संगीतमहोत्सव (सायली पानसे-शेल्लीकेरी)

Saily-Panase-Shellikeri
Saily-Panase-Shellikeri

भारतीय बैठक, त्यापुढं खुर्च्या आणि त्याही पुढं सोफे आले. कलाकारांचं गायन-वादन जवळून ऐकण्याची आवड असण्याबरोबरच महागातलं तिकीट काढण्याची तयारी आणि ऐपत असणं महत्त्वाचं झालं. यातून जाणकार श्रोता दुरावला. सच्चा सूर ऐकून डोळ्यांत पाणी येणारा श्रोता कमी झाला आणि कलाकाराची तयारी ऐकून टाळ्या वाजवणारा श्रोता वाढला. शास्त्रीय संगीताबद्दल आवड असणाऱ्या श्रोत्यांपेक्षा, प्रतिष्ठा म्हणून शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या वाढली. अशा श्रोत्यांना संगीताची आवड अर्थातच कमी असल्यानं संगीताबरोबर इतर गोष्टीही महत्त्वाच्या ठरू लागल्या...

पूर्वी दिवाळी झाली की श्रोत्यांना संगीतमहोत्सवांचे-संगीतसमारोहांचे वेध लागायचे. स्वेटर-कानटोप्या घालून, शाली लपेटून मंडळी निघायची. रात्र रात्र मैफली ऐकण्यातलं सुख वेगळंच होतं. रात्रभर संगीताच्या ओढीनं बसलेले हजारो रसिक, शहरातलेच काय; पण बाहेरगावचे श्रोतेही महोत्सवाच्या तारखा बघून पुण्याची वारी निश्चित करत असत. मात्र, संगीतमहोत्सवांना एवढं मोठं स्वरूप प्राप्त व्हायच्या आधी छोटेखानी मैफली होत असत. सर्वांनी मिळून शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेणं यापलीकडे दुसरा कुठलाच हेतू त्यामागं नसे. एका खोलीत मावतील इतकेच; पण जाणकार आणि दर्दी श्रोते, मायक्रोफोनविरहित मैफल, फर्माइशी, त्यांची पूर्तता, दिलखुलास दाद, कलाकारांशी थेट संवाद, त्यांना जवळून अनुभवण्यातलं सुख...अहाहा! अशा मैफलींची सर मात्र कुठल्याच मैफलीला येऊ शकत नाही.

अशा छोटेखानी मैफली हळूहळू बंद झाल्या. कलाकार आणि रसिक यांच्यामधलं अंतर वाढलं आणि मैफलींना महोत्सवांचं-समारोहांचं स्वरूप प्राप्त झालं. शास्त्रीय संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं मैफलीची जागा महोत्सवांनी घेतली, त्यामुळे शास्त्रीय संगीत एका वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचलं. अनौपचारिक बैठक औपचारिक झाली. कलाकार आणि रसिकांमध्ये रंगमंच, तिकीट, जाहिरात यांसारख्या अनेक गोष्टी आल्या. रसिक जसे वाढले तशी बसण्यासाठी प्रशस्त जागा, आसनव्यवस्था, पार्किंग, ध्वनिव्यवस्था वगैरे गोष्टी क्रमप्राप्त झाल्या. मैफलीचा खर्च जसा वाढला तसे प्रायोजक आले. प्रायोजकांच्या मागण्या, त्यांची ढवळाढवळ आली. रसिकांना आकृष्ट करण्यासाठी नामांकित कलाकार आले. कलाकार नामांकित तसा प्रायोजक मोठा गाठणं महत्त्वाचं झालं. एका कलाकारापेक्षा अनेक कलाकार असल्यास जास्त रसिक आकृष्ट होतात या उद्देशानं मैफलीत कलाकारांची संख्या वाढली. तीन तासांच्या मैफलीत तीन वेगवेगळे कलाकार आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कलाकारांच्या गायन-वादनाचा वेळ कमी झाला. प्रत्येक कलाकाराला जेमतेम एक तास दिला जाऊ लागला. प्रतिभेवर मर्यादा आल्या आणि घड्याळ बघून प्रतिभा खुलू लागली. तुटपुंजी वेळ, त्यात नामांकित कलाकार आणि दर्जेदार संगीत यांचा ताळमेळ बसवणं अवघड झालं. रागविस्तार कमी झाला आणि चमत्कृतिपूर्ण सादरीकरणाचं महत्त्व वाढलं. कमीत कमी वेळेत रसिकांना आकृष्ट करून एकाजागी खिळवून ठेवणारे गायक श्रोत्यांना जास्त पसंत पडू लागले.

आयोजकांच्या दृष्टिकोनातून प्रायोजक मिळवणं  हे एक महत्त्वाचं काम होऊन बसलं. प्रायोजकांकडून नामांकित, प्रसिद्धीचं वलय असलेल्या गायकांची मागणी होऊ लागली. बुजुर्ग, तज्ज्ञ आणि अनुभवी गायकांपेक्षा टाळ्या मिळवणारे गायक मैफलींमधून जास्त प्रमाणात दिसू लागले. वाहिन्यांच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेले, चर्चेत असलेले कलाकार अधिक प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागले. ज्ञान आणि प्रसिद्धीचा संबंध कमी होत गेला.

अशा प्रसिद्ध कलाकारांचं गायन ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी गर्दी जमू लागली. तिकीटदरांप्रमाणे श्रोते लांब गेले. महोत्सवांत प्रसिद्ध गायकांबरोबर नवोदित गायकांनाही संधी मिळू लागली. त्यामुळे नवीन कलाकारांना मंचही मिळाला आणि प्रसिद्ध गायकाच्या बिदागीचा खर्चही कमी झाला. अशा महोत्सवांत कलाकारांना गायला मिळणं ही एक प्रतिष्ठेची बाब झाली.

कलाकारांच्या दृष्टीतून कार्यक्रम मिळवण्यासाठी खटपट सुरू झाली. आयोजकांना, संयोजकांना भेटणं, कार्यक्रमासाठी संपर्कात राहणं...इत्यादी. ज्यांना हे जमलं त्यांना कार्यक्रम मिळू लागले आणि बाकीचे कलाकार छोट्या-मोठ्या कार्यक्रमांवर समाधानी राहिले.

भारतीय बैठक, त्यापुढं खुर्च्या आणि त्याही पुढं सोफे आले. कलाकारांचं गायन-वादन जवळून ऐकण्याची आवड असण्याबरोबरच महागातलं तिकीट काढण्याची तयारी आणि ऐपत असणं महत्त्वाचं झालं. यातून जाणकार श्रोता दुरावला. सच्चा सूर ऐकून डोळ्यांत पाणी येणारा श्रोता कमी झाला आणि कलाकाराची तयारी ऐकून टाळ्या वाजवणारा श्रोता वाढला. शास्त्रीय संगीताबद्दल आवड असणाऱ्या श्रोत्यांपेक्षा, प्रतिष्ठा म्हणून शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या वाढली. अशा श्रोत्यांना संगीताची आवड अर्थातच कमी असल्यानं इतरही गोष्टी महत्त्वाच्या ठरू लागल्या. 

रंगभूषा, वेषभूषा, रंगमंचसजावट या इतर गोष्टींनाही महत्त्‍व आलं. मैफलीचं सौंदर्य यातून वाढलं; पण ऐकणाऱ्याची एकाग्रता कमी झाली. प्रख्यात सनईवादक बिस्मिल्ला खाँ यांनी एका मैफलीत असे उद्गार काढले होते : ‘‘ये लोग हजारों रुपए हम पर खर्च करते है, मगर गाने का मजा ना खुद उठाते है, ना दूसरों को उठाने देते है!’’

टाळ्या मिळवणं आणि टाळ्या देणं यांमध्ये शास्त्रीय संगीत बदलत गेलं आणि श्रोत्यांची अभिरुचीही बदलत गेली. आज संगीतमहोत्सवांमध्ये शास्त्रीय संगीताचं स्वरूप बदलत असलं तरी अनेक बुजुर्ग कलाकार ते टिकवून ठेवण्याच्या प्रयत्न करत आहेत.

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत तर प्रत्यक्ष मैफलीच्या आनंदापासून रसिक दुरावला गेला आहे. मैफलीला जातानाची मन:स्थिती, मैफलीचं वातावरण, प्रत्यक्ष अनुभव, मैफल ऐकतानाची एकाग्रता हे सगळं ऑनलाईन मैफलीत अनुभवता येणं शक्य नाही. घरात एखादं काम करता करता ऑनलाईन मैफल ऐकून त्याचा आनंद मिळूच शकत नाही. कलाकाराच्या दृष्टीतून श्रोत्यांच्या गैरहजेरीत एका स्क्रीनकडे बघून गाणं, त्यावर येणारे लाईक्स बघणं आणि ऑनलाईन येणाऱ्या प्रतिक्रिया वाचणं हे तर दिव्यच! समेची दाद दोन मात्रा सोडून यायला लागल्यावर कलाकाराची तरी एकाग्रता कशी व्हावी?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच्या लॉकडाऊन-अनलॉकनंतर प्रत्यक्ष मैफलींना आता हळूहळू सुरुवात होत आहे. फूटभर अंतर सोडून का बसेनात; पण पन्नास-शंभर लोक मैफलीला येत आहेत. तोंडाला मास्क लावल्यामुळे ‘वा’ अशी दाद देता येत नसली तरी हातानं तरी सम दाखवत आहेत! मैफल संपल्यावर गर्दी नको म्हणून कलाकाराला न भेटता का जात असेनात, मैफलीला येतात याचा तरी आनंद मानायला हवाच!
हे सर्व लवकरच पूर्ववत् होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना...

पुढच्या लेखात आपण ‘स्वरलिपी’ या विषयाबद्दल जाणून घेऊ या.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com