‘बारा दिवसांचा’ स्पेनमधला नाताळ (जयप्रकाश प्रधान)

Jayprakash-Pradhan
Jayprakash-Pradhan

नाताळवर यंदा साऱ्या जगात कोरोनाचं सावट आहे, त्यामुळं या वेळी दरवर्षीच्या उत्साहानं नाताळ साजरा होणं शक्य नाही. पण, त्याच पार्श्वभूमीवर आठवण झाली, ती स्पेनमध्ये चक्क बारा दिवस साजरा होणाऱ्या नाताळ उत्सवाची. सर्वत्र नाताळ सात दिवसांचा असला, तरी स्पेनमध्ये मात्र तो बारा दिवस मानण्यात येतो. काही वर्षांपूर्वी स्पेनमधील ''मलगा'' प्रांतात डिसेंबर - जानेवारी महिन्यांत मी व पत्नी जयंतीनं मुक्काम केला व या नाताळ महोत्सवात सहभागी होऊन त्याची माहितीही घेतली. बारा दिवसांचा, म्हणजे २५ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंतचा नाताळ बहुतेक साऱ्या स्पेन राष्ट्रात साजरा होत असला, तरी मलगा या प्रांताचं महत्त्व थोडं निराळं असल्याचं, युरोपमधील मित्रांकडून समजलं. सुमारे सहा लाख लोकवस्तीचं मलगा हे स्पेनमधील सहाव्या क्रमांकाचं मोठं शहर. स्पेनच्या दक्षिण किनारपट्टीवर भूमध्य सागरात उत्तरेकडं ते वसलं आहे. मलगा प्रांतामध्ये सुमारे ३१ लहान-मोठ्या गावांचा समावेश होतो व मलगा त्याची राजधानी आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन-चार महिन्यांत युरोपमधील कोणत्याही शहरापेक्षा येथील हिवाळा सुखद असतो. तापमान साधारणतः १७-१८ डिग्री सेल्सिअसच्या घरात राहिल्यानं थंडीचा त्रास होत नाही, शिवाय आनंदही लुटता येतो. त्यामुळं विशेषतः ब्रिटन व युरोपमधील अनेक देशांतील नागरिकांची इथं नाताळमध्ये चांगली गर्दी उसळते. त्यामुळं या बारा दिवसांच्या नाताळचं आकर्षण आणखीनच वाढतं. म्हणूनच मलगामधील ''बेनालमाडेना'' या समुद्रकिनाऱ्यावरील सर्वांगसुंदर शहरात आम्ही १५ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत मुक्काम केला, मनसोक्त भटकंती केली आणि नाताळची मजाही लुटली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ख्रिश्चन व पॅगन परंपरांचं एकत्रीकरण म्हणजे हा बारा दिवसांचा नाताळ. ख्रिश्चन परंपरेनुसार २५ डिसेंबरला नाताळ साजरा केला जातो. कारण, त्या दिवशी जीझसचा जन्म झाला. ३१ डिसेंबर, म्हणजे वर्षाला निरोप द्यावयाचा व नवीन वर्षाचं स्वागत करायचं. पण, स्पेनमधील ख्रिसमस सोहळा तिथंच थांबत नाही. पाच जानेवारीची रात्र व सहा जानेवारीची सकाळही फार महत्त्वाची मानण्यात येते. ''थ्री किंग्स डे'' (Three King’s Day) म्हणून तो दिवस ओळखला जातो. २४ डिसेंबर ही ख्रिसमसइव्ह असली, तरी २२ डिसेंबरपासूनच नाताळच्या खऱ्याखुऱ्या जल्लोषाला इथं आरंभ होतो. त्या दिवशी मोठमोठ्या रकमांच्या स्पॅनिश लॉटरीज ठिकठिकाणी काढण्यात येतात आणि टीव्हीवर, शाळकरी मुलं गाण्यांतून त्यांच्या विजयी नंबरांची घोषणा करतात. बहुतेक स्पॅनिश लोक बऱ्याच आधीपासून त्या तिकिटांची खरेदी करतात. आपल्याला लॉटरी लागली का, याबाबत प्रत्येकाला मोठी उत्सुकता असते. एकदा का लॉटरीची बक्षिसं जाहीर झाली, की नाताळची सुटी व खरेदी यांना खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि प्रत्येक घर नाताळमय झालेलं दिसतं.

ख्रिसमसइव्हला - नाताळच्या पूर्वसंध्येला स्पॅनिश भाषेत ‘Nochebuena’ असं म्हणतात. २४ डिसेंबरचा हा एक कौटुंबिक सोहळा असतो. जवळचे, लांबचे नातेवाईक एकत्र जमतात आणि वाइन, मांस यांची मेजवानी असते. या जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे, वर्षभर जे पदार्थ आपण खात नाही, असे खास पदार्थ त्या दिवशी बनविण्यात येतात आणि मुख्य म्हणजे, सर्व प्रकारच्या डेझर्टची रेलचेल असते. या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या दिवशी रात्री बहुतेक रेस्टॉरंट्स बंद असतात. कारण जेवणाच्या मेजवान्या प्रत्येकाच्या घरी होतात आणि नातेवाईक, मित्र यांना त्यासाठी आग्रहानं बोलाविण्यात येतं. जे धार्मिक कॅथलिक असतात, ते रात्री जेवणानंतर चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात. तिथं गिटार, ड्रम आदींवर पारंपरिक गाणी वाजवून, परमेश्वराच्या या सुपुत्राचा जन्म साजरा करण्यात येतो. त्या दिवशी रात्री काही ठिकाणी, Santa claus‘ - ज्याला स्पॅनिशमध्ये ‘Papanoel ‘ म्हणतात, तो मुलांना भेटवस्तू वाटतो. अर्थात, याबाबत इथं निरनिराळ्या प्रथाही आढळून येतात. आता नाताळला नुसती सुरुवात झाली आहे. २५ डिसेंबर हा नाताळचा दिवस. ख्रिसमस इव्हला मस्त मेजवान्या झोडल्या तरी, नाताळच्या दिवशीही सर्व कुटुंबीय जेवणासाठी एकत्र जमतात. पण, आदल्या रात्रीच्या एवढं जेवणाचं स्वरूप मोठं नसतं. आदल्या रात्री ''पापा नोएल''ने काय भेटी दिल्या, त्या सर्वांना दाखविण्याचा कार्यक्रम घराघरांत सुरू असतो.

२५ डिसेंबर साजरा झाल्यानंतर आता लक्ष लागलेलं असतं, २८ डिसेंबरकडं. हा ''होली इनोसन्ट डे'' म्हणून पाळला जातो. स्पेनमध्ये तो ''एप्रिल फुल डे'' म्हणून साजरा होतो. प्रत्येकजण एकमेकांची गम्मत करीत असतो. या दिवशी तुम्ही जे पाहता किंवा ऐकता त्यावर फारसा विश्वास ठेवायचा नसतो.

३१ डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. ख्रिसमसइव्ह ही कुटुंबीयांसमवेत, तर नववर्षाची पूर्वसंध्या ही मित्र-मैत्रिणींबरोबर साजरी केली जाते. रात्रीचं जेवण झाल्यानंतर, वर्षाचे शेवटचे क्षण व नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण शहराच्या चौकांत किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमतात. मध्यरात्रीनंतर अक्षरश: जल्लोषात, नाच-गाण्यांत आणि आवाज व प्रदूषण न करणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं स्वागत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सारा थंडा कारभार, रस्त्यावर अगदी सामसूम असते.

पण अजून स्पेनमधील नाताळ संपलेला नसतो हं ! स्पॅनिश कुटुंबांतील अगदी तरुण मंडळींच्या दृष्टीनं ५ जानेवारी हा फार महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशीही सार्वजनिक सुटी असते. प्रत्येक शहराच्या सर्व चौकांत प्रचंड मोठ्या फ्लोट मिरवणुका निघतात. त्यांत वादक, गायक, कलाकार निरनिराळे आकर्षक कपडे घालून सहभागी होतात आणि मुख्य म्हणजे, त्यात तीन राजे (Three Kings) असतात. ते शहरातील सर्व लहान मुलांना हात हलवून, त्यांचं स्वागत स्वीकारतात. परेड संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जातात. त्या दिवशीचं रात्रीचं जेवण लवकर घेतलं जातं. त्यानंतर प्रत्येक कुटुंबातील मुलं आपले बूट एकदम स्वच्छ करून घराच्या हॉलमध्ये आणून ठेवतात. दुसऱ्या दिवशी अगदी लवकर ''तीन राजे'' त्यांच्या घरात येतात, तेव्हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी भेटी कुठं ठेवावयाच्या, हे त्यांना त्यामुळं बरोबर समजू शकतं. सहा जानेवारीला जाग आली, की मुलं बूट ठेवलेल्या जागेच्या दिशेनं धावतात. म्हणजे तीन राजांनी कोणाकोणासाठी काय-काय भेटी इथं ठेवल्यात, हे त्यांना समजतं. साऱ्या स्पेनमध्ये हेच चित्र दिसतं....

सहा जानेवारीचा दिवस हा मात्र तसा क्लेशकारक असतो. कारण आज बारा दिवसांचा नाताळ सोहळा व सुटी संपून दैनंदिन जीवन सुरू होणार असतं. पण पुढल्या वर्षीच्या नाताळची वाट पहात रोजच्या कामकाजाला सुरुवात होते.अशी असते स्पेनमधील बारा दिवसांच्या ख्रिसमसची आगळी-वेगळी कहाणी. मलगात आम्हीही या नाताळची मजा लुटली आणि त्या आठवणी मनाच्या कप्प्यात बंद करून, सहा जानेवारीलाच मलगाचा निरोप घेतला.

बारा लकी द्राक्षं
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाला आरंभ करताना, स्पॅनिश संस्कृतीत एक मजेशीर प्रथा असल्याचं समजलं व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेता आला. आमच्या रिसॉर्टला लागूनच असलेल्या, कोस्टा डेल सोलच्या किनाऱ्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये बसून, आम्ही शॅम्पेन घेत, त्या वर्षाला निरोप देत होतो. रात्री ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वेटरनं दोन डिशेशमध्ये प्रत्येकी १२ द्राक्षं आणून आमच्यासमोर ठेवली. आम्हाला काहीच कळेना! वेटरनं सांगितलं, की ''ही १२ लकी द्राक्षं'' आहेत. वर्ष संपायला (१२ वाजायला) १२ सेकंदं राहिली असताना, १२ सेकंदांत ती १२ लकी द्राक्षं खायची, म्हणजे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं जातं! आम्ही दोघांनीही १२ सेकंदांत ती १२ लकी द्राक्षं संपवली.... पुढल्या वर्षीही भरपूर जगप्रवास काहीही अडचण न येता पार पडला. त्यामुळं ती १२ द्राक्षं खरोखरच लकी ठरली, असं मानायला हरकत नाही!

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com