रणजित डिसले यांच्या निमित्तानं... (विद्या सुर्वे-बोरसे)

Vidya-Surve-Borase
Vidya-Surve-Borase

शिक्षकाच्या ठायी सामाजिक जबाबदारीचं भान, काळाचं भान असेल आणि सर्जनशीलता असेल तर तो आपल्या स्पर्शानं व सहवासानं फक्त शाळाच नव्हे तर, अवघं गाव बदलून टाकतो. बाल-कुमारांच्या सहवासात राहणं आणि त्यांना मुक्त आकाशात भरारी घेण्यासाठी बळ देणं हे शिक्षकाचं मोठं कार्य असतं. 

रणजित डिसले हे नाव आज सगळ्या देशाला ठाऊक झालं आहे. डिसेंबरच्या एक किंवा दोन तारखेला काही हजार शिक्षक आणि परिचित व्यक्तींपलीकडं हे नाव फारसं ठाऊक नसेल. ‘युनेस्को’ आणि ‘वार्की फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिलं जाणारं ‘ग्लोबल टीचर ॲवॉर्ड’ डिसले यांना जाहीर झालं आणि समाजमाध्यमांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सात कोटी रुपयांचं बक्षीस आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकाला मिळालं आहे. शंभरहून अधिक देशांतल्या हजारो शिक्षकांनी ज्यासाठी प्रयत्न केले तो पुरस्कार जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकानं मिळवावा ही सर्वसामान्यांसाठी खूप आनंदाची बातमी.

‘जिल्हा परिषद शाळा’ ही अशी एक वास्तू आहे, जिच्याशी- चाळिशी ओलांडलेल्या बहुतेक सर्व - मराठी माणसांच्या स्मृती निगडित असतात. महाराष्ट्रातले अनेक थोर शास्त्रज्ञ, अनेक वैज्ञानिक, विद्यापीठांचे अनेक कुलगुरू, वृत्तपत्रांचे अनेक संपादक, अनेक राजकारणी जिल्हा परिषदेच्या शाळांचे अथवा सरकारी शाळांचे विद्यार्थी आहेत. चाळिशी ओलांडलेल्या बहुतेकांच्या मनात या शाळेविषयी, त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांविषयी अपार आस्था आहे; पण प्रत्यक्षात जेव्हा या पिढीच्या खिशात पैसा खेळू लागला आणि गावोगावी इंग्लिश शाळांचं पीक गेल्या दोन दशकांत उभं राहिलं तेव्हा आणि ‘इंटरनॅशनल स्कूल’ नावाच्या चकचकीत शाळा तालुक्यातालुक्यात उभ्या राहिल्या तेव्हा चाळिशीच्या आसपासच्या या पिढीनं आपल्या अपत्यांना अशा शाळांच्या हवाली केलं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या अथवा सरकारी शाळेविषयीच्या चांगल्या बातम्या अपवादात्मक छापून येऊ लागल्या. या शाळा आपल्यासाठी नाहीतच असा एकूण आविर्भाव धनवंत पिढीच्या मनात निर्माण होत गेला. जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या गुणवत्तेचा या पिढीला विसर पडला. शाळाबाह्य कामांना या शिक्षकांना जुंपलं जातं, यापलीकडे फारसं कुणी बोलेनासं झालं. खरं तर डीएड होणं हे सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्याच्या आवाक्यात दोन दशकापूर्वीपर्यंत नव्हतं.

गावोगावचे प्रतिभासंपन्न, हुशार, बुद्धिमान आणि बेताची आर्थिक परिस्थिती असणारे विद्यार्थी दोन दशकांपूर्वी डीएडचा पर्याय निवडत असत. द्वितीय वर्ष उत्तीर्ण होताच नोकरी मिळते हा आत्मविश्वास त्या काळात होता, ग्रामीण भागात सेवा देण्याची तयारी असणारे, कळकळ आणि तळमळ असणारे हुशार विद्यार्थी जिकडं तिकडं पाहायला मिळत. अशा विद्यार्थ्यांचा कुटुंबाला आणि गावालाही अभिमान होता.

गेल्या दोन दशकांत खासगीकरणाचं वारं वेगानं वाहत गेलं. सरकारी संस्था हळूहळू बाजूला पडत गेल्या किंवा त्यांना  परिघावर जाणीवपूर्वक लोटलं गेलं. सरकारी शाळांच्या इमारती ढासळत जात असताना आणि ‘लोकसहभागातून त्या बांधा’ असा आदेश निघत असताना इंग्लिश शाळांनी भांडवलाच्या बळावर जोरदार मुसंडी मारली.

एकीकडं शिक्षणक्षेत्रात असे मोठे बदल घडत असतानाच, दुसरीकडं समर्पित भावनेनं आपलं ज्ञानदानाचं कार्य खेड्यापाड्यात अव्याहत सुरू ठेवणारे शेकडो शिक्षक होते. 

वर्षाचे ३६५ दिवस ज्यांची शाळा उघडी असते असे पाच-पन्नास शिक्षक आजही महाराष्ट्राच्या सरकारी शाळांमध्ये असतील. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी वस्तीवस्तीत, घराघरात जाऊन अध्यापन केलं असे शेकडो शिक्षक राज्यात आहेत आणि ज्यांनी आपल्या तुटपुंज्या पगारातून आपली शाळा रंगवली, बांधली, तिला जीवनदान दिलं असेही असंख्य शिक्षक आज वाडी-तांड्यावर आढळतील. हे शिक्षक नव्या अभ्यासक्रमाविषयी, पाठाविषयी, घटकाविषयी तासन् तास अभ्यासपूर्ण चर्चा करतात, अभ्यासक्रमाला पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करतात. एकमेकांना प्रोत्साहन देतात.  

डिसले हे देशाला अभिमान वाटावा असे शिक्षक आहेत. त्यांनी पाठ्यपुस्तकांसाठी क्यूआर कोडची निर्मिती केली. अन्य देशांतल्या विद्यार्थ्यांशी आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांचा संपर्क घडवून आणला. एकमेकांना एकमेकांशी जोडलं. अशांत प्रदेशांतल्या शालेय शिक्षणाला साह्य केलं या ठळक बाबी. विशेष बाब अशी की पुरस्कारातून मिळणाऱ्या रकमेतली अर्धी रक्कम त्यांनी अन्य उपक्रमशील शिक्षकांना देऊ केली. दातृत्वाचा हा गुण पुस्तकातून शिकवता येत नसतो, तो आचरणातूनच इतरांपर्यंत पोहोचचावा लागत असतो. 

राम शेवडीकर हे ‘उद्याचा मराठवाडा’ नावाचं नियतकालिक संपादित करत असतात. त्यांच्या सन २०१८ च्या दिवाळी अंकात डिसले यांनी तंत्रस्नेही शिक्षकांच्या कार्याचा परिचय करून दिला आहे. ‘झेडपीगुरुजी डॉट कॉम’ या संकेतस्थळाची निर्मिती करणारे सुनील अलूरकर, मालेगाव तालुक्याच्या टोकाला असणाऱ्या दुधे गावातले भारत पाटील, मल्याण मराठी शाळेतील आनंद आनेमवाड, दीपक भांगे, नगरचे रवी भापकर, अलेक्सा हा महिला-रोबो तयार करणारे नागनाथ विभूते, चार डझन शैक्षणिक ॲप तयार करणारे सचिन शेळके, विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून सर्व ते प्रयत्न करणारे यवतमाळ जिल्ह्यातले शफी शेख आणि इतर अनेक शिक्षकांविषयी डिसले यांनी या अंकात भरभरून लिहिलं आहे. या सर्व शिक्षकांनी स्वखर्चातून आपली शाळा डिजिटल केली आहे. या शिक्षकांच्या शाळेत गेलात तर आनंदी विद्यार्थ्यांची फौज कुठं रोबोबरोबर गाणी म्हणताना दिसेल, कुठं इंग्लिश कविता लिहिणारे विद्यार्थी दिसतील, ज्या तासाला आपली गैरहजेरी होती त्या तासात काय शिकवलं गेलं हे जाणून घेण्यासाठी एखादा विद्यार्थी त्या तासाचा सरांचा व्हिडिओ पाहताना दिसेल किंवा शाळेच्या भिंतींच्या आभासी प्रयोगशाळेत मोबाईलच्या साह्यानं प्रयोग करताना कुणी दिसेल. दोन वर्षांपूर्वीच्या या लेखात डिसले यांनी लिहिलं आहे, ‘राज्यातल्या शिक्षकांनी चार हजारांपेक्षा अधिक ॲपची निर्मिती केली आहे. पन्नास हजारांहून जास्त व्हिडिओ तयार केले आहेत आणि हे सगळं स्वयंप्रेरणेनं केलं आहे.’   

वेल्हाणे गावाचं रूपडं बदलणारे डॉ. सुभाष बोरसे यांचा प्रवास दोन दशकांपासून मी जवळून पाहिला आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेसाठी त्यांना अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. डॉ. सुरेश सावंत आणि माथू सावंत या साहित्यिक-जोडप्यानं शिक्षकांबद्दल असलेल्या मनातल्या भावनांविषयी विद्यार्थ्यांना लिहितं केलं आणि त्या लेखांचं संकलन-संपादन केलं. एका शिक्षकाचं विद्यार्थ्यांच्या जीवनातलं स्थान काय असतं ते हे संपादित पुस्तक चाळताना सहज लक्षात येतं. 

डॉ. सावंत यांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. पुरस्कारांपासून दूर विद्यार्थ्यांत रमलेले शिवाजी आंबुलगेकर हे शिक्षक किंवा विद्यार्थ्यांना गावातल्या व्यक्तींची नवी ओळख ‘झेप’च्या माध्यमातून घडवणारे बालाजी मदन इंगळे यांच्यासारखे शिक्षक आपल्या शहराच्या आजूबाजूलाच असतात.

ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्याच्या पाष्टे पाड्यातले संदीप गुंड, राहुरीच्या नगर परिषद शाळेतल्या मनीषा रामकिसन गिरी, पारगाव जोगेश्वरी-आष्टीचे सोमनाथ वाळके, दादेगावच्या शाळेतले व ‘बालजगत’ या संकेतस्थळाची निर्मिती करणारे अनिल सोनुने, विशेष मुलांना संगीतशिक्षण देणारे व आपला एक पूर्ण पगार गरीब मुलांच्या शैक्षणिक साहित्यावर खर्च करणारे मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळच्या शाळेतले अमृत पाटील, वीटभट्टीमजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारे मुरबाड-ठाणे इथले विनोद सुरवसे, स्थानिक साहित्याचा वापर करून शैक्षणिक साधनांची निर्मिती करणारे पालघर-बालीपाड्याचे विजय वाघमारे, भटक्यांच्या मुलांसाठी झटणारे महेश निंबाळकर, गणिताची भीती निघून जावी म्हणून अंकशिडी तयार करणारे सातारा-सरडेगावठाण इथले सचिन यादव, गणिताचे विविध प्रयोग करणारे जालना जिल्ह्यातले दीपक गाडेकर, मुलांमध्ये रमणारे दयासागर बन्ने, सुभाष विभूते असे अनेक शिक्षक आपल्या आजूबाजूला आहेत. 

शिक्षकाच्या ठायी सामाजिक जबाबदारीचं भान, काळाचं भान असेल आणि सर्जनशीलता असेल तर तो आपल्या स्पर्शानं व सहवासानं फक्त शाळाच नव्हे तर, ते अवघं गाव बदलून टाकतो. बाल-कुमारांच्या सहवासात राहणं आणि त्यांना मुक्त आकाशात भरारी घेण्यासाठी बळ देणं हे मोठं कार्य आहे. डिसले गुरुजी आपल्या लॅपटॉपवरून वर्गातल्या विद्यार्थ्यांचा अन्य देशांतल्या शालेय विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणत आहेत असा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत फिरत होता...कुठल्याशा दूरच्या गावांतल्या लेकरांच्या ओठांवर त्या क्षणी असलेलं स्मितहास्य अनमोल आहे. डिसले गुरुजींनी फुलवलेल्या या हास्याची मोजदाद पैशात करता येणार नाही.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com