थिक परिस्थिती वर-खाली होईल, परंतु त्याचे कर्तृत्व कधीही त्याच्यापासून हिरावून घेता येणार नाही.
  • विवाह जमविणे पालकांच्या हातात असले, तरी ते निभावायची जबाबदारी पाल्याची असते. लग्नानंतर संकटे आली तर आम्ही तुला  मदत नक्की करू परंतु; त्या संकटांशी सामना तुझा तुलाच करायला पाहिजे, ही जाणीव आपल्या पाल्याला देणे खूप महत्त्वाचे आहे. 

पालकांनी आपल्या पाल्यावर नियोजित लग्न करायची जबरदस्ती न करता त्यांना स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सक्षम करायला पाहिजे. पालक आणि पाल्य या दोघांनी आधुनिक दृष्टिकोन ठेवत समन्वयाने, डोळसपणे, समंजसपणे एकमेकांना साथ देऊन नियोजित विवाह ठरवला, तर नक्कीच आपले नियोजित वैवाहिक आयुष्य सुखाचे ठरेल.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com