रंगसंवाद : आदिवासी संस्कृतीतील ‘सोशल डिस्टन्सिंग’

महेंद्र सुके
Friday, 4 December 2020

महाराष्ट्रातील आदिवासी स्त्री व तिचे जीवन, या विषयावर अभ्यास करून ती संस्कृती कलाविष्कारित करण्यात गुंतलेले पुण्यातील प्रसिद्ध प्रिंटमेकर आणि चित्रकार गजराज चव्हाण! लॉकडाउनच्या काळात त्यांनी याच विषयावर कलाकृती साकारून त्याद्वारे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा संदेश दिला.

महाराष्ट्रातील आदिवासी स्त्री व तिचे जीवन, या विषयावर अभ्यास करून ती संस्कृती कलाविष्कारित करण्यात गुंतलेले पुण्यातील प्रसिद्ध प्रिंटमेकर आणि चित्रकार गजराज चव्हाण! लॉकडाउनच्या काळात त्यांनी याच विषयावर कलाकृती साकारून त्याद्वारे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा संदेश दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चव्हाण यांनी या काळात १५ ते २० कलाकृती साकारल्या. त्यात प्रामुख्याने वूडकट-लिनोकट- लिनो एचिंग या माध्यमांतील कामांचा समावेश आहे. विविध आकारांतील या वर्कमध्ये ब्लॅक अँड व्हाइट आणि काही रंग वापरून केलेल्या कलाकृती आहेत. त्यातील ३-४ कामे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा संदेश देणारी आहेत. ‘सोशल डिस्टन्सिंग-३’ या प्रिंटसाठी त्यांनी लिनोकट माध्यम वापरलेले आहे. दोन वेगवेगळ्या स्क्वेअरमध्ये आदिवासी तरुण व तरुणी आहेत. त्या दोघांच्याही तोंडावर मुखपट्टी आहे. शिवाय, ते एकमेकांत आवश्‍यक अंतर राखून आहेत. शहरांबरोबरच आदिवासी पाड्यांमध्येही कोरोनाची भीती आहे. त्यामुळे आदिवासी शहरांमधील लोकांपेक्षा जास्त काळजी घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवत आहेत, हेच चव्हाण यांनी या कलाकृतीच्या माध्यमातून समाजमनाला सांगितले आहे.

गजराज चव्हाण यांना भारत सरकारच्या संस्कृती विभागाची दोन वर्षांकरिता ‘सीनिअर फेलोशिप’ मिळालेली आहे. ती खासकरून ‘प्रिंटमेकिंग’ या विषयाकरिता आहे. त्याचे काम ते मागील वर्षापासून करीत आहेत.

प्रिंटबरोबरच ते पेंटिंगचे कामही करतात. ‘महाराष्ट्रातील आदिवासी स्त्री व तिचे जीवन’ या विषयावर चित्रे आणि प्रिंट्‌स करून, महाराष्ट्रातील आदिवासी, त्यांचे जीवनचरित्र, त्यांचे सण, लग्न, प्रेम अशा अनेक प्रसंगांसाठी त्या स्त्रियांचे नटणे, सजणे ते चित्रित करतात.

माथेरान त्यांची सासुरवाडी. त्यामुळे तेथे त्यांचे नेहमीच जाणे-येणे असते. रविवारच्या साप्ताहिक बाजारासाठी माथेरानच्या आसपास असलेल्या पाड्यांमधून आदिवासी भाज्या, फळे माथेरानच्या बाजारपेठेत आणतात. त्या सर्वांचे चित्रण त्यांनी केलेले आहे. त्यांच्या पाड्यांमध्ये जाऊन त्यांची फोटोग्राफी व स्केचेस केलेले आहेत. त्या आधारे चित्रे व प्रिंट्स तयार केलेले आहे.  

चव्हाण यांनी फाईन आर्टस्‌चा डिप्लोमा पुणे येथून घेतला असून, मास्टर ऑफ फाईन आर्टस्‌ (ग्राफिक) ही कलापदवी औरंगाबाद येथून मिळवली आहे. त्यानंतर प्रिंट मेकिंग आणि पेंटिंग करून त्या कलाकृतींची आजवर मुंबई, पुणे, बेंगळूरूसह अनेक शहरांतील कलादालनांत २७चित्रप्रदर्शने भरलीत. देश-विदेशात अनेक समूह चित्रप्रदर्शनांत त्यांच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या आहेत.

प्रतिष्ठित कलासंस्थांसह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांच्या कलाविष्कारांचा गौरव करण्यात आला आहे. महत्त्वाच्या कलासाधक संस्थांसह असंख्य कलाप्रेमींकडे त्यांच्या कलाकृती संग्रहित आहेत. लॉकडाउन काळात त्यांनी अभ्यासाचा विषय असलेल्या ‘आदिवासी संस्कृती’चा लेखाजोखा कलाविष्कृत करून कलानिर्मितीचा संग्रह आणखी 
समृद्ध केला आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write mahendra suke on Social distance in tribal culture