नायकांच्या शोधात बालकुमार... (विद्या सुर्वे-बोरसे)

Vidya-Surve-Borase
Vidya-Surve-Borase

आपण वाचतो त्या सगळ्याच कथांमध्ये एक नायक असतो, क्वचित कधी कधी एखादा खलनायकही असतो; पण आपण सगळेच स्वप्न पाहत असतो नायक होण्याचं. हीरो होण्याचं. कारण, हीरो झाल्यानंतरच आपल्याला मिळणार असते आपली ओळख. खरीखुरी ओळख. सगळेच बालकुमार हे नव्या युगाचे नायक आहेत. उद्याच्या कालपटलावर त्यांचे कर्तृत्व ठळकपणे लिहिलं जाऊ शकेल. त्यांच्या कर्तबगारीच्या कथा नंतरचे बालकुमार मन लावून वाचतील. नव्या नायकांचा शोध कुठल्याच काळात थांबत नसतो!

‘पुस्तकं काही सांगू इच्छितात...तुमच्या जवळ राहू इच्छितात’ अशी सफदर हाश्मी यांची एक प्रसिद्ध हिंदी कविता आहे. या कवितेत त्यांनी म्हटलं आहे : ‘किताबे करती है बातें...बीते जमानों की...दुनिया की...इंसानो की...आज की...कल की...एक एक पल की...’

पुस्तकांचं जग हे अगदी विस्मयकारक जग आहे. या जगात आनंदाचा खजिना दडलेला आहे. पुस्तकं कशासाठी हवी असतात? ज्ञानासाठी, माहितीसाठी, मनोरंजनासाठी, कसं जगावं हे शिकण्यासाठी आणि स्वतःला पुन्हा नव्यानं भेटण्यासाठी. आपण पुस्तक वाचून हातावेगळं करतो तेव्हा आपण पूर्वीचे राहिलेलो नसतो. आपण पूर्वीपेक्षा संपन्न, समृद्ध आणि नवे झालेलो असतो. पुस्तकं आपल्याला जुनं होऊ देत नाहीत, ते आपल्याला सतत उजळत असतात.

पुस्तकांच्या जगाचं विभाजन दोन भागांमध्ये करता येईल. पहिला भाग मोठ्यांसाठीच्या पुस्तकांचा आणि दुसरा भाग छोट्यांसाठीच्या पुस्तकांचा. छोट्यांसाठी असणारा भाग दुसऱ्या भागाच्या तुलनेत अधीक आकर्षक आहे. या जगातली पुस्तकं देखणी, आकर्षक आणि रंगीत आहेत. अद्भुताचं प्रचंड मोठं विश्व या पुस्तकांनी स्वतःत सामावलेलं आहे. ही पुस्तकं बोध देतात आणि करमणूकही करतात. ही पुस्तकं ज्ञानी बनवतात आणि कल्पनेचे पंखही देतात. नीती शिकवतात आणि सदाचारीही बनवतात. चरित्र घडवतात आणि वाचकाचं व्यक्तिमत्त्वही आकाराला आणतात. पुस्तकांचं जग मोठं मनोहारी आहे. थोरा-मोठ्यांची चरित्रं, ज्येष्ठांनी सांगितलेली आत्मकथनं, गोष्टी, चित्रकथा, कादंबऱ्या, काल्पनिका, लोककथा, शौर्यकथा, स्थळमाहात्म्य, कविता, गाणी यांची या जगात निव्वळ रेलचेल आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या जगाचे नायकसुद्धा लोकविलक्षण आहेत. वाचकांच्या समूहमनावर साम्राज्य करणारे हे नायक मुलांमध्ये नवा विश्वास, नव्या श्रद्धा आणि नवी उमेद जागवतात. लहान असल्यापासून आपण अशा नायकांच्या कहाण्या ऐकलेल्या आहेत. या कथा ऐकता ऐकता आपणही त्यांच्यासारखं होण्याची जिद्द बाळगली होती. ध्रुवबाळाची कथा, श्रेष्ठ धनुर्धर एकलव्याची कथा, कवचकुंडलं दान करणाऱ्या कर्णाची कथा, राजवैभवाचा त्याग करून ज्ञानाच्या शोधात बाहेर पडलेल्या सिद्धार्थ गौतमाची कथा, अहिंसा शिकवणाऱ्या महावीरांची कथा, ‘शेजाऱ्यावर प्रेम करा,’ अशी शिकवण देणाऱ्या येशूची कथा, क्षात्रधर्म शिकवणाऱ्या गुरू गोविदसिंगांची कथा, लढवय्या महाराणा प्रतापांची कथा, रयतेचा राजा छत्रपती  शिवाजीमहाराजांची कथा...अशा महापुरुषांच्या कथा ऐकून-वाचून ‘आपण त्यांच्या ठायी व्हावे’ असा बोध आपण मिळवला आहे. स्वातंत्र्यसंग्रामातले लढवय्ये, समाजसुधारक, क्रांतिकारक, वैज्ञानिक, खेळाडू, उद्योगपती, दर्यावर्दी, विचारवंत, राजकीय नेते असे अनेक लोक सतत प्रयत्न करत राहिले आणि त्यामुळे आपलं जग संपन्न झालं. ‘स्वतःसाठी जगलास तर मेलास, समाजाच्या प्रगतीसाठी जगलास तरच खरा जगलास,’ ही शिकवण थोरांच्या चरित्रांनी आपल्याला दिली. या थोर व्यक्ती आपल्यासाठी अनुकरणीय आहेत, त्या आपल्या नायक आहेत हे आपल्याला कळून आलं ते केवळ पुस्तकांमुळेच.

दुसऱ्याही एका प्रकारचे नायक पुस्तकांनी आपल्यापर्यंत पोहोचवले. बालकुमारांच्या वयाचे, बालकुमारांसारखेच शाळेत जाणारे, धडपड करणारे हे बालनायक म्हणजे बालकुमारांच्या मनात असणाऱ्या आदर्श रूपाचे जणू प्रतिनिधी आहेत.

मराठी बालकादंबरीचं समृद्ध दालन आपण उघडलं तर हवेहवेसे बालनायक आपल्याशी मैत्री करायला उत्सुक आहेत. मराठी कथा-कादंबऱ्यांतून भेटणारे हे बालनायक धाडसी आहेत आणि खोडकरही आहेत. हुशार आहेत आणि खट्याळही आहेत. आई-बाबांचं ऐकणारे,  उत्तम संस्कार जोपासणारे आणि घरच्यांचा डोळा चुकवून उनाडक्या करणारेही आहेत. शाळेत जाणारे, मित्र जमवणारे, भांडण करणारे, गट्टीफू करणारे, रुसणारे आणि नवी शक्कल लढवून नवा गोतावळा तयार करणारे, ‘प्रत्येकजण महत्त्वाचा’ असं मानत एकेक माणूस जोडणारे हे बालनायक आहेत.

हे बालनायक रहस्यांचा पाठलाग करतात, शाळेत शिकलेल्या शिकवणुकीची अंमलबजावणी करतात. आबालवृद्धांच्या मदतीला धावून जातात. जातीपातीच्या, वर्गाच्या आणि वर्णाच्या पलीकडे जाऊन माणसाला महत्त्व देतात. माणसाला महत्त्व देत त्यांनी केलेली कृती त्यांना शाळेतल्या इतरांपेक्षा वेगळी ठरवते. या कृतीनं त्यांचं सामान्यपण संपतं आणि असामान्यत्व जाणवू लागतं. आपसूकच आपल्यासारखाच दिसणारा, आपल्यासारखाच बोलणारा, आपल्याच वयाचा मुलगा बालकुमारांचा ‘हीरो’ होतो. नायक होतो.

मराठी बालसाहित्यात प्रत्यक्षात झालेला आणि मुलांच्या पसंतीला उतरलेला पहिला बालनायक म्हणजे ‘श्याम’. सानेगुरुजींचा श्याम...‘श्यामची आई’ या प्रसिद्ध कादंबरीचा बालनायक श्याम...नाशिकमधल्या कारागृहात असताना सन १९३३ मध्ये सानेगुरुजींनी ‘श्यामची आई’ ही कादंबरी लिहिली. या कादंबरीतला श्याम हा घरातल्या लहान मुलाचं प्रतिरूप. सानेगुरुजी यांनी श्यामला सत्प्रवृत्त दाखवलं. आई श्यामला जे काही सांगते-शिकवते त्यातून त्या काळातल्या अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. ‘पायाला मळ लागू नये म्हणून जसा जपतोस, तसा मनाला मळ लागू नये म्हणूनही जप’ यासारखी या कादंबरीतली वाक्यं श्यामच्याच नव्हे, तर बालवाचकांच्या मनावरही खोल संस्कार करतात. स्वातंत्र्यपूर्वकाळातल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या श्यामच्या संस्कारक्षम गोष्टी आजही आपल्याला खिळवून ठेवतात.

‘श्यामच्या आई’च्या पाठोपाठ दोन मुलं आपल्या गोतावळ्यात सहभागी झाली. त्यात एक होता मुलगा, त्याचं नाव गोट्या आणि दुसरी होती मुलगी, तिचं नाव चिंगी. ना. धों. ताम्हनकर यांच्या ‘गोट्या’ आणि ‘चिंगी’नं छोट्याशा खेड्यातल्या मुलांचं जग आकाराला आणलं. छोट्या छोट्या प्रसंगांतून या नायक-नायिकेनं बालमनाचा ताबा मिळवला. गोट्याचा किशोरावस्थेपर्यंतचा प्रवास ताम्हनकरांनी बारकाईनं रेखाटला आहे. गोट्याचं आणि चिंगीचं जगणं पाहून-वाचून बालवाचक गहिवरला, त्याचे डोळे कधी पाणावले, तर कधी आनंदाश्रूंनी भरून आले. सन १९४० च्या सुमाराला मराठी साहित्यात अवतरलेले हे बालनायक अजूनही मुलांना आपलेसे वाटतात.

भा. रा. भागवत हे मराठी बालसाहित्यातलं अगदी आदराचं नाव. जगभरातल्या छान छान गोष्टी त्यांनी मराठीत भाषांतरित केल्या. विज्ञानकाल्पनिकांचं दालन भागवत यांच्यामुळेच मराठी बालकुमारांना परिचित झालं. भागवत यांनी कुमारांसाठी देशी नायक निर्माण केला. ‘फास्टर फेणे’ हे त्याचं नाव. नवे रोमांचकारी अनुभव घ्यायला साहसी फास्टर फेणेनं मराठी मुलांना शिकवलं. फुरसुंगी या गावातला बनेश फेणे नावाचा शूर, बुद्धिमान, चतुर, हळवा आणि प्रेमळ मुलगा. तो धावतो अगदी वेगात, अगदी फास्ट... म्हणून त्याला नाव पडलं फास्टर फेणे. फुरसुंगीत राहणाऱ्या आणि नंतर शिकण्यासाठी पुण्याला आल्यानंतर, पुण्यातल्या फास्टर फेणेचे पराक्रम वाचता वाचता तो आपला जिवलग दोस्त होऊन जातो. कधी डोंगर-दऱ्यांची, कधी काश्मीरच्या नंदनवनाची सैर त्यानं घडवली, तर कधी ‘नेफा’ आघाडीवरची धुमश्चक्रीही त्यानं दाखवली. वीस पुस्तकांच्या मालिकेतून फास्टर फेणेचे ‘एक से बढकर एक’ किस्से आपल्याला वाचता येतात. राम वाईकर यांनी फास्टर फेणेला आकर्षक चित्ररूप बहाल केलं आहे.

स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्त्व कल्पून स्वतःच्या पराक्रमाची नवी गाथा लिहिणारेही अनेक नायक मराठी बालकादंबऱ्यांमधून साकार झाले आहेत. श्यामसुंदर (श्री. कृ. कोल्हटकर), चंदू (श्री. शं. खानवेलकर), वसंता (वि. वि. बोकील), पक्या (गंगाधर गाडगीळ), टिल्लू (शांतिलाल भंडारी), राजू प्रधान (सुधाकर प्रभू), झंप्या (गिरिजा कीर), शिवा (महावीर जोंधळे), धर्मा (बाबा भांड), लहानू (मदन हजेरी), समशेर कुलुपघरे (भारत सासणे), ठोंब्या (आबा महाजन), हर्षद (मालविका देखणे), पिंटी (निधी पटवर्धन), शाळिग्राम (प्रशांत गौतम) असे अनेक बालनायक-नायिका आपल्याला किशोरकादंबऱ्यांमधून भेटतात. इंग्लिशमधल्या हॅरी पॉटरपेक्षा निराळ्या प्रकारचं जादूई व्यक्तिमत्त्‍व या नायकांमध्ये आहे. मनगटातल्या शक्तीच्या आणि मेंदूतल्या बुद्धीच्या जोरावर अज्ञात प्रदेशातली आव्हानं हे नायक लीलया पेलतात. त्यांचा चेहरा हा खास देशी व मराठमोळा आहे. हे बालनायक बालवाचकांचा केवळ आदर्श ठरत नाहीत, तर ज्यांचं अनुकरण केलं पाहिजे असं वाटतं, असं व्यक्तिमत्त्व त्यांच्याकडे आहे.

दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र ‘बोक्या सातबंडे’ हा महानगरातल्या शालेय विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आहे. एकूण दहा पुस्तकांमध्ये त्याच्या कर्तबगारीच्या कहाण्या प्रभावळकर यांनी सांगितल्या आहेत. दूरदर्शनमालिकांद्वारे आणि चित्रपटातूनही ‘बोक्या’ बालकापर्यंत पोहोचला आहे. बोक्या...दहा वर्षांचा चिमुरडा मुलगा. त्याला छानसं जीवन मिळालं आहे. माया लावणारी आजी, प्रेम करणारी आई, खोड्यांवर लक्ष ठेवणारे पप्पा, चिडवणारा आणि प्रसंगी मदतीला धावून येणारा दादा आणि सगळ्या कॉलनीतली दोस्तकंपनी आहे. बोक्या या त्याच्या नावाची कहाणीही गमतीची आहे. लहान असताना रडू लागल्यावर त्याचा आवाज मांजरासारखा येतो असा शोध त्याच्या चुलतबहिणीला लागला आणि तेव्हापासून तो झाला बोक्या. त्याचं खरं नाव ‘चिन्मयानंद’ हे केवळ शाळेच्या दाखल्यावर किंवा एकट्या आजीच्या तोंडी. बाकी सर्वत्र तो बोक्याच. अशा या बोक्याच्या कथा वाचत असताना उत्कंठा आणि हास्य अशी वेगळीच मजा वाचक अनुभवतो.

आपण वाचतो त्या सगळ्याच कथांमध्ये एक नायक असतो, क्वचित कधी कधी एखादा खलनायकही असतो; पण आपण सगळेच स्वप्न पाहत असतो नायक होण्याचं. हीरो होण्याचं. कारण, हीरो झाल्यानंतरच आपल्याला मिळणार असते आपली ओळख. खरीखुरी ओळख. सगळेच बालकुमार हे नव्या युगाचे नायक आहेत. उद्याच्या कालपटलावर त्यांचे कर्तृत्व ठळकपणे लिहिलं जाऊ शकेल. त्यांच्या कर्तबगारीच्या कथा नंतरचे बालकुमार मन लावून वाचतील. नव्या नायकांचा शोध कुठल्याच काळात थांबत नसतो!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com