सांगता... लेखनमैफलीची (सायली पानसे-शेल्लीकेरी)

Saily-Panse-Shellikeri
Saily-Panse-Shellikeri

कुठलीही गोष्ट शिकवल्यानं जास्त समजते व अधिक पक्की होते, याचा अनुभव या सदरातला प्रत्येक लेख लिहिताना आला. शिवाय, क्लिष्ट विषय सोप्या भाषेत कसा मांडायचा, वाचकांचं लक्ष भरकटू न देता कसा मनोरंजक करायचा याचा अंदाज लेखागणिक येऊ लागला आणि लेखिका म्हणून माझाही अनुभव समृद्ध होत गेला...

‘शास्त्रीय संगीत ऐकायला खूप आवडतं; पण कळत काहीच नाही,’ अशा सर्व श्रोत्यांसाठी किंवा संगीत कसं ऐकावं व त्याचा आनंद कसा घ्यावा हे सर्वांना समजण्यासाठी शास्त्रीय संगीताबद्दल काही तरी लिहावं असं खूप दिवस मनात होतं. चार-पाच लेखांमधून शास्त्रीय संगीताबद्दल ढोबळ माहिती द्यावी असं ठरवलं होतं. मात्र, ‘सप्तरंग’ पुरवणीत वर्षभर सदर चालवायची संधी मिळाली. चार-पाच लेखांऐवजी वर्षभर लेख लिहिणं हे तेवढं सोप काम नव्हतं. शिवाय, भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर तांत्रिक, अभ्यासपूर्ण व कंटाळवाणं न लिहिता विषय सोपा करून जास्तीत जास्त सर्वसामान्य श्रोत्यापर्यंत तो पोहोचवणं हेही तसं अवघडच काम होतं. एवढी मोठी जबाबदारी पेलवेल का आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास नसलेल्या वाचकांनाही समजेल एवढे विषय लिहिता येतील का अशा शंका मनात होत्या. मात्र, वर्षाअखेरीस शास्त्रीय संगीताला अनेक नवीन ‘कानसेन’ मिळतील आणि त्याबद्दल कुतूहल असलेल्या रसिकांना अधिक गोडी निर्माण होईल असा विचार करून लिहायचं ठरवलं. संगीत हा खरं पाहता शब्दात विशद करून सांगण्याचा विषय नाही, तरीदेखील गायक व श्रोते यांच्यातली दरी कमी करण्यासाठी हा लेखनप्रपंच केला गेला.

शास्त्रीय संगीतात रुची नसलेल्या श्रोत्यांसाठी अतिशय प्राथमिक माहितीनं हे सदर सुरू झालं. शास्त्रीय संगीताचा उगम कसा झाला, ध्रुपदगायन म्हणजे नक्की काय, गायकाचा आवाज कसा असावा, गायकांना आवाजाचे कसे त्रास होतात याबद्दल सुरुवातीला लिहिलं. त्यानंतर उत्तर आणि दक्षिण भारतीय संगीत यांच्यातला फरक स्पष्ट केला. नंतर शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताबद्दल लिहिलं. नंतर गीतप्रकार, म्हणजेच ठुमरी, कजरी, चैती, होरी, दादरा, नाट्यगीत आदींचा थोडक्यात आढावा घेतला. शास्त्रीय संगीतात वापरल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या संज्ञाविषयी लिहिलं. बारा स्वर, त्यांची मूळ नावं, बंदिश म्हणजे काय, त्यातले प्रकार, बंदिशीचं रागगायनात असलेलं महत्त्व काही लेखांमधून स्पष्ट केलं. भारतीय संगीतातला महत्त्वाचा घटक असलेल्या ताल व लय या संकल्पनांबद्दल, तसंच ख्यालगायन कसं असतं, त्याची बढत कशी होते, राग म्हणजे काय, रागगायन कसं केलं जातं याविषयी लिहिलं. मैफलीतल्या संगतकारांबद्दल,  मंचावरच्या एकमेकांशी त्यांचं असलेलं नातं याविषयीचा उलगडाही काही लेखांमधून करण्यात आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थाट ही संकल्पना, त्यातून निर्माण झालेले राग व त्या रागांवर आधारित असलेल्या मोजक्या गाण्यांविषयीही, गायकांचे गाताना होणारे हावभाव, त्यांचा संबंध आणि त्याचा दृश्यपरिणाम, भारतीय संगीतातला एक महत्त्वाचा विषय असलेली संगीतातली घराणी, त्यांचा प्रवास यांचाही आढावा घेण्यात आला.

ललित कलांच्या सादरीकरणातून मैफलीतल्या घटकांविषयी, प्रत्यक्ष मैफल कशी असते याविषयीही लिहिलं. अशा मैफलींमध्ये कलाकाराची मानसिकता कशी असते याविषयी, तसंच राग आणि त्यांचे नियोजिलेले समय, तसंच ठराविक समयी राग गायल्यास कुठले भाव आणि रस निर्माण होतात याविषयीचा उलगडा काही लेखांमधून करण्यात आला. रियाजाचं महत्त्व, पूर्वीच्या आणि आजकालच्या रियाजात घडत गेलेला बदल, उपयोजित संगीत, संगीताचा दैनंदिन जीवनात होणारा उपयोग, संगीताशी प्रत्येकाचं असलेलं अतूट नातं, उपचारपद्धती म्हणून संगीताचा केला जाणारा उपयोग, संगीताचा मानवी मनावर होणारा सुपरिणाम आदी मुद्द्यांचाही वेध या सदरातून घेण्यात आला. 

भारतीय शास्त्रीय संगीताला गुरू-शिष्यपरंपरेचा खूप मोठा इतिहास आहे. या परंपरेचा आढावा, पूर्वीची शागिर्दी, गुरू-शिष्यपरंपरेची सद्यस्थिती, सध्याच्या युगात कलेबरोबर मार्केटिंगला आलेलं अनन्यसाधारण महत्त्व हेही मुद्दे काही लेखांमधून चर्चिले गेले. चांगल्या शिष्याची लक्षणं, कलाकाराचं आयुष्य, संगीतात होणारे बदल, श्रोते कसे असतात व कुठला श्रोता कलाकाराला अधिक जवळचा वाटतो हेही काही लेखांमधून सांगण्यात आलं. शास्त्रीय संगीत ऐकताना अनेक ठिकाणी सौंदर्यानुभूती होत असते. सौंदर्य निर्माण करणाऱ्या अशा अनेक जागा एका मैफलीत असू शकतात. अशा जास्तीत जास्त जागा काही लेखांमधून समजावून सांगण्यात आल्या; जेणेकरून मैफल ऐकताना जास्तीत जास्त आनंद मिळावा. नवनिर्मिती म्हणजे काय, ती कशी होते, कलाकाराची सृजनशीलता कशी महत्वाची असते व ती नसल्यास कलाकाराला कसा त्रास होतो हेही विशद करण्यात आलं. कलाकार आणि त्याच्यातला सामान्य माणूस हा भेद, चांगला गायक आणि त्याच्यातले गुण-दोष यांचा आढावा घेण्यात आला. संगीतसमीक्षा म्हणजे काय, तिचे निकष आणि ती कशी करतात याचाही उलगडा काही लेखांमधून करण्यात आला. पूर्वीचे संगीतमहोत्सव, त्यांत झालेल्या बदलांचा आढावाही घेण्यात आला. संगीत आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकानं स्वतः गायल्यामुळे त्याचे शरीरावर व मनावर किती चांगले परिणाम होतात, आपला मेंदू कसा कार्यरत राहतो व त्याचे काय काय फायदे होतात याचा आढावा या सांगतेच्या लेखाच्या आधीच्या लेखातून घेण्यात आला. 

तसं पाहता, संगीत या विषयावर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत; पण ती पुस्तकं विद्यार्थी किंवा संगीताचे अभ्यासक यादृष्टीनं लिहिलेली आहेत. याउलट, या सदरातले लेख सर्वसामान्य लोकांना शास्त्रीय संगीताकडे आकृष्ट करण्याच्या दृष्टीनं लिहिले गेलेले आहेत. कुठलीही गोष्ट शिकवल्यानं जास्त समजते व  अधिक पक्की होते, याचा अनुभव प्रत्येक लेख लिहिताना मी घेतला. शिवाय, क्लिष्ट विषय सोप्या भाषेत कसा मांडायचा, वाचकांचं लक्ष भरकटू न देता कसा मनोरंजक करायचा याचा अंदाज लेखागणिक येऊ लागला आणि लेखिका म्हणून माझाही अनुभव समृद्ध होत गेला.

प्रत्येक विषय वाचकांना नीट समजत आहे आणि सदर आवडत आहे हे मेलवरून येणाऱ्या प्रतिक्रियांमधून कळत होतं आणि हा प्रतिसाद पाहून अतिशय आनंद होत होता. कोरोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सदरात काहीसा खंड पडला किंवा काही कारणानं लेख मुद्रित पुरवणीत प्रसिद्ध न होता केवळ डिजिटल मीडियावर प्रसिद्ध झाला तर वाचक खंत व्यक्त करायचे. येणारी प्रत्येक प्रतिक्रिया अतिशय उत्स्फूर्त व उभारी देणारी होती आणि पुढचे लेख लिहायला अधिक प्रवृत्त करणारी होती. या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार. आलेल्या सर्व प्रतिक्रियांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी एखादं उत्तर अनवधानानं पाठवायचं राहिलं असल्यास मनापासून दिलगिरी.

वाचकांमध्ये विद्यार्थी, सर्वसामान्य वाचक, तसंच जाणकार श्रोते, संगीतशिक्षक आणि संगीतातली अनेक तज्ज्ञ मंडळीही होती. बुजुर्ग संगीततज्ज्ञांच्या कौतुकाची थाप अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी होती.

मेलमधून येणाऱ्या प्रतिक्रियांमधून बहुतेक लोक लेखांचं कौतुक करत, काही जण शंका विचारत, काही जण अधिक जाणून घेत, तर काही जण संगीत शिकण्याची इच्छा व्यक्त करत. सदर वाचून अनेक जण शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी प्रवृत्त झाले हे या सदराचं यशच आहे असं मी समजते. या सदरातल्या लेखांची कात्रण जपून ठेवल्याचं अनेक वाचकांनी आवर्जून कळवलं, तर काहींनी डिजिटल माध्यमातूनही लेख संग्रहित केले. हे लेख पुस्तकरूपात आणण्याचा आग्रहही अनेकांनी केला. एकंदर, हा प्रवास वाचकांसह मलाही तितकाच आनंददायी होता. शास्त्रीय संगीतासाठी एक स्वतंत्र सदर असावं व लोकांना शास्त्रीय संगीताबद्दल अधिक माहिती कळावी हा ‘सकाळ’ वृत्तपत्राचा उदार दृष्टिकोन शास्त्रीय संगीतासाठी निश्चितच फार महत्त्वाचा आहे.

दर रविवारी सातत्यानं लेख लिहायचं थोडंफार दडपण वर्षभर होतं, तरी आता लेखमाला संपल्याची हुरहूरदेखील वाटत आहे. या सदराच्या निमित्तानं शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी एक जबाबदारीचं आणि महत्त्वपूर्ण काम हातून घडलं. वाचकांना त्याचा फायदा झाला, याचा खूप आनंद वाटतो हे नक्की. धन्यवाद!

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

‘गंधार’ या सदरातल्या लेखांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. पुस्तकाची आगाऊ नोंदणी करण्यासाठी ‘gandhar_आपलं नाव’ लिहून ‘सकाळ प्रकाशना’च्या ८८८८८४९०५० या व्हॉट्स अप क्रमांकावर पाठवावं. आपली प्रत राखून ठेवण्यात येईल.   

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com